https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

उतार वयातला आनंदयात्री!

उतार वयातला आनंदयात्री!

आयुष्यभर नैसर्गिक व सामाजिक कर्तव्यकर्मे पार पाडून पाडून वृद्ध व्यक्तीचे शरीर थकलेले व मृत्यूची चाहूल लागून मन थोडेफार उदास झालेले असते. तरूणपणाचा जोम व उत्साह व तसेच वास्तवातील उत्सुकता संपलेली असते. त्यामुळे उतार वयात शरीर व मनाला आराम देणे ही नैसर्गिक अपरिहार्यता असते व तिचा स्वीकार केला पाहिजे.

मग उतार वयात वृद्ध माणसाने जीवन कसे जगावे? माझ्या मताने ते एक आनंदयात्री बनून जगावे? पण या वयात आनंदयात्री कसे बनावे? तर माझ्या मते, स्पर्श करा आणि निघून जा (टच अँड गो) पद्धतीने आनंदयात्री बनावे. हा टच अँड गो काय प्रकार आहे? मला सुचलेल्या यातील काही गोष्टी खालीलप्रमाणे.

(१) आपली दैनंदिन जीवनकर्मे हळूहळू व वरवर करणे.
(२) शारीरिक व्यायाम हलका फुलका करणे.
(३) काही निसर्गकर्मे थोडा जास्त वेळ घेतात (उदा. शौचकर्म). तिथे टच अँड गो चालत नाही. त्यांना थोडा जास्त वेळ देणे. पण तरीही तिथे जास्त पाणी लावत न बसणे.
(४) झोपेतून उठल्यावर दात ब्रशने जास्त घासत न बसता वरवर घासून चूळ भरून मोकळे होणे.
(५) अंघोळ करताना अंगाला जास्त साबण लावून बाथरूममध्ये अंग चोळत बसण्याऐवजी वरवर साबण लावून अंगावर पाणी ओतून मोकळे होत बाथरूममधून लवकर बाहेर पडणे.
(६) माध्यमांतील बातम्या टक लावून न बघता व सखोल न वाचता वरवर बघणे व वाचणे.
(७) आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपला आवाका व नियंत्रण यांच्या बाहेर असल्याने त्या मनाला जास्त लावून न घेणे.
(८) जगाचा जास्त खोलवर विचार न करणे.
(९) आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, राजकीय ताकद चाचपून दुनियादारी करणे. ती जेवढी कमी तेवढे उत्तम.
(१०) लोक फार शहाणे असतात. स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून वाकून बघत असतात. अशा लोकांना हेरून त्यांच्याशी वास्तव गोष्टींवर, स्वतःच्या अभ्यासातून मिळवलेल्या सत्य ज्ञानावर व तसेच स्वतःच्या अनुभवावर जास्त चर्चा न करणे. त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे.
(११) खेळाडू व कलाकार यांच्या करमणूकीच्या कार्यक्रमांत जास्त न रमणे. कारण अशी करमणूक हे काल्पनिक स्वप्नरंजन असते. स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्यास शिकणे.
(१२) इतकेच काय परमेश्वर कधी प्रत्यक्ष दिसणार नाही की जवळ बसून आपल्याशी हितगुज करणार नाही हे पक्के ध्यानात ठेवून त्याच्या जास्त नादी न लागणे. अंधश्रद्ध मनाने जास्त देवधर्म व देवप्रार्थना न करणे. होता होईल तेवढी तिर्थस्थळे टाळणे कारण त्या ठिकाणी भाविक गर्दी करतात. त्यांच्या जीवघेण्या गर्दीत गुदमरून जाऊन मौल्यवान जीव जाण्याचा धोका असतो. अशा प्रसंगी तिथे कोणताही देव जीव वाचवायला धावून येत नाही. अर्थात या आध्यात्मिक बाबतीत जेवढ्यास तेवढे वागणे.

वरील टच अँड गो पद्धतीने उतार वयातील जीवन मंद ज्योतीप्रमाणे सहजसुंदर, सुखी व शांत होते. मी माझ्या उतार वयात वरील टच अँड गो पद्धत अवलंबित आहे. पण त्यासाठी मनाची प्रगल्भता, ठाम निश्चय व कौशल्य(प्रफेशनल स्किल) या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे मी करतो म्हणून तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू नका. ते धोक्याचे होऊ शकते. कोणी तसा अवलंब केल्याने कोणाचे काही नुकसान झाल्यास त्याला मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा