गेले ते प्रत्यक्ष फोन करून बोलायचे दिवस!
मी व्हॉटसॲप बंद करून टाकले कारण व्हॉटसॲपवर सुद्धा सोशल मिडियाच फिरतोय. जवळचे मित्र, नातेवाईक म्हणवणारे सुद्धा कुठून तरी गोळा केलेले रिल्स, व्हिडिओज, दुसऱ्यांच्या रेडिमेड पोस्टस, विचार व्हॉटसॲपवर फिरवत बसतात. गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे रेडिमेड मेसेज पाठवतात पण कधी स्वतःहून फोन करून वैयक्तिक हितगुज करीत नाहीत. म्हणून शेवटी वैतागून ते व्हॉटसॲपच बंद करून टाकले. जोपर्यंत फक्त बोलण्यापुरते मर्यादित असलेले फोन होते, हल्लीचे स्मार्ट मोबाईल फोन नव्हते तोपर्यंत सोशल मिडिया ना डोळ्यांना दिसत होता ना कानावर आदळत होता. निसर्गात व समाजात घडणाऱ्या घटनांच्या दैनंदिन बातम्या जमेल तशा व जमेल तेवढ्या वर्तमानपत्र घेऊन वाचायच्या किंवा टी.व्ही. वर बघायच्या. त्यांना किती महत्व द्यायचे हे बरोबर कळायचे किंवा कळते. पण व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम इ. खिडक्यांतून सोशल मिडिया स्मार्ट मोबाईल फोनमध्ये घुसतो व तिथून मग सरळ डोक्यात घुसतो. बरं या स्मार्ट मोबाईल फोनची आता इतकी सवय झालीय की फक्त वैयक्तिक हितगुजावर बोलण्यासाठी साध्या फोनवर पुन्हा यावे असेही करता येत नाही. कारण आता जवळचे मित्र, नातेवाईकही स्मार्ट मोबाईल फोनवर इतके बिझी झालेत की त्यांना कधी प्रत्यक्ष फोन करून बोलायलाच वेळ नाही. संपले ते पूर्वीचे माया, प्रेम आपुलकीचे दिवस. आता जिकडे पहावे तिकडे कृत्रिमता आणि कृत्रिमता ठासून भरल्याचे दिसत आहे. लोकांना हे वास्तव सांगत बसण्यापेक्षा निदान स्वतःपुरता तरी योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा