https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १८ जुलै, २०२४

सृष्टी बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सृष्टीतील परिवर्तनीय बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सूर्यमालेत सूर्य मध्यवर्ती ठिकाणी स्थिर आहे व नवग्रह त्याच्या भोवती फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवतीही फिरते. ती फिरताना स्वतःबरोबर तिच्यावर उत्क्रांत झालेल्या सृष्टीलाही घेऊन फिरते. सूर्य स्थिर व पृथ्वीचे फिरणे स्थिर पण पृथ्वीवरील सृष्टी मात्र अस्थिर. ही अस्थिरता सृष्टीतील परिवर्तनीय बदलामुळे निर्माण होते. याच परिवर्तनीय बदलामुळे मानवी जीवन अस्थिर व अनिश्चित झाले आहे.

सृष्टी बदलाचे एक चक्र आहे ज्याला सृष्टी चक्र म्हणतात. मनुष्याचा जन्म, जीवन व मृत्यू हे जीवनचक्र हा सृष्टी चक्राचाच भाग आहे. या चक्रात ऋतू निर्माण होत राहतात, वनस्पती, पशु व पक्षी, माणसे यांची पुनर्निर्मिती होत राहते. काही वनस्पती, फळे जीवनासाठी उपयुक्त असतात तर काही घातक, विषारी. तीच गोष्टी पशुपक्षांची. काही प्राणी गरीब, शाकाहारी तर काही हिंस्त्र, मांसाहारी. तीच गोष्ट माणसांची. पुनर्निर्माण चक्रात काही माणसे विधायक आढळून येतात तर काही विध्वंसक. या सर्व चित्रविचित्र सृष्टी वास्तवाशी जुळवून घेण्याचे व संघर्ष करण्याचे दुहेरी आव्हान माणसाला त्याच्या आयुष्यात स्वीकारावेच लागते. निसर्गाचा तसा हुकूमच असतो.

असे आव्हान स्वीकारण्यात मानवी मनाच्या प्रतिसादाचा भाग असतो. जीवन जगण्यासाठी विविध निर्जीव पदार्थ (हवा, पाणी इत्यादी) उपयुक्त असतात. पण निर्जीव पदार्थांना सजीवासारख्या भावना नसतात. म्हणून त्यांना अभावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व त्यासाठी माणसाला अभावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करावा लागतो. वनस्पती, झाडे, फळे हे अर्धसजीव पदार्थ आहेत. त्यांनाही भावना आहेत. पण त्या इतर सजीवांसारख्या प्रगत नाहीत. म्हणून त्यांना भावनिक-अभावनिक असा संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. तसेच इतर पशुपक्षी यांच्या भावना सुद्धा मानवाएवढ्या प्रगत नसल्याने त्यांनाही असाच संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. पण माणसांच्या भावना सर्वसाधारणपणे सारख्या असल्याने माणसाला माणसांशी वागताना भावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व असा प्रतिसाद देताना भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. प्रतिसाद हा जशास तसाच द्यावा लागतो. म्हणजे चांगल्याला चांगला प्रतिसाद व वाईटाला वाईट प्रतिसाद. अर्थात माणूस नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक वागू शकत नाही. सृष्टीत होणाऱ्या परिवर्तनीय बदलाचा मानवी शरीर व मनावर परिणाम होत असतो व त्यानुसार मानवी मनाकडून सृष्टीतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना देण्यात येणाऱ्या प्रतिसादावरही परिणाम होत असतो. या प्रतिसादात मानवी मेंदूच्या अभावनिक व भावनिक बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा