https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

जरा जपून समाजकार्य करा!

जरा जपून समाजकार्य करा!

ज्या मानव समाजात आपण माणूस म्हणून राहतो त्या समाजाच्या हितासाठी समाजकार्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्हाला चांगले समाजकार्य करायचे असेल तर समाज विघातक काम करणाऱ्या लोकांविरूद्ध तुम्हाला लढावे लागेल म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला पंगा घ्यावा लागेल. मग त्यातून तुमचे हितशत्रू निर्माण होणार ही गोष्ट निश्चित. तुमच्या चांगल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक करणारे तुमचे हितचिंतक समाज हिताच्या अशा आरपार लढाईत तुमच्या पाठीमागे किती उभे राहतात यावर समाज योद्धा म्हणून तुमचे यश अवलंबून आहे. तुमचे हितशत्रू तुम्हाला तुमच्याच हितचिंतकांच्या मनात तुमच्या विरूद्ध विष पेरू शकतात. त्यासाठी ९९% चांगली कामे करणाऱ्या तुमची १% चूक पुरेशी आहे. त्या १% चुकीचा तुमचे हितशत्रू एवढा मोठा बाऊ करतील की तुमचे हितचिंतकच तुमचे शत्रू बनतील व तुम्हाला संपवण्यात पुढाकार घेतील. हा घाबरवण्याचा प्रयत्न नाही तर अशा गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत व पुढेही घडत राहतील म्हणून सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. घाबरून कोणी समाजकारण (राजकारण हा आणखी मोठा विषय) करण्याचे सोडून देणार नाही पण ते करताना तुमच्या हितशत्रूंपासूनच नव्हे तर पलटी खाणाऱ्या हितचिंतकांपासून सुद्धा सावध राहिले पाहिजे हे सरळ स्पष्ट शब्दांत सांगण्याचा प्रामाणिक हेतू या लेखामागे आहे हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. जरा जपून समाजकार्य करा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा