https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २० जुलै, २०२४

निसर्ग व्यवस्थेचे भान!

निसर्ग व्यवस्थेचे भान ठेवले पाहिजे!

निसर्गदेवाने सृष्टी निर्माण केली व त्यासोबत त्या सृष्टीची नियमबद्ध व्यवस्था निर्माण केली. सृष्टीची जशी एक विशिष्ट रचना आहे तशी सृष्टी/निसर्ग व्यवस्थेचीही एक विशिष्ट रचना आहे. सृष्टी व तिची व्यवस्था या दोन्ही गोष्टींची रचनात्मक निर्मिती करून निसर्गदेव त्यांच्यापासून अलिप्त, ध्यानमग्न व शांत झाला.

मानवनिर्मित समाजव्यवस्था हा निसर्गनिर्मित (निसर्गदेव निर्मित) सृष्टी व्यवस्थेचा भाग आहे. हा भाग मूळ निसर्ग/सृष्टी व्यवस्थेतून मानवी बुद्धीने निर्माण केला जी बौद्धिक प्रेरणा मानवाला मूळ निसर्ग/सृष्टी व्यवस्थेतूनच मिळाली. सृष्टी, सृष्टी/ निसर्ग व्यवस्था व समाज व्यवस्था या तिन्हींचे मिळून विज्ञान बनते. या विज्ञानाचा बारकाईने अभ्यास करून त्यातील व्यवस्थेनुसार जो वागत नाही तो रसातळाला जातो. पण निसर्गदेव अशाप्रकारे विनाश पावणाऱ्या प्राणी किंवा माणसाची पर्वा करीत नाही व त्याला दयामाया दाखवत नाही. इथे चुकीला माफी नाही.

एकवेळ निसर्गदेवाचे (परमेश्वराचे) नामस्मरण विसरले तरी परमेश्वराला चालते पण त्याच्या सृष्टी व्यवस्थेला विसरलेले त्याला चालत नाही. सृष्टी  व्यवस्था ही आध्यात्मिक नसून ती वैज्ञानिक आहे हे नीट ध्यानात घेतले पाहिजे व या वैज्ञानिक व्यवस्थेचे ध्यान करून तिचे सतत भान ठेवले पाहिजे. निसर्गदेव हाच परमेश्वर आहे. पण हा परमेश्वर अध्यात्माला अनाकलनीय आहे व विज्ञानाला आकलनीय आहे. म्हणून त्याला सृष्टी/निसर्गातून बघायचे, सृष्टी/निसर्ग विज्ञानातून समजून घ्यायचे व त्याला वैज्ञानिक नमस्कार करून त्याच्याशी वैज्ञानिक वागायचे.

जगातील विविध धर्मातील देवदेवता किंवा प्रेषिते एकमेव निसर्गदेवाच्या/परमेश्वराच्या/परमात्म्याच्या अधीन आहेत. खरं तर ही निसर्गदेवाची/परमेश्वराची प्रतिके आहेत. या सर्व प्रतिकांना केलेला नमस्कार शेवटी एकमेव निसर्गदेवाला/परमेश्वराला पोहोचतो जशा विविध प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या शेवटी सागराला मिळतात. हिंदू धर्मात निसर्गदेवाला निर्गुण निराकार परमेश्वर/परमात्मा म्हणतात. निर्गुण निराकार का तर तो सृष्टीची व सृष्टी/निसर्ग व्यवस्थेची रचनात्मक निर्मिती केल्यानंतर त्यांच्यापासून अलिप्त, ध्यानमग्न व शांत झाला. म्हणून त्याच्या मदतीची अपेक्षा न करता, त्याच्या कृपेची याचना न करता त्याच्या व्यवस्थेचे भान ठेवले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा