https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

निसर्गाचे सत्य व माहिती अधिकार!

मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग!

विविध गुणधर्मी मूलद्रव्यांच्या अनेक पदार्थ कणांनी बनले विविध गुणधर्मी अनेक पदार्थ, त्या पदार्थांची बनली व्यवस्था आणि माणूस झाला या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग! या अनेक पदार्थांच्या समूहाला विश्व किंवा निसर्ग म्हणायचे आणि या पदार्थांच्या समूह व्यवस्थेला म्हणायची विश्व किंवा निसर्ग व्यवस्था! हे पदार्थ  कण, पदार्थ व त्यांची व्यवस्था यांचे ज्ञान हेच तर विज्ञान! या पदार्थ कणांशी, पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी प्रस्थापित झालेल्या  मानवी संबंधाविषयीचे ज्ञान हे सुद्धा विज्ञानच! निसर्गातील विविध पदार्थांशी व त्यांच्या समूह व्यवस्थेशी असलेला मानवी संबध नीट समजून घेणे म्हणजे निसर्ग व मानव संबंधाचे विज्ञान समजून घेणे. मनुष्य जेंव्हा हे विज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणतो तेंव्हा त्याला तंत्रज्ञान म्हणतात. मानवी समाज व या समाजाची कायदा व्यवस्था हा सुद्धा या विज्ञान व तंत्रज्ञानाचाच भाग आहे. निसर्गाच्या विज्ञानाला मानवाने दिलेला नैसर्गिक  प्रतिसाद म्हणजेच तंत्रज्ञान होय! निसर्गाच्या या सत्याबरोबर त्या सत्य स्वरूपात जगायचे की काल्पनिक, आभासी स्वरूपात जगायचे हे माणसाने त्याच्या बुद्धीचा नीट वापर करून ठरवावे. निसर्गाचे विज्ञान व मानव समाजाचा कायदा, धर्म या दोन गोष्टी वेगळ्या करणे हेच मुळात चुकीचे आहे. धर्म व कायदा यात सुद्धा फरक करणे चुकीचे आहे. धर्मात जेंव्हा असत्य मिथ्यके, कल्पना व आभास घुसवले जातात तेंव्हा धर्म विज्ञान व कायद्यापासून अलग होतो व असे अलगीकरण हे मानवाला निसर्गाच्या सत्यापासून दूर नेत त्याला निसर्गाच्या नैसर्गिक सादाला नैसर्गिक प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण करते. मानवी बुद्धीला निसर्गाचे सत्य कळणे हा माहिती अधिकाराचाच भाग आहे हे लक्षात घ्यायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©११.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा