कोरोनाला घाबरू नका, त्याच्याबरोबर जगायला शिका!
(१) एक सुप्त नैसर्गिक दबाव (प्रेशर) आहे निसर्गात जो आपल्याला नैसर्गिक गोष्टी पार पाडण्यास भाग पाडतोय. त्या दबावावर आपले नियंत्रण नाही. त्या दबावाखालील नैसर्गिक गोष्टी पार पाडताना आपण फार तर आपल्या नैसर्गिक बुद्धीने त्या गोष्टींचे स्वतःला सोयीस्कर असे व्यवस्थापन करू शकतो. अर्थात आपण या निसर्गाचे व्यवस्थापक होऊ शकतो, धनी नाही.
(२) एक गोष्ट लक्षात घ्या की, जन्म, जीवन व मृत्यू या जीवनचक्रावर आपले नियंत्रण नाही. ते चक्र नैसर्गिक दबावाखाली पुढे सरकते जशी पृथ्वीची स्वतःभोवतीची एक दिवसाची गिरकी व सूर्याभोवतीची एक वर्षाची प्रदक्षिणा! ही चक्रे नैसर्गिक आहेत व ती निसर्गातून निर्माण झालेल्या सुप्त दबावातून कार्यरत आहेत.
(३) नैसर्गिक दबावाखाली पुढे सरकणाऱ्या आपल्या जीवनचक्रात आपल्याला दोन गोष्टींचा सामना प्रामुख्याने करावा लागतो त्या दोन गोष्टी म्हणजे अर्थकारण व राजकारण! या दोन गोष्टी सुद्धा आपल्याला निसर्गाच्या दबावाखाली पार पाडाव्या लागतात. या दोन गोष्टींतील आपला जाणीवपूर्वक केलेला सहभाग हा अल्प असतो. पण तो आपल्याला उगाच खूप मोठा वाटतो. आपल्याला असे वाटते की आपणच हे सर्व करीत आहोत. पण तसे नसते!
(४) अर्थकारण काय आहे तर ती निसर्गातील पोषक गोष्टींशी आपली सुखद देवाणघेवाण आहे. याउलट राजकारण काय आहे तर ते निसर्गातील उपद्रवी गोष्टींविरूद्धचे आपले क्लेशकारक युद्ध आहे. स्वतःच्या जीवनापुरते मर्यादित असलेले आपले संकुचित अर्थकारण व राजकारण हे सूक्ष्म (मायक्रो) असते तर संपूर्ण समाज जीवनालाच नव्हे तर संपूर्ण निसर्गाला गवसणी घालणारे आपले अर्थकारण व राजकारण हे मोठे, विशाल (मॕक्रो) असते. असे विशाल (मॕक्रो) अर्थकारण व राजकारण हे राष्ट्रीय,जागतिक व वैश्विक असते.
(५) पोषक गोष्टींची आर्थिक देवाणघेवाण ही सुखद असते म्हणून ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. याउलट उपद्रवी गोष्टींविरूद्धचे राजकीय युद्ध हे क्लेशकारक असते म्हणून ते नकोसे वाटते. शेवटी राजकारण म्हणजे तरी काय? जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे याला तर राजकारण म्हणतात! पण कोणीतरी अन्याय करायचा आणि मग आपण त्याला जोरात लाथ मारायची हा प्रकार तसा त्रासदायकच ना! पण जीवनात अशा लाथाही माराव्या लागतात हेही जीवनाचे सत्य आहे. म्हणून राजकारणाची माझी सोपी व्याख्या काय तर अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे.
(६) सुखद अर्थकारण व त्रासदायक राजकारण या दोघांना बरोबर घेऊनच आपले जीवन पुढे पुढे सरकत आहे. जीवनाचे हे पुढे, पुढे सरकणे गोलाकार आहे, चक्राकार आहे. आता आपण ज्या कोरोना विषाणूशी वैयक्तिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर लढा देत आहोत तो लढा हा आपल्या गोलाकार फिरणाऱ्या जीवनातील राजकारणाचाच एक भाग आहे. आपले सुखद अर्थकारण या त्रासदायक राजकारणाने गेली चार ते पाच महिने जवळजवळ बंद पाडले आहे. इतके क्लेशकारक असते हे राजकारण! पण निसर्गापुढे आपला नाइलाज आहे.
(७) आपण नुसत्या सुखद अर्थकारणाला (गुलाबाच्या फुलांना) कवटाळून बसून आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या जीवनात गुलाबाच्या फुलांबरोबर निसर्गाने भरपूर काटेही पेरले आहेत. हे काटे आपल्याला सतत टोचतच राहणार व ते काढून टाकण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी सतत लढावेच लागणार. म्हणून आपल्याला सुखद अर्थकारण व त्रासदायक राजकारण या दोन्हीही गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे. त्यांच्याबरोबर जगायला शिकले पाहिजे. म्हणून म्हणतोय की, कोरोनाला घाबरू नका, त्याच्याबरोबर जगायला शिका!
-ॲड.बी.एस.मोरे©३.८.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा