गोली मार भेजे में, भेजा शोर करता है!
अधोविश्वावर (अंडरवर्ल्ड) आधारित सत्या या चित्रपटातील "गोली मार भेजे में, भेजा शोर करता है" हे गाणे हिंसक असले तरी मानवी मेंदू खूप आवाज करतो हे सत्य या गाण्यातून अधोरेखित होते. माणसाने सत्या चित्रपटातील अधोविश्वाचा आदर्श घेऊन गोळी मारून मानवी मेंदूची हत्या करावी असा या लेखाचा अर्थ नाही तर निसर्गाने निर्माण केलेला मानवी मेंदू किती महाप्रतापी आहे हे सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.
मानवी मेंदू ही निसर्गाची म्हणा नाहीतर निसर्गातील परमेश्वराची म्हणा अजब किमया आहे हे नक्की! हा अजब मानवी मेंदू हृदयातील रक्त खातो व पंचेद्रियांच्या माध्यमातून जग बघतो. नुसते जग बघत नाही तर त्या जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्याच्या पंचेद्रियांच्या माध्यमातून जगाची माहिती गोळा करतो. त्या माहितीचा खरे खोटेपणा तपासतो. अर्थात त्या माहितीची शहानिशा करतो व त्या चाळणीतून खरे ज्ञान मिळवतो. अर्थात तो सतत हृदयाचे रक्त व जगाची माहिती खात असतो. तो
नुसते खरे, वास्तव ज्ञान मिळवूनच गप्प बसत नाही तर त्या ज्ञानानुसार कार्य करण्यास मानवी शरीराला भाग पाडतो.
असा हा महाप्रतापी मानवी मेंदू मोठा नकलाकार आहे. या अजब मेंदूने पक्षांची नकल करून विमान बनवले. माशांची नकल करून जहाज बनवले. जोरात धावणाऱ्या घोड्यांची नकल करून रेल्वे, वाहने बनवली. आता तर स्वतःचीच नकल करून या मानवी मेंदूने कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करून ती वापरायचे तंत्र विकसित केलेय.
हा मानवी मेंदू जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंतच माणूस जिवंत. तो एकदा का निष्क्रिय झाला की माणूस मेला म्हणून समजा. या मानवी मेंदूची सक्रियता दुहेरी असते. एक असते अजाणतेपणे होणारी अनैच्छिक कार्याची सक्रियता व दुसरी असते जाणीवपूर्वक होणारी ऐच्छिक कार्याची सक्रियता. मेंदूला धक्का बसून माणूस जेव्हा कोमात जातो तेव्हा त्याचे हृदय चालू असल्याने कोमात गेलेल्या मेंदूचा रक्त पुरवठा चालू असतो व त्यामुळे मेंदूच्या अनैच्छिक क्रियेची सक्रियता चालू असते. पण त्याच्या ऐच्छिक क्रियेची सक्रियता बंद पडलेली असते. त्यामुळे कोमात केलेला माणूस जिवंत असून मेल्यासारखा असतो.
याउलट हृदयाला धक्का बसून हृदयाचे कार्य बंद पडले तर मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद होतो. अशावेळी मेंदूत साठलेल्या माहिती, ज्ञानाचा मेंदूला काही उपयोग होत नाही. कारण रक्ताशिवाय तो कार्यच करू शकत नाही. अशा परिस्थितीत हृदय अगोदर मरते व मेंदू नंतर मरतो आणि हृदय व मेंदू हे शरीराचे दोन्ही अवयव मेले की माणूस मरतो. या नैसर्गिक प्रक्रियेतून मेंदूतला आत्मा म्हणजे वळवळणारे चैतन्य अनंतात विलीन होते. पण महाप्रतापी मानवी मेंदू मरेपर्यंत खूप आवाज करीत असतो. भेजा शोर करता है. त्या शोर करणाऱ्या भेज्यात (मेंदूत) निसर्ग म्हणा नाहीतर त्यातला परमेश्वर म्हणा न दिसणारी मृत्यूची गोळी कशी मारतो व शोर करणाऱ्या मेंदूचा आवाज कायमचा कसा बंद करतो हे त्या निसर्गाला किंवा त्या परमेश्वरालाच पूर्ण माहीत. म्हणून सत्या चित्रपटातील "गोली मार भेजे में, भेजा शोर करता है" हे गाणे मी माझ्या या लेखाचे शिर्षक म्हणून निवडलेले आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.७.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा