https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ६ जुलै, २०२४

आयुष्याची उजळणी!

आयुष्याची उजळणी!

वरळी बी.डी.डी. चाळ नंबर ८४, खोली नंबर ६६, मुंबई-१८ निवास. आई, काका, मावशी, ताई, सुशा, आशा, विठ्ठल यांचेबरोबर ते राहणे. ती तबेला शाळा, ती मराठा मंदिर शाळा. ते सकाळी ६ ला दूध केंद्रावर जाऊन पत्र्याचे ओळखपत्र दाखवून निळ्या बुचाच्या (होल) व पांढऱ्या बुचाच्या (टोन) दुधाच्या काचेच्या बाटल्या रांगेत उभे राहून घरी घेऊन येणे. संध्याकाळी ४ ते ६ खालच्या माळ्यावरून वरच्या माळ्यावर हंड्याने पाणी भरणे. रेशन दुकानात लाईन लावून रेशनचे धान्य आणणे. त्यातच तो अभ्यास. दुपारी चाळी चाळीतून प्रौढ साक्षरता वर्ग घेणे. गिरणगाव व काकाचे ते पुढारपण. पुढे कॉलेज वगैरे वगैरे.

वरळीच्या घरात कसा राहिलो आणि किती आनंद घेतला यावर शब्द अपुरे पडतील. बळी, पवार भाऊजी, विनायक मामा, नामदेव मामा, डिगा मामा, संदिपान नाना व रूक्मिणी नानी आणि सैतान चौकीचा तो मारूती तुळशीराम नागटिळक. मारूतीच्या वडिलाने म्हणजे तुळशीराम नागटिळकनेच माझ्या आईवडिलांना माझे नाव बळीराम सुचवले आणि तेच नाव माझ्या आईवडिलांनी स्वीकारले. संदिपान नाना व मारूतीने मला मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर सिनेमागृहात देवानंद आणि वैजयंती माला यांचा दुनिया पिक्चर दाखवला तर मारूतीने व्हिक्टोरिया मिल शेजारील दिपक टाॕकीज मध्ये मला जितेंद्र बबीताचा फर्ज चित्रपट दाखवला. नामदेव मामा व आई अशी घरची मंडळी लालबागच्या भारतमाता टाॕकीज मध्ये जाऊन अरूण सरनाईक व जयश्री गडकर आणि दादा कोंडके व उषा चव्हाण यांचे मराठी चित्रपट बघायचो. ती वेगळीच मजा होती. आई व मावशी यांची खाणावळ, गिरणी कामगार व पोलीस हे खाणावळी, महिना संपला की खाणावळी लोकांची खाणावळ रक्कम घेऊन काकाबरोबर मधल्या नळात किंवा दादरावर वही घेऊन हिशोब करीत बसायचे. दिवाळी सण, गिरणीचा बोनस, गोड फराळ करताना होणारी आईची ती घाई. ती मजा शब्दांत वर्णन करता येत नाही. बळी व पवार भाऊजी यांचेबरोबर कधी दारातील वटणात तर कधी गच्चीवर गप्पा मारीत झोपी जाणे ही गंमत होती. आणि आणखी दोन चुलते होते. महादेव मोरे हा चुलता डोक्यावर वरळीच्या गणपतीला घ्यायचा तर इंद्रजित मोरे हा चुलता व्हिक्टोरिया मिलच्या नाटकात काम करायचा. सैतान चौकीला लक्ष्मण व प्रकाश नागटिळक यांच्या घरी भेट दिली की मागच्या दाराने महादू काकाच्या (महादेव मोरे) घरी जायचे व नानीबरोबर गप्पागोष्टी करायच्या. तर इंद्रजित तात्याच्या अंधेरीच्या घरी २६ जानेवारीला जायचे व त्यांच्या सोसायटीच्या वार्षिक पूजा कार्यक्रमात चुलत बहीण उज्वलाचे नृत्य बघायचे. ती पण एक वेगळी मजा होती.

काकांनी १९६३ ते १९६८ या दीर्घ सहा वर्षांच्या काळात आम्हाला पंढरपूरला ठेवले होते. दर महिन्याला काकांची मनीआॕर्डर यायची त्यातून आई महिन्याचा खर्च चालवायची. मावशी पंढरपूरच्या शेतात शेतमजूरी करायची व मलाही तिच्याबरोबर खुरपायला घेऊन जायची. शेताचा मालक संध्याकाळी घरी न्यायला पालेभाज्या द्यायचा. इतक्या भाज्या की खाऊन खाऊन कंटाळा यायचा. पंढरपूरला शेजारी काकाचे काका म्हणजे घाडगे काका व भागिरथी मावशी होती. पलिकडे चौकात सुंदरा मावशी व कासेगावचे शाळा मास्तर पांडुरंग नाना (पांडुरंग शंकर गायकवाड) होते. तर जुन्या पेठेत भाभाताई व भाऊजी (विजय धोंडिबा मोरे) होते. या सगळ्यांची घरे पालथी घालणे हे माझे कामच होते. या सगळ्यांचाच मी मस्तीखोर पण लाडका बाळू होतो. पंढरपूरला बळीची आई (रूक्मिणी आत्या) अधूनमधून यायची. मग तिला घेऊन तनपुरे महाराज, कैकाडी महाराज यांच्या मठात, गोपाळपूरला जायचो.

पवार भाऊजींबरोबर गोव्याची मजा एकदम खास होती. गोव्याची अनेक ठिकाणे मडगाव, पणजी, म्हापसा वगैरे पवार भाऊजीबरोबर मोटर सायकलवर फिरण्यात वेगळीच मजा होती. हॉटेलात मस्त चहा, नाष्टा व्हायचा. गोव्यात पावसाळ्यात वेगळीच मजा यायची. नंतर भाऊजी पुण्याला कासारवाडीला राहू लागले. तिथल्या लांडगे चाळीत अधूनमधून जायचो. रहदारीचा मुंबई पुणे हायवे रस्ता ओलांडून ताई बरोबर स्वच्छ पाण्याच्या नदीवर जायचो. ताई तिथे कपडे धुवायला जायची. भाऊजी, ताई व मी आम्ही तिघे पिंपरीच्या अशोक टाॕकीजला पिक्चर बघायला जायचो. आम्ही तिघांनी राजेश खन्ना, शर्मिला टागोर व राखीचा दाग चित्रपट तिथे बघितल्याचे मला आठवतेय.

वरळीच्या चाळीत बळीबरोबर राहण्याचा माझा जेवढा संबंध आला तेवढा गजानन बरोबर आला नाही. पण तरीही गजानन व माझे वय जवळजवळ सारखे असल्याने जवळीक निर्माण झालीच. गजानन बरोबर मी परांड्याला गेलो होतो. पुण्याहून परांड्याला जाताना दोघेही ट्रेनमध्ये नाचलो होतो. ती गंमत विसरणार नाही.

कोल्हापूरच्या घरी आण्णा, आक्का असल्यापासून जाणे, राहणे चालू राहिले. लग्न झाल्यावर आण्णाने आम्हा नवरा बायकोला त्यांच्या कर्नाटकातील अथनीच्या लॉजवर नेले होते. अण्णा मला खूप मानायचे तर बबनराव मला कोल्हापूरला गेलो की थिएटरमध्ये नेऊन पिक्चर दाखवायचे. २००२ साली रिलिज झालेला बिपाशा बासू, दिनू मोरिया यांचा राज हा सस्पेन्स चित्रपट कोल्हापूरला बबनराव बरोबर पाहिल्याचे आठवते. कोल्हापूरची मिसळ व कुंदा हे माझ्या आवडीचे दोन पदार्थ बबनराव हॉटेलात हमखास मागवायचे. जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जायचो तेव्हा तेव्हा बबनराव, सुशा, मी, बेबीताई आम्ही मिळून बागेत फिरायला जायचो. तिथे बबनराव मस्त गाणी गायचे. ससुराल चित्रपटातील गाणी तर असायचीच. वेगळीच मजा होती ती.

नंतरच्या काळात मोहोळला सहज गेलो होतो तेव्हा भामाताई, भाऊजी (विजय मोरे) थोडे थकलेले होते तेव्हा त्यांच्या शेतावर गेलो होतो. तिथे माऊली बरोबर बैलगाडीत बसून वगैरे शेतावर मस्त फोटो काढले होते. भामाताई, भाऊजी गेले आणि त्या गोड आठवणी आता फक्त आठवणीच राहिल्यात.

मोहोळलाच धाकटी बहीण आशा हिचे सासर आहे. राजूच्या लग्नाच्या निमित्ताने तिथे शेतावर राहण्याचा योग आला. त्या लग्नातले गुलाब जामुन म्हणजे अस्सल खव्यातील गुलाब जामुन. तसले गुलाब जामुन पुन्हा नाही मिळाले खायला. भरपूर शिल्लक राहिले. मग त्यातले काही गुलाब जामुन भामाताईच्या घरी नेऊन दिले तर काही डोंबिवलीला घरी घेऊन आलो.

आयुष्याच्या अशा कितीतरी सुंदर आठवणी आहेत. त्यातल्या काही ठळक आठवणी लिहिल्या. मी, माझी बायको व माझी मुलगी या तिघांच्या छोट्या संसाराच्या गोष्टी मी जवळून जगतोय. त्यामुळे त्यांना आठवणी म्हणता येणार नाहीत. आठवणी कशाला म्हणायच्या तर ज्या गोष्टी आता पुन्हा प्रत्यक्षात जगता येणार नाहीत त्यांना. या आठवणी गोड असल्याने त्या माझ्या मनात कायम राहिल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी माझ्या गेलेल्या आयुष्याची उजळणी करतो तेव्हा तेव्हा मी या आठवणीत रमतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा