https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

मनाचे स्वातंत्र्य!

मेंदूमनाचा स्वयंनिर्णयाचा अधिकार अर्थात मनाचे स्वातंत्र्य!

सजीवांचे मेंदूमन खरंच स्वतंत्र आहे काय? मनुष्य हाही सजीव प्राणी असल्याने त्याच्या मेंदूमनालाही हा प्रश्न लागू आहे. माझ्या मते मनुष्याचे मेंदूमन निसर्गाचे निसर्गमन व मानव समाजाचे समाजमन या दोन बाह्य मनांच्या कचाट्यात सापडलेले आहे. तसे पाहिले तर समाजमन हाही निसर्गमनाचाच एक भाग पण त्याचा एक वेगळाच प्रभाव मानवी मेंदूवर असल्याने सोयीसाठी समाजमनाला निसर्गमनापासून थोडे वेगळे धरले आहे.

मूलभूत नैसर्गिक गरजांपुरत्या मर्यादित असलेल्या आवश्यक गोष्टी कोणत्या हे निसर्गमन मानवी मेंदूला शिकवत असते तर या आवश्यक गोष्टींच्या पलिकडे जाऊन उपभोगता येणाऱ्या सुखकर व अतीसुखकर अशा चैनीच्या गोष्टी कोणत्या व त्यासाठी नैसर्गिक मूलभूत गोष्टींचा विकास कसा करायचा हे समाजमन मानवी मेंदूला शिकवत असते.

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या म्हणजे आवश्यकतेपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी (नेसेसिटीज) व विकासाच्या अत्युच्च पातळीवर असलेल्या श्रीमंती थाटाच्या चैनीच्या गोष्टी (लक्झरीज) यांच्या बरोबर मध्ये शरीर, मनाला सुखसमाधानी, सोयीस्कर, आरामशीर ठेवणाऱ्या गोष्टी (कम्फर्टस) असतात. या कम्फर्ट झोन मध्ये मानवी मन स्थिर राहिले तर ते आनंदी व शांत राहते. यालाच मानवी मेंदूमनाचा मध्यम मार्ग असे म्हणता येईल. मानवी मेंदूमनाचे एक जैविक घड्याळ आहे. या जैविक घड्याळाच्या सेकंद काट्याला गरज, मिनिट काट्याला आराम व तास काट्याला चैन असे म्हणता येईल का? मला वाटते वेळेचे हे वर्गीकरण गरज, आराम व चैन या अनुक्रमे तीन गोष्टींना लागू होणार नाही कारण त्यांचा संदर्भ वेगळा आहे. पण गरज, आराम व चैन या तीन गोष्टींचे चक्र मेंदूमनात सतत गोल फिरत असते एवढे मात्र नक्की. माझ्या मते मानवी शरीर, मनाला सुख व शांती मध्यम म्हणजे आराम अवस्थेत लाभू शकते व या अवस्थेतच मेंदूमन स्थिर रहायला हवे. निसर्ग व समाज या दोन्हींमध्ये परमेश्वर असेल तर त्यालाही गरज व चैन यांच्या बरोबर मधल्या म्हणजे स्थिर अशा आराम अवस्थेत सुख व शांती लाभत असेल. म्हणून या मध्यम अवस्थेतच मानवी मनाचा परमेश्वर मनाशी (परमात्म्याशी) सुसंवाद निर्माण होऊन दोन्ही मने एकजीव होऊ शकतात असे मला वाटते.

प्रश्न हा आहे की, निसर्गमन व समाजमन या दोन बाह्य मनांच्या प्रभावाखाली सतत असणाऱ्या मानवी मनाला स्वयंनिर्णयाचा अधिकार किती? कधीकधी मनाच्या चैनीचा प्रश्नच नसतो. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी जर आवश्यक म्हणून न करता त्या चैनीच्या गोष्टी म्हणून केल्या म्हणजे आवश्यक गोष्टींचा (गरजांचा) मर्यादेपलिकडे, प्रमाणाच्या बाहेर अतिरेक केला तर गरजांचे रूपांतर चैनीत होऊन गरजाच त्रासदायक होऊ शकतात. शेवटी विचारपूर्वक स्वयंनिर्णय घेण्याचा मानवी मनाला मर्यादित का असेना पण अधिकार आहेच. याबाबतीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनाला पटतात. त्यांच्या मते, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य व मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा