मला मिळालेले आध्यात्मिक संकेत, इशारे (सिग्नल्स)!
मी आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्या बुद्धीलाच जास्त महत्व दिले आणि भावनेला कमी महत्व दिले. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वकिली सारख्या बौद्धिक व्यवसायात आलो. पण बुद्धीला मर्यादा आहेत हे विसरलो. आज सहज लोकमान्य टिळकांचा एक प्रेरणादायी विचार समोर आला आणि माझ्या जिवाची घालमेल मी स्वतःच करून घेतोय, माझे जीवन मी स्वतःच कठीण करून घेतोय, थोडक्यात मी चुकतोय याची आतून जाणीव झाली. "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हेच ते लोकमान्य टिळकांचे वाक्य ज्याने मला माझी चूक दाखवून दिली.
बुद्धीची मर्यादा न जाणता तिलाच अती महत्त्व दिल्याने झाले काय तर मी इतरांच्या बुद्धीशी माझ्या बुद्धीची बौद्धिक तुलना करू लागलो. तो वकिलीत एवढा यशस्वी मग मी का नाही झालो तसा यशस्वी? हा प्रश्न मला सतावू लागल्यावर मी त्याची बौद्धिक चिकित्सा करू लागलो. आणि डोंगर पोखरून उंदराचा शोध लावला. तो शोध म्हणजे लग्नानंतर माझ्या पत्नीने मला मुंबईतील वरळी बी.डी.डी. चाळीत राहू दिले असते तर माझी खूप प्रगती झाली असती. पण तिच्यामुळे डोंबिवलीत आलो व मुंबईतील नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणचे प्रवासी अंतर वाढल्यामुळे त्या प्रवासाला वैतागून आलेल्या संधी सोडून दिल्या व मोठ्या यशाला मुकलो. या बौद्धिक चिकित्सेतून मी माझ्या मागे राहण्याचे खापर सरळ पत्नीवर टाकून मोकळा झालो हा विचार न करता की मुंबईत राहून मी काय मोठा दिवा लावणार होतो? वास्तविक इतरांशी स्वतःची तुलना करणेच चुकीचे. या जगात प्रत्येक पदार्थ, प्राणीमात्राची ताकद वेगळी, आवाका वेगळा, भूमिका वेगळी जी वैशिष्ट्यपूर्ण असते. माणसांतही प्रत्येकाचे टॕलेंट वेगळे असते व त्याबरोबर कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. हीच तर निसर्गाची विविधता आहे. या वैशिष्ट्यपूर्ण विविधतेचा आनंद घ्यायचा सोडून मी स्वतःची तुलना या विविधतेबरोबर करीत बसलो. कसली ही माझी मागासलेली बुद्धी!
उठसूट पत्नीला दोष देणे हे माझ्या कंपनी क्लायंटच्या व्यवस्थापकीय संचालकालाच पटले नाही. त्याने मला काल सरळ त्याच्या कॕबिनमध्ये बोलवून माझ्या रागाची पर्वा न करता दोन खडे बोल सुनावले. "क्या मोरे साब, आप हमेशा आपकी मिसेस को ही आप करियर मे पिछे रहने के लिये दोषी क्यूं ठहराते हो, चाल वातावरण में आपके लडकी का उच्च शिक्षण और अच्छा विकास होने में आपके मिसेस को डर लगा होगा इसलिये उन्होने डोंबिवली में थोडा बडा घर और थोडा अच्छा वातावरण देखके डोंबिवली रहना पसंद किया होगा, इससे कठिनाई आपको हुई लेकिन आपके लडकी का अच्छा विकास हुआ ऐसा आप पाॕजिटिव्ह क्यूं नही सोचते, हर वक्त पत्नीको दोष देते हो जिसने आप का जीवनभर साथ निभाया"! वर उल्लेखित लोकमान्य टिळकांच्या बुद्धी कुठपर्यंत व श्रद्धा कुठून सुरू हे थोडक्यात सांगणाऱ्या प्रेरणादायी विचार वाक्याला सुसंगत असा हा एक संकेत मला त्या संचालकाकडून काल मिळाला जो मला माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल हे नक्की!
काल परवाच मला सुधारण्यासाठी आणखी एक संकेत मला माझ्या माजी लिगल स्टेनोकडून मिळाला. मी माझ्या पत्नीला सतत दोष देणे हे बहुतेक त्यालाही आवडले नसावे. मग तो सरळ मला म्हणाला "आता यावर जास्त लांबलचक लिहू नका, सरळ फोन करून प्रत्यक्ष बोला". पण शेवटी मी करायचे ते केलेच. याच विषयावर भला मोठा लेख त्याला पाठवून दिला. माझ्या चौकस व चिकित्सक बुद्धीला लिखाणाची भारी खाज! पण तो बुद्धीचा खोटा गर्व व भ्रम होता. या संकेतातून मी चुकतोय हे मला कळले. इतकेच कंपनी संचालकाचे वरील खडे बोल मी माझ्या सद्याच्या लिगल टायपिस्ट -कम-असिस्टंटला सांगितले तेंव्हा त्याने मला हेच सांगितले की तुमच्या पत्नीने डोंबिवलीला राहणे पसंत का केले हे तुम्ही नीट समजून घ्या व तिने तुम्हाला आयुष्यभर दिलेली साथ लक्षात घ्या. हा लोकमान्य टिळकांच्या विचार वाक्याला सुसंगत असा तिसरा संकेत व सुधारण्याचा इशारा.
चौथा संकेत मिळाला तो वकिलांच्या ग्रूपवरील एका वकिलाच्या अनाहूत सल्ल्याने. हा १००० वकिलांचा मोठा ग्रूप आहे. या ग्रूपमध्ये संपूर्ण भारतातील वकील आहेत. त्यात सुप्रीम कोर्टात प्रॕक्टिस करणारे मोठे काउन्सेल्स आहेत. या ग्रूपवर काही वकिलांना माझे बौद्धिक लिखाण आवडले व त्यांनी त्याचे स्वागतच केले. पण आज एका वकिलाने मात्र "हमारे सन्माननीय ॲड. बलिराम मोरे साब, आप अब थोडा बॕकफूट पर जाकर बॕक सिट पर बैठिये, यहाँ ऐसे विचार लिखने के लिये सभी वकील गण पात्र है" हे वाक्य त्या ग्रूपवर टाकले व माझ्या बौध्दिक मर्यादेचा आणखी एक संकेत देऊन थांबण्याचा इशारा दिला.
तसे तर काही संकेत मला पूर्वीही मिळत होते पण माझी बुद्धी त्यांना जुमानत नव्हती. एक जवळचा वकील मित्र मला अध्यात्माविषयी नीट समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण मी त्यालाच माझ्या बौद्धिक विचारांचे तुणतुणे वाजवून दाखवायचो. पण त्याची परमेश्वरावर गाढ श्रद्धा आहे व अध्यात्माविषयी त्याचे विचार ठाम आहेत. मीच या बाबतीत डळमळीत आहे. ना तळ्यात ना मळ्यात अशी माझ्या मनाची स्थिती आहे. मला धड आस्तिक म्हणता येणार नाही व धड नास्तिक म्हणता येणार नाही. दोन्ही मध्ये कुठेतरी मध्येच लटकतोय मी.
माझ्या बुद्धीला भारी माज आहे. या बुद्धीच्या कोनातून देवप्रतिमांकडे पाहिले तर ती आध्यात्मिक भावना मनात निर्माण होत नाही. बुद्धीच्या अती घमेंडीपणामुळे माझी देवश्रद्धा (भावना) कोरडी पडते. अहो, मी झोपेतून उठल्यावर व झोपताना जी देव प्रार्थना करतो ती सुद्धा गणिती पद्धतीने करतो कारण काय तर माझ्या बुद्धीचा शहाणपणा. मग त्या प्रार्थनेत आध्यात्मिक भावच रहात नाही व एक प्रार्थना फुकट गेली म्हणून मग दुसरी, तिसरी प्रार्थना म्हणण्याचा मला मंत्रचळ लागतो.
बुद्धीचा हा अती शहाणपणा मला कुठेतरी थांबवायचा होता पण नीट कळत नव्हते. पण आज लोकमान्य टिळकांचे "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हे विचार वाक्य वाचण्यात आले आणि मग माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत हे वास्तव मला कळले. मग या मर्यादे पुढे काय? तर श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, आध्यात्मिक श्रद्धा हे उत्तर सुद्धा मला लोकमान्य टिळकांच्या याच वाक्यातून मिळाले. टिळकांच्या या वाक्याला सुसंगत असे वरील संकेत, इशारे (सिग्नल्स) ही मला मिळाले आहेत. तेंव्हा आता चला सुधारणेच्या वाटेवर पुढे! बुद्धीची मर्यादा समजली की तिला थांबवून मनाला ईश्वरापुढे लीन करायचे मग बाकी प्रश्न आपोआप सुटतील!
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१२.२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा