https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

मूलद्रव्ये, निर्जीव पदार्थ, वनस्पती, सूक्ष्मजीव, प्राणी, माणसे (माणूस हा उच्च वर्गीय प्राणी आहे) ही सर्व निसर्गाची वैविध्यपूर्ण साधनसंपत्ती पृथ्वीवर कायम तीच राहते. तिच्यात एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत सतत परिवर्तन होत राहते एवढेच काय ते वैशिष्ट्य या साधनसंपत्तीचे आहे. या परिवर्तनशील साधनसंपत्ती भोवती पुन्हा पुन्हा जन्मणारी, पुन्हा पुन्हा जगणारी, पुन्हा पुन्हा मरणारी माणसे बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून पुढे पुढे जात गोलाकार फिरत राहतात. हे निसर्गाचे भले मोठे गोल चक्र आहे त्यात निसर्ग माणसांना गोल गोल फिरवत राहतो.

या वैविध्यपूर्ण साधनसंपत्तीशी योग्य आंतर समन्वय साधता आला तर माणसांचे भरणपोषण होऊन जगणे सुसह्य होते आणि या साधनसंपत्ती बरोबर आंतर विरोध निर्माण झाला तर याच साधनसंपत्ती कडून विविध आजार निर्माण होऊन जगणे असह्य होते. मानव समाजातही जेंव्हा आंतर मानवी आंतर विरोध (उदा. धर्म, जातपात इ.) निर्माण होतो तेंव्हा समाज स्वास्थ्य बिघडते.

हे आंतर समन्वयी भरणपोषणाचे व आंतर विरोधी आजार, संघर्षाचे कर्म बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून जात माणसे गोल गोल फिरत आयुष्यभर करीत शेवटी त्यांच्या मृत्यूने निसर्गातच नष्ट होतात (म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत परिवर्तीत होतात).

या गोल जीवनचक्रातून माणसांना गोल गोल फिरायला लावणारा निसर्ग (की निसर्गात सुप्त व गुप्त असलेला तो अनाकलनीय परमेश्वर) त्याची ही अजब करामत माणसांना दाखवताना मानवी बुद्धीला विचार करायला भाग पाडतो. या अनिवार्य नैसर्गिक विचार प्रक्रियेमुळे काही गोष्टी कळण्यास मदत होत असली तरी त्यामुळे मन अस्थिर होऊन चीड  वैताग सुद्धा येतो या अनिवार्य विचार प्रक्रियेचा कारण विचारांच्या लाटा जबरदस्तीने, बळेच थांबवता येत नाहीत मग मनाचा कितीही निश्चय करा.

उतार वयात तर थांबता न थांबणारी ही विचार प्रक्रिया खूपच त्रासदायक होते कारण मेंदूत आयुष्यभराच्या कटू गोड आठवणी साठलेल्या असतात व त्या जबरदस्तीने विचार करायला भाग पाडतात. इतकेच काय झोपेत स्वप्नेही निर्माण करतात. त्यात तुम्ही जर उच्च शिक्षित व अनुभव संपन्न अर्थात ज्ञानसंपन्न व प्रगल्भ असाल तर ही विचार प्रक्रिया जरा जास्तच जोरात धावते व उतार वयात शरीराचे अवयव थकलेले, क्षीण झालेले असल्याने ती जास्तच त्रासदायक होते. अशा परिस्थितीत एखादी कृती करताना मनात दुसरा विचार येणे किंवा दुसरेच विचार मनात चालू असणे व त्यामुळे समोर असलेल्या कृतीवर नीट लक्ष नसणे व कृती पूर्ण झाल्यावर फलिताकडे अपूर्ण, असमाधानी, शंकेखोर मनाने एकटक बघत राहणे म्हणजे त्याच गोष्टीत बराच वेळ अडकून राहणे अशा कार्यात अडथळा आणणाऱ्या गोष्टी घडत राहतात. निसर्ग विचार करायला भाग पाडतो व त्यातून तो मनाला त्रासही देतो. पण तरीही मेंदूत विचार येणे हेच तर जिवंतपणाचे लक्षण आहे ना!

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा