ध्यान योग!
गोंधळलेले मन, घाबरलेले मन, भरकटलेले अस्थिर मन अशा मानसिक अवस्थेत ध्येयावर/लक्षावर मन केंद्रित/एकाग्र होण्यासाठी एखादा आस्तिक माणूस देवाची खालीलप्रमाणे छोटीशी पूर्व प्रार्थना करून देवाकडे एकाग्रतेची याचना करू शकतो.
"प्रभो दया!"
मात्र त्यासाठी देवाचा आभास नको, तर त्यावर ठाम विश्वास हवा!
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवीला!
प्रभो नामाचा गजर करीत ईश्वरावरील ठाम विश्वासाचा झेंडा घट्ट रोवून स्वतःचे मन निश्चित ध्येयावर (लक्षावर) केंद्रित (एकाग्र) करण्याची कृती म्हणजे निसर्गाच्या अदृश्य शक्तीला किंवा चैतन्याला (अदृश्य ईश्वराला) मनात एकवटून निश्चित ध्येय गाठण्याची कृती! निसर्गातील ईश्वर शक्तीला (चैतन्याला) म्हणजेच देवाला आकार, रंग, रूप नसल्याने त्या चैतन्यमय शक्तीला काल्पनिक आकार, रंग, रूप देऊन त्या प्रतिमेचा आभास मनात निर्माण केल्याने मनाची एकाग्रता साध्य करणे कठीण! असा आभास निर्माण न करता ईश्वर शक्तीला किंवा निसर्गातील चैतन्याला मनात एकवटून एकाग्रता साध्य करण्याच्या योगाला ध्यान योग म्हणता येईल. असा ध्यान योग डोळे मिटून नाही तर ध्येयावर/लक्षावर नजर रोखून करावा लागतो. नेमबाजी ही याच ध्यान योगाने डोळे उघडे ठेऊन शिकतात, डोळे बंद करून नव्हे! पण नेमबाजी शिकण्यासाठी मनुष्याला आस्तिक असण्याची गरज नसते. नास्तिक मनुष्यही सर्व शक्ती एकवटून मनाची एकाग्रता साध्य करू शकतो. त्या शक्तीला आस्तिक मनुष्य ईश्वर म्हणेल तर नास्तिक मनुष्य निसर्गाची शक्ती म्हणेल एवढाच काय तो आस्तिक व नास्तिक यांच्यातील फरक!
-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०
टीपः माझा कोणीही ऐहिक किंवा आध्यात्मिक गुरू नसल्याने मी स्वतःच स्वतःवर स्वतःच्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर असे प्रयोग करीत असतो. माझे ज्ञान व अनुभव अपुरे असल्याने असे प्रयोग हे प्रयोगच मानावेत, ते सत्य किंवा सिद्धांत मानू नयेत ही नम्र विनंती!
-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा