https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ३१ जुलै, २०२४

वृद्धापकाळातील सुकलेले चैतन्य!

वृद्धापकाळातील सुकलेले चैतन्य!

सूर्यप्रकाश म्हणजे मूर्तीमंत चैतन्य. सूर्य उगवतो म्हणजे चैतन्य उजळते व सूर्य मावळतो म्हणजे चैतन्य झाकोळते. चैतन्याचे हे उजळणे व झाकोळणे (अंधारणे) आपल्या आयुष्यात दररोज चालू असते.

ज्याप्रमाणे आपण घरातील लाईटचे बटन चालू, बंद करतो त्याप्रमाणे आपण दीर्घ झोप घेऊन जागे होतो तेव्हा आपल्या लाईटचे (चैतन्याचे) बटन तात्पुरते चालू होते व आपण दीर्घकाळासाठी (दिवसाचे साधारण आठ तास) झोपी जातो तेव्हा आपल्या लाईटचे (चैतन्याचे) बटन तात्पुरते बंद होते.

बालपण व तरूणपणात आपले जे चैतन्य ताजेतवाणे, सळसळते असते तेच चैतन्य आपल्या वृद्धापकाळात थकलेले, सुकलेले होते. याचे एकच कारण असते व ते म्हणजे आपल्या चैतन्यमय आयुष्याचे बटन कायमचे बंद होण्याची किंवा आपल्या तेजोमय आत्म्याचा दिवा कायमचा मालवण्याची प्रक्रिया वृद्धापकाळात सुरू असते. त्यामुळे वृद्ध माणसाचे चैतन्य बटन त्याच्या झोपेतून जागे होण्याने जरी चालू झाले तरी त्याला बालपण, तरूणपणासारखा उत्साह वाटत नाही. उतार वयात त्याच्या आयुष्याला एक मरगळ आलेली असते. थोडक्यात त्याच्या आयुष्याचे उमललेले फूल वृद्धापकाळात सुकलेले असते. त्याची क्रियाशीलता मंदावलेली असते.

ही अवस्था सगळ्याच वृद्धांची सारखी नसते. काही वृद्ध त्यांच्या म्हातारपणी सुद्धा तरतरीत दिसतात. तीन, चार तासांची झोपही त्यांना पुरेशी होते व तेवढ्या झोपेवर ते ताजेतवाणे होऊन तुरूतुरू चालत सक्रिय होतात. पण हे अपवाद आहेत व याला बरेच अनुकूल घटक कारणीभूत असतात. हे अनुकूल घटक म्हणजे अनुकूल आनुवंशिक घटक व अनुकूल परिस्थिती (भरपूर पैसा, सत्ता, मानसन्मान वगैरे वगैरे). सामान्य वृद्धांनी या असामान्य वृद्धांकडे अपवाद म्हणून बघितले पाहिजे नाहीतर यांच्या तुरूतुरू धावण्याकडे बघून उत्साह नाही तर आणखी मरगळ येऊ शकते. हे वास्तव आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा