https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

माझ्या मनातील वकिलाचे अंतरंग!

माझ्या मनातील वकिलाचे अंतरंग!

निसर्गाचे विज्ञान जसे सर्वसमावेशक तसा याच विज्ञानाचा भाग असलेला कायदा हा सुद्धा  सर्वसमावेशक हे माझे वैयक्तिक मत! कायदा सर्व विषयांना स्पर्श करतो व सर्व विषयांवर बोलतो. म्हणून वकिलांनी कायद्याची कलमे, त्याखालील केसेस, कोर्टांचे न्यायनिर्णय या परिघाबाहेर जाऊन विचार व लिखाण करूच नये या मताशी मी सहमत नाही. माझे विचार व लिखाण हे शेरशायरी, प्रेमकहाण्या, प्रेमगीते या स्वरूपाचे नसते. ते विज्ञान व कायदा यासंबंधी असल्याने गंभीर स्वरूपाचे असते. निसर्गाचा पर्यावरण कायदा हा माझा आवडीचा विषय. पण निसर्गाच्या पर्यावरणात मानव समाजाचे सामाजिक पर्यावरणही येते म्हणून निसर्गाचा मूळ नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यास करण्यात मला रस आहे. या थोड्या हटके असलेल्या तुलनात्मक अभ्यासातूनच धर्म, अर्थकारण, राजकारण यासारख्या विविध विषयांना माझ्याकडून हात घातला जातो. पण म्हणून मग त्यातून निर्माण होणारे माझे विचार व त्यावर आधारित माझे लिखाण इतर लोकांना सोडा पण वकिलांनाही जेंव्हा भरकटलेले व अनावश्यक वाटू लागते तेंव्हा विषय गंभीर होतो. असाच अनुभव मला वकिलांच्या एका ग्रूपवर आला व तसाच अनुभव शिक्षकांच्या एका दुसऱ्या ग्रूपवरही आला. झाले काय की, निसर्ग, निसर्गाची व्यवस्था व त्या व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन हा लेख मी या दोन्हीही  ग्रूप्सवर शेअर केला. व्यवस्था म्हणजे कायदा आला व तो समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे यात शिक्षण आले. म्हणून हा लेख मी एका वकिलांच्या व दुसऱ्या एका शिक्षकांच्या ग्रूपवर शेअर केला. पण आश्चर्याची बाब ही की, वकिलांच्या ग्रूप ॲडमिनने "हा वकिलांचा ग्रूप आहे, इथे या अनावश्यक गोष्टी नकोत" अशी कमेंट केली तर शिक्षकांच्या ग्रूप ॲडमिनने  "यात शैक्षणिक ते काय" अशी कमेंट केली. मी लगेचच त्या दोन्ही ग्रूप ॲडमिनची माफी मागून त्या दोन्ही ग्रूप्सला सोडचिठ्ठी दिली आणि लगेच  तिथून मोकळा झालो. दीर्घ अनुभव व सतत अभ्यास यातून निर्माण झालेले विचार हे लेख रूपात मेहनतीने मांडायचे व त्यावर पुन्हा वाद ओढवून घ्यायचा असल्या "आ बैल मुझे मार" प्रकारात मला बिलकुल रस नाही. त्यामुळे ज्या ग्रूप्सवर माझ्या लिखाणाचे स्वागत होते तिथेच मी माझ्या फेसबुक खात्यावर व माझ्या पेजवर लिहिलेले लेख, विचार शेअर करणार.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा