https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

कळतंय पण वळत नाही!

कळतंय पण वळत नाही!

पदार्थांचे गुणधर्म व त्यांना नियंत्रित करणारे निसर्ग नियम व माणसांचे स्वभाव व त्यांना नियंत्रित करणारे समाज नियम या गोष्टी आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतात. त्यामुळे पदार्थ असोत की माणसे त्यांच्यात आपण पूर्ण किंवा आमूलाग्र बदल घडवून आणू शकत नाही. हे सर्वजण तसेच चालणार, तसेच वागणार व तसेच राहणार हे नीट ध्यानात ठेवायचे. जोपर्यंत तुमच्यात मध आहे तोपर्यंत मधमाशा तुमच्या भोवती गोंगावणार व मध संपला की तुम्हाला सोडून जाणार. गुळाला चिकटणारे मुंगळेही याच स्वार्थी स्वभावाचे. माणसे या स्वार्थी स्वभावाला अपवाद नाहीत. निःस्वार्थ मायाप्रेम, निःस्वार्थ सेवा या गोष्टी मानव समाजात दिसत असल्या तरी त्या अत्यंत दुर्मिळ असतात. वापरा आणि फेकून द्या असाच स्वार्थी जगाचा सर्वसाधारण नियम आहे. या सर्वच गोष्टी कटू सत्य असल्या तरी त्यांच्यातील दोष शोधत बसण्याऐवजी त्यांना कसा व किती प्रतिसाद द्यायचा हे आपल्या मनालाच ठरवावे लागते. खरं तर आपल्याला न जुमानणाऱ्या, न पटणाऱ्या या स्वार्थी गोष्टींना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देण्यात आपणच चूक करीत असतो. आपल्या मनाचा हा दोष ओळखून तो वेळीच दुरूस्त केला पाहिजे. आपल्या मनात जर काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होत असेल तर दोष त्या गोष्टींपेक्षा त्यांना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देणाऱ्या आपल्या मनाचा असतो. आपल्या मनाचा हा दोष आपणच सुधारू शकतो. त्यासाठी कोणत्याही मानसतज्ज्ञाची गरज नसते. काही गोष्टी टाळता येत नसल्या तरी त्यांना किती प्रतिसाद द्यायचा याचे प्रमाण मनाला नीट कळले पाहिजे. त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे मनाला माहित असले तरी तो किती द्यायचा हे मनाला नीट कळत नाही आणि जरी कळले तरी नीट वळत नाही. कळतंय पण वळत नाही असाच मनाचा तो सावळागोंधळ असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा