https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २ जुलै, २०२४

शरीर व मन, कोण कोणाला भारी?

शरीर व मन, कोण कोणाला भारी?

मनाचा ठाम निश्चय व धाडस असेल तर बरेच काही करता येत असले तरी सर्व काही करता येत नाही हे नैसर्गिक वास्तव आहे. मनोनिग्रहाने शारीरिक व्याधी दूर होत नाहीत. शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी शारीरिक पातळीवरच इलाज करावा लागतो जो इलाज भौतिक शास्त्रावर आधारित (उदाहरणार्थ फिजीओ थेरपी) व रसायनशास्त्रावर आधारित (उदा. जैवरासायनिक औषधे) असतो.

याच कारणाने मनाने कितीही निश्चय केला व कितीही धाडस केले तरी सर्वांना हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर सर करता येत नाही. जे असे शिखर सर करतात त्यांच्या मदतीला नुसता मनोनिग्रह/निश्चय व धाडसच नव्हे तर इतर अनेक शारीरिक घटक कारणीभूत असतात ज्या घटकांत कठोर व्यावसायिक प्रशिक्षणाचाही भाग असतो. हीच गोष्ट समुद्राच्या खाडीत सहज पोहणाऱ्याची असते. 

माणसाचे मन त्याच्या स्वतःच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही मग इतरांच्या शरीरावर व निसर्गाच्या प्रचंड मोठ्या पदार्थीय शरीरावर नियंत्रण मिळविण्याची तर गोष्टच सोडा. निसर्गाचे प्रचंड मोठे पदार्थीय शरीर व त्या शरीराची हालचाल घडवणारे निसर्ग नियम म्हणजे विज्ञान. हे विज्ञान मानवी मनाला आव्हानात्मक आहे. हे आव्हान मानवी मनाला पूर्णतः पेलणे शक्य नाही कारण निसर्गाचे शरीर व निसर्ग शरीरात असलेले निसर्गमन मानवी मनाच्या, बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहे. माणसाचे मन निसर्ग मनापेक्षा जास्त शक्तीशाली असते तर माणसाने मृत्यूवर विजय मिळवून मरणारी मानवी शरीरे मरू दिली नसती.

निसर्गाला मन म्हणजे आत्मा आहे का या प्रश्नावरच मानवी बुद्धी ठाम नाही. ठोस पुराव्या अभावी ती या प्रश्नाच्या उत्तरावर चाचपडत आहे. परमेश्वरावर श्रद्धा असणारी माणसे निसर्गात असे निसर्गमन (परमात्मा) आहे असे मानून त्याच्याशी श्रद्धेने आध्यात्मिक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे माहित नाही. पण यातून देवश्रध्दाळू माणसाला काही अंशी मानसिक समाधान मिळते हे मात्र खरे. पण संपूर्ण निसर्ग शरीर जसे विज्ञानाला पूर्णपणे कळले नाही तसे त्या शरीरातील निसर्गमनही मानवी मनाला अनाकलनीय राहिले आहे.

पण तरीही मानवी मनाची मनःशक्ती मोठी आहे, तिचे बौद्धिक सामर्थ्य मोठे आहे यावर वादच नाही. मन घाबरट, कमकुवत असेल तर सोप्या गोष्टीही अवघड होतात व आजारी माणसाला चांगली औषधेही लागू पडत नाहीत. याउलट खंबीर मनाचा माणूस प्रबळ इच्छाशक्तीने असाध्य रोगावरही मात करू शकतो. पण तरीही शरीरावर नियंत्रण ठेवण्याच्या मानवी मनाच्या मनःशक्तीला तिच्या नैसर्गिक मर्यादा आहेत ही गोष्ट मान्य करावी लागते. तरीही आधी कोंबडी की अंडे या प्रश्नाप्रमाणे शरीर मनाला भारी की मन शरीराला भारी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. 

मन हे शरीरात असते कारण मेंदू हा शरीरात असतो हे मान्य करावेच लागते. शरीरात मेंदू नसता तर मेंदूत मेंदूमन कुठून असते? म्हणजे मानवी शरीर व मानवी मन व त्याहून मोठे असलेले निसर्ग शरीर व निसर्गमन या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्हीही गोष्टी एकमेकांशी निगडीत, एकमेकांवर अवलंबून असून एकमेकांना आपआपल्या ताकदी व मर्यादा (स्ट्रेन्ग्थ अँड विकनेस) नुसार नियंत्रित करतात. त्यातील कोण कोणाला भारी हा प्रश्नच मुळात निरर्थक वादाचा प्रश्न आहे. दोन्हीही गोष्टींनी आपआपल्या ताकदी व मर्यादा ओळखून सुसंवाद व संतुलन साधायला हवे, एवढेच मी म्हणेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा