भावना, बुद्धी व सवयी!
बुद्धीने भावनिक होणे किंवा भावनेने बौद्धिक होणे ही भेळमिसळ मानवी मेंदूत होतच असते. याचे कारण बुद्धी व भावना या दोन्ही गोष्टी मेंदूत एकमेकांना चिकटलेल्या आहेत. भावनेला बुद्धीने नियंत्रित करून तिला व्यवहारी बनविणे ही गोष्ट तशी सामान्य गोष्ट होय. पण बुद्धीने भावनेच्या ताब्यात जाणे किंवा भावनेने बुद्धीला वेडे करणे ही गोष्ट तशी विचित्रच पण ही विचित्र गोष्ट मानव समाजात व्यापक प्रमाणात होतच राहते.
भावनेवर आधारित बऱ्याच निरर्थक गोष्टींची मानवी मनाला सवय लागू शकते. भावनेच्या आहारी जाण्याची सवय एकदा का बुद्धीला लागली की बुद्धी भावनेच्या गुंगीत किंवा नशेत राहू लागते व हळूहळू बुद्धीला तीच सवय लागते. भावनेवर आधारित कितीतरी अव्यवहार्य, निरर्थक गोष्टी धूर्त लोकांकडून मुद्दामच समाजात पसरवल्या, रूजवल्या जातात. या निरर्थक गोष्टींची समाजमनाला सवय लावली जाते. लोकांच्या या सवयीवरच धूर्त माणसे लोकांकडून पैसा मिळविण्याचे अर्थकारण व सत्ता मिळविण्याचे राजकारण खेळत असतात.
भावनाधारित निरर्थक गोष्टींची एकदा का मनाला सवय लागली की मग ही सवय मानगुटीवर बसते व उतरता उतरत नाही. भावनाधारित निरर्थक गोष्टींच्या सवयी जाता जात नाहीत व त्यामुळे मनात ताणतणाव निर्माण होतो जो त्रासदायक असतो. निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची बुद्धीला लागलेली सवय तिला पुढे जाण्यापासून रोखते. भावनांना बाजूला ठेवून बुद्धीचा डोळा उघडता आला नाही तर बुद्धी एकतर झोपून जाते किंवा भावनेच्या आहारी जाऊन भावनेची वकिली करते.
-©ॲड.बी.एस.मोरे, २५.७.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा