https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

श्री रामकृष्ण हरी!

देवाचे अवतार जगण्याची संस्कृती निर्माण करतात!

(१) निसर्ग ही काय स्वतंत्र, स्वयंभू व सार्वभौम अस्तित्व असलेली एखादी वस्तू (एन्टिटि) आहे काय? निसर्ग म्हणजे काय तर अथांग पसरलेले विश्व, सृष्टी! या विश्वाचा धनी कोण? नास्तिक म्हणतील धनी कोणच नाही. पण एक आस्तिक म्हणून मी म्हणेल की निसर्गाला धनी आहे व तो देव आहे आणि हा देव याच निसर्गात आहे. पण तो अदृश्य आहे. त्याचे अस्तित्व माझ्या तर्काला पटते व त्याची जाणीव माझ्या मेंदूला होते. 

(२) हिंदू धर्म संस्कृतीत ब्रम्हा, विष्णू व महेश असे तीन प्रमुख देव त्यांच्या विशिष्ट कार्यानुसार मानले गेले आहेत. खरं तर ही एकाच देवाची तीन रूपे जशी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही एकाच राज्य संस्थेची तीन रूपे! पण निसर्गाचे निर्मिती कार्य ब्रम्हदेवाने पूर्ण केल्यावर त्याचे कार्य संपले व दोनच कार्ये शिल्लक राहिली आणि ती म्हणजे निसर्गाचे भरण, पोषण, संगोपन हे आर्थिक कार्य व याच निसर्गातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींचा नाश करून निसर्गाचे संरक्षण हे दुसरे समांतर राजकीय कार्य! 

(३) माझ्या मते, निसर्ग निर्मिती नंतर देवाची श्री  विष्णू व श्री शंकर ही दोनच रूपे पुढे निसर्गात कार्यरत झाली. फायद्याच्या आमिषाने आर्थिक व्यवहार प्रोत्साहित करणारा देव म्हणजे विष्णू व शिक्षेच्या भीतीने राजकीय व्यवहार नियंत्रित करणारा देव म्हणजे महेश हीच ती दोन देव रूपे! म्हणून तर हिंदू संस्कृतीत ब्रम्हदेवाची मंदिरे दिसत नाहीत. पण सगळीकडे विष्णू नारायणाची व शिव शंकराची मंदिरे दिसतात. आता हिंदू धर्म संस्कृतीत प्रथम पूजली जाणारी श्री गणेश देवता ही बुद्धी देवता आहे जी विष्णू व महेश या देवतांना बौद्धिक मार्गदर्शन करते असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात गणेश हे त्या एकमेव देवाचेच श्री शंकराच्या माध्यमातून निर्माण झालेले एक रूप आहे जे रूप एक बौध्दिक मार्गदर्शक म्हणून ब्रम्हदेवाच्या जागी स्थित झालेय आणि म्हणूनच श्री गणेशाची मंदिरेही सगळीकडे दिसतात.

(४) निसर्गाचा धनी हा एकच देव आहे आणि तो जसा अदृश्य आहे तसे गणेश, विष्णू व महेश हे तीन देवही अदृश्य आहेत. या अदृश्य देवांचा निसर्गाच्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक म्हणून या देवांनी प्रत्यक्ष स्वरूपात अवतार घेणे हे आलेच. पण हिंदू धर्म संस्कृतीत गणेशाचे अवतार दिसत नाहीत. श्री गणेशाला त्याच्या मूळ रूपातच पूजले जाते. श्री शंकराचे खंडोबा, ज्योतिबा सारखे काही अवतार आहेत. त्या शंकर किंवा शिव अवताराची मंदिरेही आहेत. पण शंकराला जास्तीत जास्त त्याच्या लिंगाच्या/पिंडीच्या रूपातच पूजले जाते. मानव रूपात अवतार घेऊन धर्म संस्कृती निर्माण करणारा एकच प्रमुख देव आहे  व तो म्हणजे विष्णू नारायण! याच देवाचे दोन प्रमुख मानव अवतार आहेत आणि ते म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण! रामायणातून श्रीरामाचे आयुष्य पहायला मिळते व मनुष्य जीवनाचे उच्च नैतिक तत्वज्ञान कळते तर महाभारतातून श्रीकृष्णाचे आयुष्य पहायला मिळते व गीतेच्या संदेशातून जशास तसे हे व्यावहारिक तत्वज्ञान कळते.

(५) श्री विष्णू नारायणाने श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या मानव अवतारांतून जगाला जगायची संस्कृती दिली. खोल विचार केला तर रामायण व महाभारतातून कळणारी हिंदू धर्म संस्कृती जी सर्व वेद, उपनिषदांचे सार आहे, ही नुसती भारतीय संस्कृती न राहता जागतिक संस्कृती व्हायला हवी. सद्याच्या आधुनिक काळातील दिवाणी व फौजदारी हे दोन प्रमुख व्यावहारिक कायदे जर अभ्यासायचे असतील तर रामायण व महाभारत वाचा. त्यात तुम्हाला या दोन्ही कायद्यांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. हे दोन कायदे आपणास व्यावहारिक जीवन कसे जगायचे याविषयी नीट मार्गदर्शन करतात व त्यातून जगण्याची संस्कृती निर्माण करतात. श्रीराम व श्रीकृष्ण या विष्णू देवाच्या दोन प्रमुख मानव अवतारांनी अनुक्रमे रामायण व महाभारतातून जगण्याची संस्कृती घालून दिलीय असे माझे वैयक्तिक मत आहे.

श्री गणेशाय नमःII श्री नारायणाय नमःII
श्री शंकराय नमःII ओम् शांतीII

श्री रामकृष्ण हरीII

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

टीपः

हिंदू धर्मशास्त्र व पुराण कथा विस्ताराने लिहीत बसलो तर एक मोठे पुस्तक होईल. मी एका छोट्या लेखात हिंदू धर्म संस्कृतीचा सार लिहिलाय. गणेश पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण किती पुराणे आहेत हिंदू धर्मात? मी अगोदर तीन मुख्य देव घेतले. मग निर्मिती संपल्यावर ब्रम्हदेवाच्या  ठिकाणी गणेशाला आणून बसवले.  केदारनाथ व त्रंबकेश्वर हे अवतार नव्हेत तर ज्योतिर्लिंगे आहेत ही चूक दुरूस्त करतो व खंडोबा बरोबर ज्योतिबा ही अवतार म्हणून लिहितो. पण खंडोबा, ज्योतिबा भारतात किती राज्यात माहित आहेत? म्हणून सर्व देशाला माहित असलेले राम व कृष्ण  या विष्णूच्या दोनच प्रमुख अवतारावर भर दिला आहे. शंकराला लिंग/पिंड स्वरूपी व गणपतीला त्याच्या मूळ रूपातच पूजणे सर्वमान्य आहे. माझे लिखाण हे माझे ओरिजनल स्वतःच्या विचारातून असते व म्हणून प्रत्येक ठिकाणी हे माझे वैयक्तिक मत असे लिहितो. मी रामायण व महाभारतात आधुनिक कायदा पाहतो हे किती लोकांच्या डोक्यात शिरेल? पण मला ती बुद्धी दिलीय. ती तशीच प्रत्येकाला असेल असे नाही. कारण सगळ्यांचे ज्ञान व बुद्धी सारखी नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा