https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज शनिवार दिनांक २२ अॉगष्ट २०२० रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे. गेल्या वर्षी २०१९ साली ती २ सप्टेंबरला आली होती तर २०१८ साली ती १३ सप्टेंबरला आली होती. अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही हिंदू कालगणना तारीख इंग्रजी कॕलेंडरच्या पुढे मागे होते. गणपतीला हिंदू धर्मात बुद्धीचे दैवत मानले आहे. हे दैवत सुखकर्ता व दुःखहर्ता/विघ्नहर्ता ही असल्याने या दैवताची आराधना चांगल्या कार्याचा आरंभ करण्यापूर्वी करतात. शिवपार्वती हे या दैवताचे उगमस्थान! म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेची पूजा, व्रत करतात. निसर्ग सृष्टीची रचना व व्यवस्था समजून घेऊन त्या नुसार वर्तन व्हावे म्हणून योग्य मार्गदर्शनाची गरज असते व ते काम बुद्धी करते. निसर्ग व्यवस्थेनुसार योग्य वर्तन होण्यासाठी मानवी मनातील वासना व भावना यावर नियंत्रण व त्यात संतुलन ठेवण्यासाठीही बुद्धीचा उपयोग होतो. आज या बुद्धी देवतेचे आगमन झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचे संकट/विघ्न चालू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव डामडौलात साजरा करता येत नाही. तरीही साध्या पद्धतीने का होईना पण लोक श्रीगणेश मूर्ती घेऊन आले आहेत व श्री गणेशाची यथासांग पूजा अर्चा करीत आहेत. गौरी गणपतीचा सण खरंच खूप आनंदाचा! या सणातील श्रद्धा व उत्साह मला खूप भावतो कारण तो लोकांना जवळ करतो! श्रीगणेश चरणी एवढीच प्रार्थना की, बाबारे हे कोरोनाचे संकट आता लवकरात लवकर दूर कर कारण तू विघ्नहर्ता आहेस व सरकार नावाच्या व्यवस्थेला चांगली बुद्धी देऊन ही टाळेबंदी लवकर उठवायला सांग व मुंबईच्या लोकल ट्रेन्स लवकर सुरू होऊ देत. गणपती बाप्पा मोरया!

-ॲड.बी.एस.मोरे©२२.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा