https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

पद्धत व शैली!

पद्धत व शैली यातील फरक!

पद्धत (सिस्टिम) व शैली (स्टाइल) यात फरक जाणवतो. माणूस शब्द, स्वर व देहबोलीतून व्यक्त होतो, संवाद साधतो. पण या अभिव्यक्ती किंवा संवादातील पद्धत व शैली यांच्यात फरक असतो. उदाहरणार्थ शब्द, वाक्यांतून वक्तृत्व किंवा लेखन ही व्यक्त होण्याची पद्धत झाली, पण लेखनाची किंवा बोलण्याची भाषा शैली वेगळी असू शकते. मराठी भाषा एकच पण तिची शहरी व गावरान शैली, ठेवण, ढब किंवा धाटणी वेगळी जाणवते. हाच फरक तंत्र व कलेत जाणवतो. उदाहरणार्थ, ध्वनी हे व्यक्त होण्याचे नैसर्गिक तंत्र झाले, पद्धत झाली, पण त्यातून संगीत स्वर काढून व्यक्त होणे ही खरं तर नैसर्गिक कला झाली, शैली झाली. म्हणजे तंत्र/पद्धत व कला/शैली या दोन्हीही गोष्टी नैसर्गिक पण तरीही त्यांच्यात फरक आहे. तंत्र/पद्धत व कला/शैली या विज्ञानाच्या मूलभूत सैद्धांतिक पाया वर आधारित कृतीच्या दोन शाखा आहेत. पण या शाखांतही प्रथम येते ते तंत्र व नंतर येते ती कला! उदाहरणार्थ, ध्वनीच नसेल तर संगीत कुठून येणार व भाषाच नसेल तर भाषाशैली कुठून येणार? तंत्राचा संबंध पद्धतीशी आहे व कलेचा संबंध शैलीशी आहे. आता याच न्यायाने माणसाचे मूळ नैसर्गिक वर्तन जवळजवळ सारखे असले तरी देखील  माणसांतील धार्मिक संस्कृती किंवा नुसती संस्कृती म्हणा यात फरक दिसतो. म्हणून तर कोणत्याही इतर धर्मांतील लोकांना जवळ न करणारी संकुचित धार्मिक राष्ट्रे व सर्व धार्मिक  संस्कृतीना किंवा इतर संस्कृतीना सामावून घेणारी अमेरिका व भारत सारखी लोकशाही प्रधान राष्ट्रे अशी मनुष्य समूहांची विभागणी जगात झालेली दिसते. जगाची अशी दुभंगलेली मानसिकता ही नैसर्गिक पद्धतीतून नाही तर विविध धार्मिक संस्कृतीतून किंवा शैलीतून निर्माण झाली असावी असे मला वाटते. पण माझे हे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वाद घालू नयेत ही वाचकांना नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©४.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा