चैतन्यशक्तीच परमेश्वर!
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असली तरी युक्तीतही बौद्धिक शक्ती असते याचा विसर पडता कामा नये. आपण ज्या सुख व शांती या दोन गोष्टींसाठी निसर्गातील परमेश्वराला प्रार्थना करतो त्या दोन्ही गोष्टी हे शक्तीचे सुखद परिणाम आहेत. हे परिणाम साध्य करण्यासाठी शक्तीची मूलभूत आवश्यकता असते.
आपल्याला दिसणारा व हालचाल करणारा निसर्ग हा निसर्गातील अदृश्य शक्तीचा दृश्य परिणाम आहे. शक्तीच निसर्ग रूपाने प्रकट झाली आहे. अर्थात निसर्ग किंवा सृष्टीचा निर्माता नसून निर्माती आहे व ती निर्माती म्हणजे शक्ती. म्हणून शक्ती पूजनीय आहे, वंदनीय आहे व तीच परमेश्वर आहे. महात्मा गांधी "सत्य हाच परमेश्वर" असे म्हणतात. तर मी "शक्ती हाच परमेश्वर" असे म्हणतो. निसर्ग निर्मिती व हालचाली मागे अदृश्य शक्ती आहे व तीच परमेश्वर आहे. ही शक्ती अदृश्य आहे म्हणून परमेश्वर अदृश्य आहे असे म्हणता येईल. या शक्तीला निसर्गशक्ती किंवा चैतन्यशक्ती असेही म्हणता येईल.
निसर्गातील चैतन्यशक्ती अनेक रूपे घेऊन निसर्गात वावरत असते. तिला भौतिक शक्ती म्हणा, रसायनशक्ती म्हणा, प्रकाश शक्ती म्हणा, विद्युत शक्ती म्हणा, यांत्रिक शक्ती म्हणा, शारीरिक शक्ती म्हणा, मानसिक शक्ती (मनःशक्ती) म्हणा की अजून काही म्हणा ती एकच चैतन्यशक्ती आहे जी अनेक रूपात वावरते व निसर्गात सतत क्रियाशील राहते.
मानवासह संपूर्ण सृष्टीच्या उत्क्रांती मागे ही निसर्गशक्तीच आहे. या चैतन्यशक्तीचे नुसते चैतन्य असे नाव ठेवले की ती स्त्री रूपी न भासता पुरूष रूपी भासते. चैतन्यशक्तीच्या याच पुरूषी नावामुळे कदाचित स्त्री रूपी शक्तीदेवतेचे पूजन, आराधना, प्रार्थना करण्याऐवजी पुरूष रूपी परमेश्वराचे पूजन, आराधना, प्रार्थना करण्याचा प्रघात मानव समाजात पडला असावा. पण शक्तीला पुरूषी नावाने परमेश्वर म्हणा नाहीतर स्त्री नावाने निसर्गदेवता म्हणा ती संपूर्ण विश्वाला व्यापून राहिली आहे हे विज्ञानही नाकारत नाही. विज्ञान या निसर्गशक्तीकडे फक्त ऊर्जा (एनर्जी) या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघते, आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे हाच काय तो फरक. उदाहरणार्थ, विज्ञान हे सूर्य शक्तीला सौरऊर्जा असे म्हणते तर मी या सौरऊर्जेला सूर्य शक्ती असे म्हणतो. निसर्गातील या अदृश्य असलेल्या सर्वशक्तिमान चैतन्यशक्तीलाच माणसे अनेकविध दृश्य प्रतिकांतून बघतात. वास्तविक या प्रतिकांचे आध्यात्मिक पूजन हे निसर्गातील अदृश्य महाशक्तीमान चैतन्यशक्तीचेच श्रद्धेने पूजन असते.
मी निसर्गशक्तीकडे वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही दृष्टिकोनातून बघतो व म्हणून मी आस्तिक आहे. इतर धर्मातील गॉड, अल्ला असोत की हिंदू धर्मातील अनेक देवदेवता असोत मी या सगळ्यांत निसर्गशक्ती किंवा चैतन्यशक्ती/निसर्गदेवतेलाच बघतो. या शक्तीची आराधना करणे म्हणजे या शक्तीच्या आध्यात्मिक प्रार्थनेने तिला आपल्या शरीर व मनात जागृत करण्याचा प्रयत्न करणे व तिच्या जोरावर जीवनात सुख व शांती हे दोन परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न करणे. ही शक्ती कुठेतरी कमी, अपुरी पडते तेव्हाच हे परिणाम साध्य करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात असे माझे वैयक्तिक मत आहे. मनातील धैर्य, साहस, निश्चय इत्यादी शक्तीशाली गुण हे या शक्तीचेच आविष्कार होत.
ही चैतन्यशक्ती जिवंत मानवी शरीरातून
निघून गेल्यावरच माणूस मरतो. ही गोष्ट इतर सर्व सजीवांना लागू आहे. सजीव शरीरातील चैतन्यशक्ती सजीवाच्या मृत्यूनंतर निर्जीव पदार्थ जवळ करते असे मला वाटते. आता याला जर कोणी अंधश्रद्धा म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही कारण मी लोकांच्या म्हणण्याऐवजी निसर्गाचा मूलभूत पाया असलेल्या निसर्गशक्ती अर्थात चैतन्यशक्ती/निसर्गदेवतेवर विश्वास ठेवतो.-©ॲड.बी.एस.मोरे, ६.७.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा