https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १८ जुलै, २०२४

चैनीचा खेळ!

चैनीचा खेळ!

मनुष्य जन्मात गरज व चैन यातील फरक ओळखता आला पाहिजे. कारण चैनीचा खेळ वाईट असतो. चैनीची सवय माणसाला तिच्या खेळात गुंतवत, अडकवत जाते जशी कोणतीही नशा मनुष्याला तिची गुलाम करते. पण तरीही समाज व्यवस्थेचे वास्तव हेच आहे की माणसाच्या शरीर, मनाची वाट लावणाऱ्या दारू, तंबाखू, सिगारेट वगैरे पदार्थांचे उद्योगधंदे कायदेशीर परवाना मिळवून समाजात उभे आहेत. या उद्योगधंद्यातून रोजगार निर्मिती होते व बेकारी दूर होते असे या उद्योगधंद्याचे समर्थक म्हणतात व तसा तार्किक युक्तिवादही करतात व सामाजिक कायद्याला हा युक्तिवाद मान्यही होतो हे विशेष. नशेची सवय लावणाऱ्या पदार्थांची चैन ही तशी भयंकर चैन. पण हे पदार्थ सोडून चैनीची चटक लावणाऱ्या इतरही बऱ्याच वस्तू व सेवा अशा आहेत की त्यांची सवय माणसाला चैनीच्या जाळ्यात ओढून खेळवत राहते.

बाजारातील या चैनीच्या वस्तू व सेवांच्या सवयी जसजशा वाढत जातात तसतसा माणूस त्यांच्यात अधिकाधिक गुंतत जातो. जवळ असलेल्या चैनीच्या वस्तूंचे प्रदर्शन करून त्यातून मोठेपणा मिरवण्याची चैन ही तर फार मोठी चैन आहे. तिची एकदा का सवय लागली की माणूस त्या चैनीसाठी अक्षरशः वेडा होतो. लोकांनी असे वेडे व्हावे हाच तर चैनीच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या श्रीमंत भांडवलदारी उद्योगपतींचा उद्देश असतो. कारण लोकांना चैनीच्या अशा सवयी लागल्या नाहीत तर त्यांचे उद्योगधंदे कोसळून पडतील व त्यांची नफेखोरी तर बंद होईलच पण समाजात प्रचंड मोठी बेकारी वाढेल इतके या वेडलावी चैनीना महत्व आहे. हे महत्त्व ओळखून असे श्रीमंत भांडवलदार त्यांच्या चैनीच्या वस्तू व सेवांच्या लोकांना सवयी लागाव्यात म्हणून त्यांच्या चैनीच्या उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती माध्यमातून सतत करीत असतात ज्यांना भुलून माणसे गिऱ्हाईक बनून चैनीच्या जाळ्यात ओढली जातात व चैनीच्या खेळाचा भाग बनतात. चैनीच्या सवयी माणसाला वेडे करतात व गरज आणि चैन यातील फरक विसरायला भाग पाडतात. अशा लोकांची पुढे चैन हीच गरज होऊन बसते व तिचे समाधान झाले नाही तर अशी माणसे सैरभैर होतात जसा दारूची सवय लागलेला माणूस दारू मिळाली नाही तर तडफडतो. हा चैनीचा खेळ वेळीच ओळखून त्यात किती गुंतावे हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा