https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १६ जुलै, २०२४

व्यवस्थेचा धनी, लाभार्थी व बळी?

निसर्ग व समाज व्यवस्थेचा मूळ धनी कोण व या व्यवस्थांचे लाभार्थी व बळी कोण?

मानव समाजाची समाज व्यवस्था हा प्रचंड मोठ्या निसर्ग व्यवस्थेचा एक छोटासा भाग आहे जणू ते विशाल सागरातील एक छोटेसे भेटच. पण हे बेट इतके प्रभावशाली आहे की ते विशाल सागरावर प्रभुत्व गाजवून त्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करते व हा प्रयत्न काही अंशी तरी यशस्वी होतो याला कारण म्हणजे मनुष्याला निसर्गानेच बहाल केलेली प्रचंड मोठी बुद्धिमत्ता. अर्थात मानव समाज व्यवस्थेचा आधार किंवा पाया मानवी बुद्धी हाच आहे.

निसर्ग कोणाला म्हणावे? काहीजण निसर्गाला राजा म्हणतात. पण या राजाचे विविध रंग, रूप, गंध, गुण, क्रिया इतक्या भागात विखुरलेल्या आहेत की या राजाला एकसंध पाहताच येत नाही. या राजाच्या आध्यात्मिक/भावनिक व वैज्ञानिक बौद्धिक मेंदूमनाचा तर पत्ताच लागत नाही. मग हा राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर आहे व तो अमूक अमूक स्वरूपात (सगुण व निर्गुण) आहे अशा अमूर्त तार्किक कल्पना मानवी मन करते व त्यांना  धार्मिक कर्मकांडाची जोड देऊन आभासी मानसिक शांती, समाधान मिळविण्याचा प्रयत्न करते. याला कारण हेच की निसर्ग व निसर्गाच्या व्यवस्थेचे मूळ किंवा धनी हा मानवी मेंदूमनाला कायम अनाकलनीय राहिला आहे.

पदार्थीय सृष्टी (निसर्ग) व तिची व्यवस्था (निसर्ग नियमांनी बद्ध असलेली निसर्ग व्यवस्था) या दोन गोष्टींचा निर्माता परमेश्वर असो की निर्माती चैतन्यशक्ती असो, शेवटी प्रश्न परमेश्वर किंवा चैतन्यशक्तीचा नसून या निर्माता किंवा निर्मातीने निर्मिलेल्या व लादलेल्या निसर्ग व्यवस्थेला व त्या अंतर्गत माणसांनी त्यांच्या बुध्दीच्या आधारावर निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेला प्रत्येक मानवी बुद्धीने व्यवस्थेनुसार योग्य प्रतिसाद देण्याचा आहे. ही मानवी बुद्धी वाढत्या वयानुसार क्षीण होत जाते कारण मानवी मेंदूच्या मेंदूपेशी वाढत्या वयानुसार मरत जातात व त्यांचे पुनर्रोपण करता येत नसल्याने व स्मरणशक्तीही कमी झाल्याने या दोन्ही व्यवस्थांना योग्य प्रतिसाद देताना मानवी मेंदूमनाची तारांबळ उडते, ते गडबडते. वृद्ध व्यक्तीच्या मेंदूमनाची अशी बिकट अवस्था असते.

निसर्ग व्यवस्थेत निर्जीव पदार्थांना व सजीव पशूपक्षांना काम व भूमिका यात निवडीचे स्वातंत्र्य नसते. पण माणसांना मात्र निसर्गाने थोड्याफार प्रमाणात हे निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. जन्मानंतर आयुष्यात कोणते काम करायचे व कोणती भूमिका निभावायची हे निवड स्वातंत्र्य जरी काही प्रमाणात माणसांना असले तरी त्यावर समाज व्यवस्था स्वतःची बंधने घालते. माणसाचा जन्म कोणत्या कुटुंबात होतो व ते कुटुंब समाज व्यवस्थेने कोणत्या वर्गात टाकले आहे यावर काम व भूमिका निवडीचे स्वातंत्र्य बऱ्याच अंशी अवलंबून असते. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील कुटुंबास व त्यातील कुटुंब सदस्यांस असे निवडीचे स्वातंत्र्य पुढारलेल्या वर्गातील कुटुंबापेक्षा व त्या कुटुंबात जन्मलेल्या माणसांपेक्षा खूप कमी असते. समाज व्यवस्थेची ही रचना पिढ्यानपिढ्या मागासवर्गीय समाज घटकांवर हुकूमशाही गाजवत राज्य करीत राहते. अशा समाज व्यवस्थेत लोकशाही राज्यव्यवस्थेचे मतदान ही थट्टा/प्रहसन (फार्स) असते. अशा परिस्थितीत मला नेहमी हा प्रश्न पडतो की निसर्ग व्यवस्था व त्या अंतर्गत माणसांनी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचा मूळ धनी कोण व या दोन्ही व्यवस्थांचे लाभार्थी व बळी कोण?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा