https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

सर्जनशीलता!

सर्जनशीलता (creativity)!

मानवी बुद्धीची सर्जनशीलता/निर्माणक्षमता (creativity) ही कल्पक (ingenious) व उत्पादक (productive) असते. सर्जनशीलता ही कल्पकता फुलवते व कल्पकता ही पुढे उत्पादकता वाढवते. सर्जनशील बुद्धी म्हणजे सुपीक बुद्धी! सर्जनशीलता ही कल्पकता व उत्पादकता यांचे संप्रेरक होय! सर्जनशील बुद्धी सतत भन्नाट कल्पना बाहेर काढत असते. ज्या व्यक्तीची कल्पनाशक्ती मोठी त्याची उत्पादकता मोठी! वैचारिक लेख, कविता ही सर्जनशील बुद्धीचीच उत्पादने होत. या प्रकारच्या बौद्धिक उत्पादनांना कायद्याने बौध्दिक संपदा असे म्हणतात. कॉपीराइट, पेटंट व डिझाईन कायदा अशा बौध्दिक संपदेचे मालकी हक्क निश्चित करून त्यांचे चोरांपासून संरक्षण करतो. माणूस निसर्गाच्या सर्जनशीलतेला प्रतिसाद देतो तो स्वतःच्या सर्जनशीलतेनेच! त्या प्रतिसादातून तो अनेक कृत्रिम उत्पादने निर्माण करतो. हे काम इतर सजीवांना जमत नाही. कारण त्यांची सर्जनशीलता मुळातच फार मर्यादित असते. पण मनुष्याला याबाबतीत निसर्गाने फारच सूट दिलेली दिसते. मनुष्याची सर्जनशीलता व त्यावर आधारित कल्पकता व उत्पादकता निसर्गाच्या तोडीस तोड असल्याने निसर्गाने पक्षी बनवला तर मनुष्याने विमान बनवले, निसर्गाने बघण्यासाठी डोळा दिला तर मनुष्याने कॕमेरा व पुढे चष्मा बनवला. या सर्व कृत्रिम गोष्टी निर्माण करताना मनुष्याने निसर्गाच्या उत्पादनांची मस्त कॉपी केली व स्वतःच्या सर्जनशीलतेने निसर्गाच्या उत्पादनांतूनच नवीन उत्पादने निर्माण केली. हे सर्व करण्यासाठी  निसर्गानेच मानवी बुद्धीला भारी सर्जनशीलता  देऊन तिची कल्पकता व उत्पादकता वाढवली. निसर्गाच्या सर्जनशीलतेला माणूस जसा छान प्रतिसाद देतो तसा चांगला प्रतिसाद माणसाने माणसाच्या सर्जनशीलतेला द्यायला नको का? माणसा माणसांत अशा सर्जनशीलतेची व त्यातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपदेची व वस्तू, सेवांची आर्थिक देवाणघेवाण योग्य त्या परस्पर सहकार्याने व आर्थिक मोबदल्याने व्हायला हवी!

-ॲड.बी.एस.मोरे©६.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा