माझा कोरोनावरील मुद्दा काय आणि कमेंटस काय?
लॉकडाऊन मध्ये लोक गेली जवळजवळ चार महिने घरी बसले असताना १०० तून फार तर १० जण कोरोनाबाधित झाले पाहिजेत! इथे जवळजवळ ४०% लोक बाहेर पडले कधी आणि बाधित झाले कधी हा महत्वाचा मुद्दा आहे. ३ अॉगष्ट २०२० लोकसत्तेचा अग्रलेख यावर तर्कशुद्ध विश्लेषण करतोय. तो माझ्या पोस्टवरील कमेंटमध्ये प्रतिमेत दिला. नुसत्या कोरोनाने एवढे लोक मेलेत का? "कोरोनाचे संक्रमण जास्त पण कोरोना मृत्यू दर कमी" हा मुद्दा उपस्थित केला मी माझ्या पोस्टमधून. पण त्यावरील कमेंटस मात्र भलतीकडेच गेल्या. माझी पोस्ट लोकसत्तेच्या अग्रलेखाबरोबर न वाचता सरळसरळ मंदबुद्धी वगैरे कमेंटस केल्या गेल्या माझ्या पोस्टवर. अशा कमेंटस फारच विचित्र व मनाला त्रासदायक वाटतात. लोकसत्ता संपादकाने विचारपूर्वक लिहिलेला ३ अॉगष्टचा तो अग्रलेख आहे. ती वृत्तपत्रातील बातमी नाही. त्या संपादकीयावर सुद्धा मंदबुद्धी वगैरे सारख्या विचित्र कमेंटस करता येतील काय? मी कोरोना विषाणूला कमी लेखत नाही. तो अत्यंत घातक विषाणू आहे याबद्दल माझे बिलकुल दुमत नाही. माझा ८२ वर्षाचा अत्यंत जवळचा क्लायंट तथा मित्र गेली चार महिने घरीच ठणठणीत होता. पण बाहेरून एकजण कागदपत्रांवर त्या क्लायंटची सही घेण्यासाठी घरी आला व माझ्या क्लायंटला कोरोना झाला. गेली आठ दिवस तो क्लायंट घरीच क्वारंटाईन होता. पण काल रात्री त्या कोरोना विषाणूने असा चाप दाबला, अशी कळ फिरवली की माझ्या त्या क्लायंट मित्राची तब्बेत अचानक खूप बिघडली. कालच रात्री अॕम्ब्युलन्सने त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. आता ती महागडी इंजेक्शन्स वगैरे देऊन माझ्या त्या क्लायंट मित्राला बरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मुंबईच्या महापौर यांचा थोरला भाऊ कोरोनाने नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडला. भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, तसेच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी आहे. तसेचा बिग बी अमिताभ बच्चन कुटुंबालाही कोरोनाने ग्रासले. ही सगळी मोठी माणसे. पण कोरोना श्रीमंत व गरीब असा भेदाभेद करीत नाही. कोरोनाच्या मगरमिठीतून जे बचावले ते नशीबवान, त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट! मग तुम्ही त्याला त्यांची मजबूत प्रतिकार शक्ती म्हणा किंवा आणखी काही. पण झोपडपट्टीतले गरीब लोक हे त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीमुळे वाचतात व सदनिकांत राहणारे लोक त्यांच्या कमकुवत प्रतिकार शक्तीमुळे मरतात असा सर्वसाधारण अंदाज काढणे चुकीचे आहे. कोरोना विषाणू हा भयंकरच आहे. तो कोणाला कसा नाचवतो हे माहित नाही. मास्क लावणे व शारीरिक अंतर ठेवणे या दोन प्रमुख गोष्टी सद्या तरी आपल्या हातात आहेत. तेंव्हा काळजी घ्या! माझी किमान अपेक्षा एवढीच आहे की, तुमचे समाज माध्यमावरील लिखाण मग ते लेख रूपात असो, विचार वाक्यात असो की कमेंट मध्ये असो ते विचित्र, खोचक, चेष्टेखोर असू नये!
-ॲड.बी.एस.मोरे©४.८.२०२०
P.S.
Yesterday on 3rd August, 2020 night my 82 yrs home quarantined client friend is admitted in hospital because corona triggered his stable condition. Corona is dangerous. We cannot take it lightly. All of you please take care of yourself and your family!
-Adv.B.S.More (4.8.2020)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा