https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ७ जुलै, २०२४

पिछे मुड के देखने का नही!

पिछे मुड के देखने का नही!

एका गाण्यातून सांगितलेय की "मुड मुड के ना देख मुड मुड के" तर स्त्री या चित्रपटात सल्ला दिला गेलाय की "पिछे मुड के देखने का नही"! आणि हे खरेच आहे. तुम्ही एखादी कृती जरी नीट केलीत तरी मनात शंका येऊन तुम्ही तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघायला लागलात की ती नीट झालीच नाही असा तुमच्या मनाला भास होतो व मग तो भास खरा वाटून तुम्ही ती कृती पुन्हा पुन्हा करायला जाता. मनाला लागलेली अशी सवय म्हणजेच मंत्रचळ ज्याला इंग्रजीत आॕब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॕर्डर (ओसीडी) म्हणतात.

जंगलात वाघ पुढे पुढे चालतो तेव्हा तो अधूनमधून मागे वळून बघतो या शंकेने की मागून कोणी जनावर हल्ला करायला तर येत नाही ना. अशी शंका, अशी काळजी वाघाला भूतकाळात आलेल्या अनुभवावर आधारित असते. अर्थात जंगलात राहणारे प्राणी काय किंवा मानवी वस्तीत राहणारी माणसे काय ही सगळीच सजीव मंडळी अनुभवातून शिकत असतात. पण अधूनमधून मागे वळून बघणे व सारखे सारखे मागे वळून बघणे यात फरक आहे.

रात्री निर्मनुष्य रस्त्यावरून चालत असताना कोणीतरी सांगितलेल्या भुताच्या कथेवरून किंवा एखाद्या हॉरर पिक्चरमध्ये बघितलेल्या सीन वरून मनात चुकूनही भुताची शंका आली व त्या शंके पोटी एखाद्या कमकुवत मनाच्या माणसाने पुन्हा पुन्हा मागे वळून बघण्यास सुरूवात केली तर त्याला हमखास पांढऱ्या कपड्यातील भुताची किंवा पांढऱ्या साडीतील हडळीची एखादी आकृती पाठलाग करीत असल्याचे दिसेल. खरं तर हा मनाचा भास असतो. पण तो भास त्यावेळी खरा वाटतो. आणि तो जर खरा वाटला तर एखादा माणूस घाबरून मरूही शकतो. इतकी ही भासाची व पुन्हा पुन्हा मागे वळून बघण्याची गोष्ट भयंकर आहे. भुताच्या त्या स्त्री चित्रपटात एक हडळ दाखवलीय व एकजण कोणाला तरी सल्ला देतो की "पिछे मुड के देखने का नही" कारण असे मागे वळून बघितले की ती हडळ स्त्री हमखास दिसायची.

मंत्रचळ हा अशा सवयीतून होतो. केलेली कृती नीट केलीय की नाही अशी मनात थोडी जरी शंका आली तरी मन तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघायला लागते व तीच कृती पुन्हा पुन्हा करायला लागते. ही गोष्ट मानवी मनाच्या अती शंकेखोर, अती चिंतातूर, अती उत्सुक किंवा अती चिकित्सक स्वभावामुळेही होऊ शकते. अती तिथे माती त्यातलाच हा प्रकार. म्हणून "पिछे मुड के देखने का नही"!

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा