निसर्गाचे ऐच्छिक व अनैच्छिक कार्मिक विभाग, मर्यादेच्या सीमारेषा व कर्मबंधन!
निसर्गातील पदार्थांची कार्मिक हालचाल समजून घेताना निसर्गाचे ऐच्छिक व अनैच्छिक हे दोन प्रमुख कार्मिक विभाग नीट समजून घेतले पाहिजेत. निसर्गातील सजीव पदार्थ अनैच्छिक व ऐच्छिक या दोन्ही कार्मिक विभागांच्या अखत्यारीत कार्यरत असतात कारण या दोन्ही विभागांकडून सजीव पदार्थांना त्यांच्यातील जैविक गुणधर्मीय कार्य, कर्मासाठी प्रोत्साहन, प्रेरणा मिळते व तसेच या जैविक कार्य, कर्मावर मर्यादा, बंधनेही घातली जातात.
याउलट निसर्गातील निर्जीव पदार्थ अनैच्छिक कार्मिक विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असतात कारण या विभागाकडून निर्जीव पदार्थांना त्यांच्यातील अजैविक गुणधर्मीय कार्य, कर्मासाठी प्रोत्साहन, प्रेरणा मिळते व तसेच या अजैविक कार्य, कर्मावर मर्यादा, बंधनेही घातली जातात. निर्जीव पदार्थांना सजीव पदार्थांप्रमाणे विशेष करून मनुष्य प्राण्याप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते.
सजीव पदार्थ अनैच्छिक विभागात जगण्यातले परावलंबित्व, पारतंत्र्य अनुभवत असतात तर ऐच्छिक विभागात जगण्यातले स्वावलंबित्व, स्वातंत्र्य अनुभवत असतात. विशेष म्हणजे सजीव पदार्थांच्या स्वतंत्र, स्वावलंबी, ऐच्छिक जगण्यावर अनैच्छिक विभागाचा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असला तरी अनैच्छिक प्रभावाला ऐच्छिक प्रभावाने रोखता येत नाही कारण तो सक्तीचा प्रभाव सजीव पदार्थांच्या नियंत्रणाबाहेर असतो. अनैच्छिक विभागात सजीव पदार्थांच्या इच्छांना, विचारांना वाव नसतो. अनैच्छिक विभागाच्या आज्ञा सक्तीच्या, अनिवार्य असतात व त्यामुळे त्या ऐच्छिक प्रभावाने मोडता येत नाहीत. परंतु त्यांचा ऐच्छिक प्रभावाने सजीवांच्या सोयी सुविधांसाठी सोयीस्कर उपयोग मात्र करता येतो. मानवाचा तांत्रिक विकास याच ऐच्छिक उपयोगाने झाला आहे. अनैच्छिक विभागाच्या सीमारेषेची बंधने, मर्यादा पाळल्या की त्यांचा असा ऐच्छिक उपयोग शक्य होतो.
अनैच्छिक विभागाचा निर्जीव व सजीव पदार्थांवर पडणारा प्रभाव हा कठोर, अनिवार्य सक्तीचा असल्याने या प्रभावाखाली होणारी निर्जीव व सजीव पदार्थांची नैसर्गिक हालचाल ही आपोआप, अगदी सहज होत असते. खरं तर अनैच्छिक विभागात सजीवांच्या विचारांना वावच नसतो. तिथे विचार करून उपयोगच नसतो. कारण अनैच्छिक विभागाच्या कठोर अनिवार्य सक्तीच्या प्रेरणा, बंधने, मर्यादा या सजीवांच्या नियंत्रणाबाहेर असतात. मानवी इच्छा व बौद्धिक विचारांच्या कह्यात, आवाक्यात नसणाऱ्या अशा अनैच्छिक गोष्टींवर विचार करून त्यांच्यावर ऐच्छिक प्रभाव टाकण्याचा, ऐच्छिक नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी होत असल्याने तसा प्रयत्न करणे चुकीचे होय कारण त्याने काहीच साध्य होत नाही. उलट मनःस्ताप मात्र होतो.
ऐच्छिक विभागात सजीवांना त्यांचे जैविक गुणधर्म त्यांच्या इच्छेनुसार, सोयीस्कर विचारानुसार वापरण्याचा ऐच्छिक अधिकार असतो. पण या ऐच्छिक स्वावलंबी स्वातंत्र्यावर इतर सजीवांच्या याच ऐच्छिक अधिकार, हक्कांचे बंधन पडते, मर्यादा पडतात व त्यातून सजीवातंर्गत ऐच्छिक स्वातंत्र्याच्या सीमारेषा निर्माण होतात ज्या अनैच्छिक विभागाच्या सीमारेषेपासून वेगळ्या असतात व अशा ऐच्छिक मर्यादेच्या, बंधनाच्या सीमारेषा सजीवांना जाणीवपूर्वक व सारासार विचार करून स्वेच्छेने स्वतःवर घालून घ्याव्या लागतात. या ऐच्छिक सीमारेषा स्वतःवर घालून घेतल्या नाहीत तर सजीवातंर्गत त्यांच्या जैविक हक्क, स्वातंत्र्यासाठी ऐच्छिक युद्धे होतात जी बळी तो कानपिळी या निसर्ग नियमानुसार लढली जातात.
-©ॲड.बी.एस.मोरे, १४.८.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा