मृत्यूचा वैज्ञानिक अर्थ!
मृत्यूच्या भीती ऐवजी मृत्यूचा अभ्यास करायला या कोरोनाने मला भाग पाडले. मृत्यू तर येणार आहेच, मग त्याला सामोरे जायची तयारी नको का करायला? उगाच काल्पनिक अध्यात्माला किंवा एखाद्या भविष्यवेत्त्याला जवळ करीत आभासात राहून मृत्यूला जवळ करायचे की निसर्गाचे विज्ञान समजून घेऊन सत्य स्वरूपात मृत्यूला जवळ करायचे या दोन्ही पर्यायांत मी विज्ञानाचा पर्याय स्वीकारलाय. कारण मेंदूचे कार्य हे भावनांच्या, कल्पनांच्या, आभासाच्या पलिकडचे आहे. हवेतला प्राणवायू व अन्न, पाण्यातील पोषक द्रव्ये रक्त शोषण करते. याच रक्ताच्या ताकदीने माणूस जगतो. माणसाची फुफ्फुसे व त्याचे हृदय हे अवयव या रक्ताशी संबंधित कार्य करतात. कोरोना विषाणू एकदा का फुफ्फुसांत घुसला की तो हे रक्ताचे मूलभूत कार्यच बिघडवतो. या विषाणूमुळे रक्तच जर खराब म्हणजे विषारी झाले तर मग जीवन कसे शक्य होणार? म्हणून मग रक्त शुद्धीकरणाची औषधे दिली जात असावीत. मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही म्हणून असावीत हा शब्द वापरला आहे. मानवी मेंदू हा दोन भागात विभागला गेलाय. जाणिवेने ऐच्छिक कामे करणारा मोठा मेंदू हा एक भाग व शरीर सुरळीत चालण्यासाठी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनैच्छिक कामे करीत असलेला छोटा मेंदू हा दुसरा भाग! मोठ्या मेंदूला इजा पोहोचून त्या मेंदूची जाणीव नष्ट झाल्यामुळे माणूस कोमात गेला तरी माणूस जिवंत राहू शकतो. पण ते जगणे जाणीव नसलेले असते. अशा जगण्यात फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य चालू असते. कारण त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा छोटा मेंदू व्यवस्थित कार्य करीत असतो. म्हणजे माणूस मोठा मेंदू मृत झाल्याने मरत नाही तर छोटा मेंदू मृत झाल्याने मरतो. कारण छोटा मेंदू मृत झाला की फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य पुढे चालूच शकत नाही. याचा अर्थ हा की, कोरोना फुफ्फुसांतून हृदयाच्या मार्फत रक्तात मिसळतो. मग त्या विषाणूमुळे विषारी झालेले रक्त मोठ्या मेंदूला बाद करते व शेवटी छोट्या मेंदूला बाद करून कोरोनाग्रस्त रूग्णाला मारते. हा माझा अभ्यास आहे. पण मी वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याने असे ठामपणे म्हणू शकत नाही. तरीही माझा हा अभ्यास हवेतला नाही. डॉ. प्रेमानंद रामाणी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मेंदू सर्जनने लिहिलेले मेंदूची ओळख हे पुस्तक माझ्या अभ्यासाचा आधार आहे. कालच न्यायवैद्यक शास्त्रावरील रायबहादूर जयसिंग पी. मोदी या माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकात वेडेपणा म्हणजे काय ही जी माहिती लिहिलीय ती मी फेसबुक पोस्टने वाचकांना सांगितली. आज माझ्या संग्रहातील या दुसऱ्या वैज्ञानिक पुस्तकावर आधारित ही मेंदू व मृत्यू संबंधीची महत्त्वाची माहिती मी आजच्या फेसबुक पोस्टने वाचकांना समाज प्रबोधनाच्या दृष्टीने सांगत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा