व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे, पण?
सर्वांनाच स्वतःच्या लिखाणातून किंवा वक्तृत्वातून मनातले विचार व्यक्त करता येत नाहीत कारण लेखन व वक्तृत्व ही कला आहे. ती सर्वांना साध्य असलीच पाहिजे हा माझा विचार चुकीचा. व्हॉटसॲप हे समाजमाध्यम असले तरी ते तसे वैयक्तिक संवादाचे माध्यम आहे. यु ट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादी माध्यमे ही विशाल सार्वजनिक संवादासाठी असलेली समाजमाध्यमे होत. अशा संवादात वैयक्तिक संवाद खूपच कमी असतो. पूर्वी व्हॉटसॲप नव्हते तेंव्हा माणसे फोन करून प्रत्यक्ष संवाद साधायची जो वैयक्तिक स्वरूपाचा असायचा. व्यावहारिक संबंधात सुद्धा प्रत्यक्ष फोनाफोनी व्हायची.
व्हॉटसॲप संपर्कात असलेल्या माझ्या नातेवाईक व मित्रमंडळींनी माझ्यासारखे स्वतंत्र लिखाण करून त्यांची स्वनिर्मितीच मला शेअर करावी, इतरांचे विचार, व्हिडिओ मला शेअर करू नयेत कारण ते इतर माध्यमातून फिरत असतात हा माझा विचार मुळातच चुकीचा व म्हणून माझी चूक मान्य करून तो विचार मी मागे घेत आहे. याबाबतीत मी माझ्या एका बहिणीचे उदाहरण देतो. ती मला म्हणते "दादा, मला तुझ्यासारखे लिहिता येत नसले तरी तू जे लिहितो ते मी वाचते व ते मला समजते. मग ती मला अधूनमधून प्रत्यक्ष फोन करून बोलते किंवा काही सेकंदाच्या तिच्या आवाजात ध्वनीफिती बनवून मला व्हॉटसॲप वर पाठवून माझ्या व्हॉटसॲप लेखनावर थोडक्यात प्रतिसाद देते. ही तिची पद्धत मला खूप आवडते. इतर काही नातेवाईक व मित्रमंडळी सुद्धा अधूनमधून थोडक्यात लिहून प्रतिसाद देत असतात. काही मंडळी बराच काळ नुसत्याच दोन निळ्या पाठवून देतात. त्यांचा हा विचित्र प्रतिसाद मी काही दिवस सहन करतो व नंतर मात्र त्यांना सरळ ब्लॉक करून टाकतो.
माझे एवढेच म्हणणे आहे की, जर तुम्हाला माझ्यासारखे लिखाणातून, व्हिडिओतून व्यक्त होता येत नसेल तर इतरांचे चांगले विचार, चांगले व्हिडिओ मला जरूर पाठवा. त्यातून तुम्हाला मला काय सांगायचे आहे हे मी समजून घेईन व त्यावर माझी योग्य प्रतिक्रियाही देईन. पण असे इतरांचे लेख, व्हिडिओ मोठे असले तर मला लगेच प्रतिक्रिया देता येणार नाही. तरीही उगाच दिसला व्हिडिओ आणि पाठवला असे व्हायला नको. तुम्हाला तुमच्या मनातील विचार, भावना ज्यातून व्यक्त करायच्या आहेत तेवढेच साहित्य पाठवा. केवळ विविध माध्यमांतून माहितीचा महापूर ओसंडून वाहतोय म्हणून त्यातून सहज हाताशी येईल ते उचलून काहीतरी पाठवायचे म्हणून उगाच पाठवू नका. ही वैयक्तिक संवादाची पद्धत नव्हे. थोडक्यात काय तर व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे पण सुसंवाद घडण्यासाठी दोन्ही बाजूंनी योग्य साद, प्रतिसाद हवा!
-©ॲड.बी.एस.मोरे, २.१२.२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा