परमेश्वराने जे ठरवलेय तेच ठीक आहे!
माणसासह कोणत्याही सजीवाचे बालपण व तरूणपण म्हणजे हलके शरीर व हलके मेंदूमन यांनी जड भौतिक निसर्गाच्या जड भौतिक दुनियादारीचे जड ओझे पेलायचे, झेलायचे वय. अर्थात हे हलके फुलके वय म्हणजे निसर्गाच्या भवसागरावर (भौतिक सागरावर) सहज तरंगण्याचे वय.
याउलट माणसासह कोणत्याही सजीवाचे म्हातारपण म्हणजे उतार वयातील जड झालेल्या वृद्ध शरीर व मेंदूमनाने निसर्गाच्या जड भौतिक दुनियादारी खाली दबून, वाकून रडत रखडत जगायचे व अधिकाधिक जड होत राहून जड शरीर व जड मेंदूमन बरोबर घेऊन निसर्गाच्या भवसागरात हळूहळू बुडून मरायचे वय.
सजीव सृष्टीत जन्म घेतल्यावर सजीवाने निसर्गाच्या भवसागरावर सुरूवातीला हलकेपणामुळे सहज तरंगणे व शेवटी जड होऊन या भवसागरात हळूहळू बुडणे या दोन जीवन प्रक्रिया या निसर्गाने सक्तीने, जबरदस्तीने लादलेल्या कालचक्राचा व जीवनचक्राचा भाग आहेत. वृद्ध पिढी भवसागरात बुडून नष्ट होतेय ना होतेय तोपर्यंत तरूण पिढी प्रौढ होऊन हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत याच भवसागरात बुडायला पुढे येते. हे कालचक्र व जीवनचक्र सजीव सृष्टीच्या निसर्गातील उत्क्रांती नंतर पिढ्यानपिढ्या तसेच अखंडित चालू आहे.
निसर्गाचे कालचक्र व जीवनचक्र कोणत्याही सजीवाला टाळता येत नाही कारण निसर्गाने ते अनिवार्य करून टाकले आहे. निसर्गात जी अनाकलनीय गूढ चैतन्यशक्ती आहे जिला परमात्मा/परमेश्वर म्हणतात तीच निसर्गाच्या उत्क्रांती प्रक्रियेमागे (निर्मिती मागे) व निसर्गाच्या नियमबद्ध हालचाली मागे आहे. पण ही चैतन्यशक्ती (परमात्मा/परमेश्वर) मानवी मेंदूमनाला अनाकलनीय असल्याने शास्त्रज्ञ या शक्तीला सरळ निसर्ग म्हणून मोकळे होतात.
निसर्ग म्हणा, चैतन्यशक्ती म्हणा, परमात्मा म्हणा किंवा परमेश्वर म्हणा पण निसर्गाचे आकलनीय वैज्ञानिक वास्तव हेच आहे की निसर्गाचे कालचक्र व जीवनचक्र अनिवार्य, सक्तीचे, जबरदस्तीचे आहे. पण ते तसे आहे हीच गोष्ट चांगली आहे. म्हणजे परमेश्वराने जे ठरवलेय तेच ठीक आहे. कारण महान परमेश्वराने भौतिक निसर्गाच्या माध्यमातून सर्वात बुद्धिमान असा जो मनुष्य प्राणी निर्माण केला व त्याला योग्य काय व अयोग्य काय (योग्यायोग्य) हे ठरवून स्वयंनिर्णय (डिसक्रिशन) घेण्याची जी मर्यादित सूट दिलीय तिचा उपयोग तो फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी एकत्र करण्याचे त्याचे सोंग व ढोंग महान परमेश्वरापुढे लपून रहात नाही.
योग्यायोग्य काय हे विवेकबुद्धीने नीट समजून, उमजून घेऊन ठरवून स्वयंनिर्णय घेण्याचा परमेश्वराने दिलेला महत्त्वाचा मर्यादित अधिकार (डिसक्रिशन) वापरून मनुष्याने स्वतःवर अंकुश ठेवण्यासाठी कृत्रिम (मानवनिर्मित) सामाजिक कायदा निर्माण केला. पण त्याच स्वयंनिर्णय अधिकाराचा स्वार्थापोटी गैरवापर करून या कृत्रिम कायद्याच्या बंधन जाचातून सुटण्यासाठी या कृत्रिम कायद्यालाच माणसाने अनेक भोके (लूपहोल्स) पाडून त्यातून सुटण्याचा मार्ग मोकळा केला. सामाजिक कायद्याला अशी भोके पाडणे हे केवळ स्वयंनिर्णयाच्या मर्यादित अधिकारामुळे माणसाला शक्य झाले. म्हणजे माणूस स्वयंनिर्णय अधिकाराने स्वतःच कृत्रिम कायदा बनवतो व स्वतःच तो तोडतो.
माणसाच्या स्वयंनिर्णय अधिकाराने कृत्रिम कायद्याची जी वाट लावलीय तीच वाट स्वयंनिर्णयातील नैतिक, आध्यात्मिक परमार्थाची लावलीय. कृत्रिम सामाजिक कायद्यात कितीही बदल करा व नैतिक, आध्यात्मिक परमार्थाची कितीही कीर्तने करा जेव्हा माणसाचा स्वार्थ आडवा येतो तेव्हा माणूस या कायद्याला किंवा या कीर्तनांना बिलकुल जुमानत नाही. परमेश्वराने दिलेल्या स्वयंनिर्णयाचा मर्यादित अधिकार माणूस त्याच्या स्वार्थाचे समाधान करण्यासाठीच वापरतो.
माणूस फक्त परमेश्वराच्या सक्तीच्या, जबरदस्तीच्या निर्णयापुढेच झुकतो, शरण जातो. इतर सजीवांबरोबर माणसांवर लादलेले कालचक्र व जीवनचक्र हा असा परमेश्वराचा सक्तीचा, जबरदस्तीचा निर्णय आहे ज्याच्यापुढे झुकल्याशिवाय इतर सजीवांसह माणसाला कोणताच पर्याय नाही. परमेश्वराच्या सक्तीच्या निर्णयापुढे माणसाच्या मर्यादित स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची डाळ बिलकुल शिजत नाही. अशाप्रकारे निसर्गाने म्हणा नाहीतर परमेश्वराने म्हणा निसर्गाच्या टाळ्याची चावी किंवा कळ स्वतःकडे ठेवलीय तेच ठीक आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, २८.७.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा