https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

वास्तवामागील वास्तव!

वास्तवामागील वास्तव!

निसर्गातील मूलद्रव्ये विशेष गुणधर्मी असतात पण ती अपूर्ण असतात व म्हणून त्यांच्यात एकमेकांविषयी पूर्णत्व प्राप्तीचे आकर्षण निर्माण होते. मूलद्रव्यांचे हेच मूळ आकर्षण  शुद्ध मूलद्रवी पदार्थ, मिश्रण पदार्थ व संयुग पदार्थ असे विविध पदार्थ सृष्टीत निर्माण होण्यास कारणीभूत ठरले असावे. हे विविध पदार्थ सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पण ही वैशिष्ट्ये त्यांना पूर्णत्व प्राप्तीचा आनंद देत नसल्याने एकमेकांशी वैशिष्टयांची देवाणघेवाण करून पूर्णत्व प्राप्तीचा आनंद घेण्याचे आकर्षण निर्माण झाले. मूलद्रव्ये व पदार्थ, पदार्थांचे गुणधर्म व रचना, पदार्थांचे आंतर पदार्थीय आकर्षण, निसर्गशक्ती व पदार्थांची कायदा व्यवस्था या पाच गोष्टींचे मिळून निसर्गाचे विज्ञान बनले आहे. विज्ञानाच्या या पाच भागांची निर्मिती किंवा उत्क्रांती कोणी केली? निसर्गाच्या कायदा व्यवस्थेतून कोणी निसटून जाऊ नये, या व्यवस्थेबरोबर व्यवस्थित वागण्याऐवजी अव्यवस्थित/बेशिस्त वागू नये म्हणून निसर्गाच्या कायदा व्यवस्थेतच संरक्षक प्रतीव्यवस्थेची निर्मिती कोणी केली? निसर्गाच्या मूलभूत कायदा व्यवस्थेत व्यवस्थेची देखभाल करण्याची सोय आहे तर निसर्गाच्या कायदा प्रतीव्यवस्थेत मूळ व्यवस्थेबरोबर प्रतीव्यवस्थेचेही संरक्षण करण्याची सोय आहे. मूळ कायदा व्यवस्था व तिचा पूरक पोट भाग म्हणजे कायदा प्रतीव्यवस्था हा विज्ञानाचा एकच पाचवा भाग होय.

निसर्गात असलेल्या वरील पाच भागांचे विज्ञान हे निसर्गाचे वास्तव आहे. निसर्गात हे विज्ञान आहे व या विज्ञानात निसर्ग आहे. खरं तर, निसर्ग व विज्ञान या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. त्या एकच आहेत. मग निसर्ग व विज्ञान या एकच असलेल्या गोष्टीपासून आणखी एखादी वेगळी गोष्ट असेल काय जी समोर दिसणाऱ्या, प्रत्यक्षात अनुभव घेता येणाऱ्या वास्तवापासून (निसर्ग व विज्ञान यांचे वास्तव) वेगळी व अधिक शक्तीमान असेल? म्हणजे दृश्य वास्तवामागे आणखी कोणते तरी अदृश्य वास्तव असेल काय? या अदृश्य वास्तवाशिवाय निसर्ग व विज्ञानाचे दृश्य वास्तव शक्यच नाही या मानवी बुद्धीच्या मूलभूत तर्कातून परमेश्वर ही संकल्पना निर्माण झाली असावी कारण निसर्गशक्ती ही सुद्धा दृश्य निसर्ग व विज्ञानाचाच एक भाग आहे. म्हणून निसर्ग व विज्ञान या दोन्ही गोष्टी एकच असलेल्या  दृश्य वास्तवाचा अदृश्य मालक (निर्माता) व चालक (नियंता) कोण तर परमेश्वर अशी मानवी संकल्पना व या संकल्पनेविषयीची श्रद्धा आहे व ती आस्तिक लोकांतच आढळून येते. निसर्ग व विज्ञान या दृश्य वास्तवामागे परमेश्वर नावाचे अदृश्य वास्तव असल्याचे नास्तिक लोकांना मान्य नाही. विज्ञानाच्या मागे निसर्ग आहे असे नास्तिक म्हणतात तसे वैज्ञानिक शास्त्रज्ञही म्हणतात. पण निसर्ग म्हणजे तरी नक्की काय याची स्पष्ट व्याख्या ते देत नाहीत. खरं तर विज्ञान व निसर्ग या दोन्ही गोष्टी एकच आहे. तरीही परमेश्वराचे अस्तित्व मानायचे नाही म्हणून मग निसर्ग म्हणायचे. परमेश्वर हे तर वास्तवामागील वास्तव आहे ही गोष्ट मान्य करण्यात अडचण एकच की परमेश्वर अनाकलनीय आहे व तो प्रत्यक्षात दिसत नाही की अनुभवता येत नाही. पण खरं तर परमेश्वराला निसर्ग व विज्ञानाच्या माध्यमातून आपण रोज बघत असतो व रोज अनुभवत असतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की माध्यम व माध्यमाचा कर्ता करविता यात फरक आहे.

विज्ञानाचा भाग असलेली निसर्ग व्यवस्था पदार्थांच्या हालचालीची अर्थात त्यांच्या कर्माची चौकट ठरवते. या चौकटी बाहेर पळणाऱ्या पदार्थांना पुन्हा चौकटीत आणून सोडण्यासाठी निसर्गाने व्यवस्थेतच प्रतीव्यवस्था निर्माण केली आहे. मानव समाजाने स्वेच्छेने निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था व प्रतीव्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था व प्रतीव्यवस्था यांच्या चौकटीतच काम करते. तिला नैसर्गिक व्यवस्था व प्रतीव्यवस्थेची चौकट मोडता येत नाही. नैसर्गिक चौकट अनैच्छिक/अनिवार्य आहे तर सामाजिक चौकट  ऐच्छिक/वैकल्पिक आहे.

निसर्ग व विज्ञानाच्या दृश्य वास्तवा मागील परमेश्वर नावाचे अदृश्य वास्तव अनाकलनीय असले तरी ते आहे हे मानून त्याची भक्ती व प्रार्थना करणे हेच अध्यात्म होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.८.२०२४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा