https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

शरण तुला भगवंता!

मानवी विकास हा उत्क्रांतीचाच भाग!

पिढ्यानपिढ्या आपली मान ताणत झाडावरची पाने खाण्याचा अथक सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहिल्याने हळूहळू जिराफ या प्राण्याची मान लांब झाली. सगळ्या प्राण्यांनी असे लांब व्हायचे प्रयत्न केले पण सगळे लांब झाले नाहीत. काहीजण प्रयत्न करूनही आखूडच राहिले. त्यांनी मग "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" ही म्हण डोक्यात घेऊन आखूड जीवन जगणे पसंत केले असावे. म्हणजे आळस केल्याने त्यांची उत्क्रांती खुंटली असावी. माणूस हाही एक प्राणीच असल्याने त्याच्या बाबतीत सुद्धा उत्क्रांतीचा हा प्रयत्नवादी नियम सार्थ ठरला असावा.

यातून हा वैज्ञानिक निष्कर्ष काढता येईल की, सजीवांची उत्क्रांती ही सजीवांनी केलेल्या सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतूनच झाली असावी. हा बोध घेऊनच मानव समाजात "प्रयत्नांती परमेश्वर" ही म्हण निर्माण झाली असावी. या म्हणीनुसार माणूस त्याच्या साचेबंद, रटाळ नैसर्गिक जीवनात नाविन्य शोधतो व त्यातून मूलभूत नैसर्गिक वास्तवातून नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करीत राहतो. या नवनिर्माणालाच मानवी विकास असे म्हणतात. याचा अर्थ निसर्गाचे विज्ञान जर साचेबंद, रटाळ वास्तव तर मानवी बुद्धीचे तंत्रज्ञान हे नाविन्यपूर्ण नवनिर्माणाचे वास्तव असे म्हणता येईल.

नवनिर्माणाच्या याच ध्यासातून व तशा सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतून मानवाने इतर प्राण्यांच्या पुढे जाऊन स्वतःचा विकास केला आहे. या मानवी प्रयत्नांना पूरक विकासाची नैसर्गिक संधी निसर्गात दडलेली आहे म्हणून हे नवनिर्माण माणसाला शक्य झाले आहे. या संधीलाच  निसर्गाची किंवा परमेश्वराची कृपा असे म्हणता येईल. पण या कृपेची अट प्रयत्न हीच आहे. आळसातून विकास किंवा नवनिर्माण शक्य नाही.

प्रयत्न हे नुसते विकासाचेच नसतात तर विकासाच्या आड येणाऱ्या वाईट  सवयी, वाईट विचार सोडण्याचेही असतात. याचा अर्थ हाच की आपण निसर्गाला काही मागायचे नसते तर सातत्यपूर्ण, अथक प्रयत्न करून निसर्गातून ते घ्यायचे असते. पण असे प्रयत्न करूनही काही भौतिक गोष्टी साध्य झाल्या नाहीत तर त्याने निराश न होता निसर्गाचा निर्माता, आईबाप, सगळं काही कोणीतरी परमेश्वर आहे असे मानून "शरण तुला भगवंता" हे एकच वाक्य शांतपणे मनी उच्चारून शांत व्हायचे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा