https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

आॕनलाइन संस्कृती पासून अलग!

अॉनलाइन संस्कृतीच्या तावडीत सापडलो नाही याचा आनंद!

(१) कोरोना संकट येण्याच्या अगोदर पासूनच आताची ही अॉनलाइन संस्कृती सुरू झाली होती. प्रत्यक्ष शिक्षण व प्रत्यक्ष व्यवहार यावर पोसलेला मी कंपनी कायदा सल्लागार म्हणून स्थिर होत होतो. त्यावेळी इंटरनेटने पुढे आणलेल्या नवीन इ-कॉमर्स या संकल्पनेशी जुळवून घेताना माझी धांदल उडत होती. या नवसंकल्पनेला कुशीत घेऊनच कंपन्यांमध्ये नोकरीत रूजू झालेल्या कंपनी सेक्रेटरी नामक उच्च अधिकाऱ्यांचे हेटाळणीचे शब्द मला ऐकून घ्यावे लागत होते. मला साधा इमेल कसा पाठवायचा हे माहित नव्हते. मग कायद्याचे दस्तऐवज संगणकावर टाईप करणे शक्यच नव्हते. पण मी कंपनी सेक्रेटरी (इंटर) परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कायदेशीर सल्लागार म्हणून बस्तान बसविणे सोपे गेले. माझे कायद्यातील ड्राफ्टींग याच कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या अवघड अभ्यासाने सुधारले. एलएल.बी. ला असलेला ड्राफ्टींग व प्लिडींग हा एकमेव विषय वाचून माझे ड्राफ्टींग सुधारले नाही. तर त्याचा पाया कंपनी सेक्रेटरी कोर्सच्या अभ्यासाने पक्का केला. छापील पुस्तके व वर्तमानपत्रे वाचतच मी घडलो. प्रत्यक्ष थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजा टी.व्ही. वर चित्रपट पाहताना मला कधीच आली नाही. तर सांगायचे काय की या कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षणामुळे व विविध कंपन्यांमध्ये अकौंटस, कॉस्टिंग क्लार्क सारख्या नोकऱ्यांमुळे माझा निरनिराळ्या कंपन्यांत कॉर्पोरेट लिगल ॲडव्हायजर म्हणून शिरकाव झाला व माझ्या ज्ञान व अनुभवाचा विचार केला जाऊन प्रत्येक कंपनी क्लायंटने मला खास लिगल टायपिस्ट कंपनी खर्चाने पुरवला. कारण मला संगणक टायपिंग जमत नाही व अॉनलाइन व्यवहारही कळत नाहीत. मला मिळणाऱ्या या विशेष सुविधेमुळे क्लायंट कंपनीतील कंपनी सेक्रेटरी, चीफ अकौंटट सारखे उच्च अधिकारी जळायचे. पण वकील असल्याने कोर्टात जाऊन कंपन्यांच्या केसेसवर सॉलिसिटर्स व काऊन्सेल्स माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचे काम या उच्च अधिकाऱ्यांना जमत नसल्याने त्यांच्या जळण्याला न जुमानता मी पुढे गेलो.

(२) आता या कोरोना संकटामुळे ही अॉनलाईन संस्कृती इतकी फळफळली आहे की आमच्या सारखी जुनी उच्च शिक्षित मंडळी अॉनलाईन संस्कृतीत रूळलेल्या हल्लीच्या तरूणांना अडाणी वाटू लागलीत. त्यांना प्रत्यक्ष शिक्षण व प्रत्यक्ष व्यवहाराची चव माहित नसल्याने त्याची मजा त्यांना कशी कळणार? असो, हे तरूण आम्हालाही असेच चिडवतील की, तुम्हाला अॉनलाईन काय ते कळत नाही ना मग गप्प बसा! इमेल पाठवणे, फेसबुकवर लिखाण करणे या अॉनलाइन गोष्टी मी आता शिकलोय. पण पोस्टकार्डस वर पत्रे लिहिणे,तसेच परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेनाने प्रश्नपत्रिका सोडवणे, शाळा व कॉलेजात शिक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवाद करीत शिक्षण घेणे, हाताने लिखाण करून अभ्यास वह्या तयार करणे व उजळणी करणे, छापील पुस्तके वाचणे, छापील वृत्तपत्रे वाचणे यातून जे मनन व चिंतन होत होते ते संगणक व मोबाईलच्या अॉनलाईन स्क्रीनवर होणे मला तरी अशक्य आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने गेली पाच महिने घरातच अडकून बसलेली माणसे आता या अॉनलाइन खेळातून हळूहळू बाहेर पडून मास्क लावून, शारीरिक अंतर ठेऊन का असेना पण बाहेर पडू लागलीत, दुकानात जाऊन खरेदी करू लागलीत, रस्त्यावर वडापाव, भजी खात चहा पिऊ लागलीत. कारण लॉकडाऊन हळूहळू सैल होऊ लागलाय. याचा मला खूप आनंद झालाय. कारण लोकांच्या अशा मुक्त फिरण्याने जीवन प्रत्यक्षात कसे जगायचे याचा अनुभव घेता येतोय. पण ती अॉनलाइन संस्कृती मात्र आता रूळतच चाललीय. या नवसंस्कृतीचा भाग न होता तिच्या तावडीतून मी सुटलो याचा मला खूप आनंद आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©८.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा