https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

आध्यात्मिकतेची मर्यादा!

आध्यात्मिकतेच्या मर्यादा!

लहानपणीचा सगळा अनुभवच वेगळा! देव, धर्म, धार्मिक सण, उत्सव या गोष्टी गोडधोड खाण्यापुरत्याच मर्यादित होत्या. मस्त खायला मिळतेय ना मग त्या सर्व गोष्टी हव्या हव्याशा वाटायच्या. पण त्यामागचा अर्थ कळत नव्हता  व म्हणूनच लहान मुलांमुलीत वाद, भांडणेच होत नसायची. आजूबाजूला माणसे मरायची. पण त्याचेही काही वाटत नसायचे. कारण घरातील आईवडील, भाऊ, बहिणी, चुलते, मामा वगैरे जवळची मंडळी जिवंत असायची. अर्थात मृत्यूचा अर्थच कळत नसायचा. त्यामुळे मनात विरक्ती वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता सगळं कळतंय आणि हे कळणेच फार त्रासदायक झालेय. आजूबाजूला चाललेली जगण्याची प्रचंड मोठी स्पर्धा, अनेक धर्म, पंथ, जातीपाती, हेवेदावे, त्यात पुन्हा प्रत्येकाचे ज्ञान वेगळे, अनुभव वेगळा, परिस्थिती वेगळी, तसेच ताकद वेगळी आणि तरीही समानतेचे तुणतुणे वाजवत भांडत बसायचे! कसली समानता आणि कुठे आहे समानता? त्यात पुन्हा काही वजनदार मंडळींची अघोषित हुकूमशाही सहन करीत लोकशाहीचे गुणगाण गात रहायचे. मग मध्येच कोरोनासारखा विषाणू काय उठतो व  सहा सहा महिने सगळ्यांच्या नाड्या आवळत मोकाट सुटतो, सगळे जनजीवन विस्कळीत करतो आणि आमचे प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान त्यावर उलटसुलट चर्चा करीत राहते. मग पुढे धार्मिक सण काय, उत्सव काय या सगळ्याच गोष्टी थंड होतात. जिथे देवाला शोधायचे ती मंदिरे, त्या मशिदी, ती चर्चेस कड्या, कुलूपे लावून बंद होतात. आणि तरीही आम्ही घरात बसून गो करोना, गो करोना असे म्हणत देवाची प्रार्थना करीत रहायचे. या आध्यात्मिकतेवर स्वतःच बराच अभ्यास केला, स्वतःच स्वतःशी चिंतन, मनन केले, पण ठोस असे काहीच सापडले नाही. शेवटी कळून चुकले की आपले आयुष्यच मर्यादित आहे तर मग या गोष्टीही मर्यादित असणारच! आध्यात्मिकतेलाही मर्यादा आहेत ही गोष्ट कळली हेही नसे थोडके! माझा हा लेख वाचकांना मूळ सत्याची जाणीव करून देणारा न वाटता नकारात्मकता निर्माण करणारा वाटला तर कृपया तो कचरापेटीत फेकून द्यावा. पण त्यावरून मी नैराश्येत म्हणजे इंग्रजीत डिप्रेशन मध्ये वगैरे गेलोय असा कृपया कयास काढू नये. या असल्या गोष्टींची मला आता चांगली सवय झालीय. मी माझी काळजी घेतोय, आपणही आपली काळजी घ्या! आणि हो, माझ्या दृष्टिकोनातून या जगात नकारात्मक, सकारात्मक वगैरे काही नसते! सत्य हे सत्य असते आणि त्याकडे सत्य म्हणूनच बघायला हवे. गुलाबाला गुलाब म्हणून व काट्यांना काटे म्हणूनच बघितले पाहिजे. यासंदर्भात मी इयत्ता सातवीसाठी असलेल्या हिंदी सुलभभारती या पुस्तकातील फूल और काँटे कवितेचा अभ्यास केला असता मला हा अर्थबोध झाला की निसर्ग गुलाबाच्या रोपट्याला समानतेच्या न्यायाने जमिनीतील अन्नद्रव्ये, हवा, पाणी, सूर्यप्रकाश देतो पण त्या रोपट्यातून गुलाबाची फुले व काटे अशा दोन विभिन्न गुणधर्मांचे दोन वेगवेगळे पदार्थ बाहेर काढतो. गुलाबाचे गुण चांगले तर काट्याचे गुण वाईट! कवितेचा सारांश हा की माणसांनी गुलाबाप्रमाणे चांगले वागावे. काट्यां प्रमाणे वाईट वागू नये. पण माझे म्हणणे हे की, निसर्ग माणसांना गुलाबाप्रमाणे चांगले वागू देतो का? माणसाच्या आयुष्यात काटे पेरून निसर्ग माणसाला काय सांगतो की, बघ तुला गुलाबाचे सुख हवे असेल तर अगोदर मार्गातले काटे बाजूला काढ व त्यासाठी हातात शस्त्र घे! ही कसली परीक्षा आणि शिकवण निसर्गाची? यात काय सकारात्मकता व नकारात्मकता घ्यायची निसर्गाकडून? हे माझे वैयक्तिक मत आहे व ते मत इतरांनी पटवून घ्यावे असा माझा बिलकुल आग्रह नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा