https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १० डिसेंबर, २०२३

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

शाळा, काॕलेजातील मुले सहलीच्या निमित्ताने पाण्याजवळ गेली आणि खोलीचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात, नदीत, तलावात बुडाली, अशा बातम्या अधूनमधून माध्यमात येतात व मन सुन्न होते. खरंच पाणी आणि आगीशी खेळ नको. पट्टीचे पोहायला येत असेल तर पाण्यात व अग्नीसुरक्षा तंत्रात तज्ञ असाल तर आगीत उतरावे न पेक्षा नको. तसेच अनोळखी ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी एकट्याने जायचे दिवसाही धाडस नको, मग रात्रीची तर गोष्टच सोडा. आठवा ती मुंबईतील ओसाड शक्ती मिल कंपाऊंड मध्ये एकटे जाण्याचे धाडस केल्याने महिला पत्रकारावर बलात्कार झाल्याची भयानक घटना. आठवा ती एका मुलुंडच्या जंगलात सकाळी एकटे जाण्याचे धाडस केल्याने वकिलाला बिबट्या वाघाने खाल्ल्याची काही वर्षापूर्वीची भयानक घटना. मी साधारण १९६२ ते १९६६ या पाच वर्षाच्या काळात पंढरपूरला १ ली ते ५ वी इयत्तेत शाळेत शिकत होतो तेंव्हा तिथल्या चंद्रभागा नदीच्या पाण्यात किनाऱ्यापासून छातीभर पाण्यापर्यंत चालत जाऊन तिथेच पोहायचा प्रयत्न करायचो. पोहण्यात तरबेज असणारी कोळ्याची पोरे पुढे खोल नदी पात्रात बिनधास्त पोहायची. त्यांचे ते पोहणे बघून मला एकदा सहज पुढे जाण्याचा मोह झाला. पण एक पाऊल पुढे टाकल्याबरोबर पाणी गळ्याला लागले. मग घाबरून लगेच उलटा होऊन पोहत मागे फिरलो. कसले ते पोहणे. नुसतेच कडेकडेने तरंगणे. नदीच्या गावात पंढरपूरी राहूनही मी पोहायला शिकलो नाही. कोणी मला शिकवलेही नाही. मात्र तरीही ती चंद्रभागा नदी उनाडक्या करण्याचे माझे आवडते ठिकाण होते. पण तरीही जपून वागलो  म्हणून वाचलो. मस्ती कधीकधी जिवावर बेतते हे मात्र खरे. अगदी साठ वयात मी लोणावळ्याला एका रिसाॕर्ट मध्ये वरून गोल गोल चक्राकार फिरत खाली छातीभर पाण्यात घसरत येण्याचा आगाऊपणा केला होता. खाली पाणी छातीभर असले तरी वरून गोल चक्राकार फिरत येताना वेग भलताच वाढतो व त्या जोराने माणूस त्या पाण्यात खाली जाऊन गोल गटांगळ्या खात राहतो. मला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीनंतर मृत्यूच्या दाढेतला तो फार भयंकर अनुभव ६० वयात लोणावळा रिसाॕर्ट मध्ये आला. याला कारण माझी निर्बुद्ध मस्ती. बुद्धी दिलीय ना त्या निसर्गाने म्हणा की परमेश्वराने मग ती नीट वापरा आणि भलते सलते धाडस करू नका. निसर्गाचे विज्ञान वरवर दिसते तेवढे खरंच सोपे नाही. त्यातील काही भागाचेच तंत्र तुम्ही आयुष्यात अवगत करू शकता. विज्ञानाच्या सर्वच शाखांत तुम्ही तज्ञ होऊ शकत नाही. मग जिथे अज्ञान आहे किंवा अर्धवट ज्ञान आहे तिथे भलते सलते धाडस करू नका. देव अशावेळी वाचवायला येत नाही. कारण असे संकट तुम्ही निर्बुद्धपणे स्वतःहून ओढवून घेतलेले असते जे निसर्गाच्या नियमांविरूद्ध असते. मित्रांनो, जीव खूप मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा