https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

वैचारिक धरसोड वृत्ती!

वैचारिक धरसोड वृत्ती!

निसर्गाचे मूलभूत विज्ञान एका बाजूला आणि मानवी भावना व बुद्धीचा धर्म दुसऱ्या बाजूला असे होऊ शकते. धर्म म्हणजे तरी काय तर मानवी मनात असलेल्या उच्च नैतिक भावनांची सांगड मानवी मनाच्या मूलभूत वासनांबरोबर घालून तयार झालेला मानवासाठीचा कायदा जो इतर प्राणीमात्रांपासून वेगळा असतो. हा धर्म किंवा कायदा तयार करण्यासाठी मानवी बुद्धीला वासना व भावना यांची सांगड घालावी लागते व तशी सांगड घालताना स्वतःची एक तात्त्विक बैठक तयार करावी लागते. ही बैठक म्हणजेच बुद्धीचे तत्त्वज्ञान! मानव समूहात अनेक धार्मिक व अधार्मिक तत्वज्ञाने आहेत. याचे कारण म्हणजे सगळ्या लोकांची बुद्धी समान पातळीवर कार्य करीत नाही. म्हणजे सर्व लोकांना सारखे ज्ञान मिळाले तरी सर्वांची बुद्धी त्या समान ज्ञानावर समान कार्य करीलच असे नसते. म्हणून तर जगात अनेक धर्म आहेत व तसेच अनेक तत्वज्ञाने सुद्धा आहेत. म्हणून मग सर्व लोकांसाठी एक समान कायदा असावा अशी संकल्पना पुढे आली. याच संकल्पनेवर कायद्याचे राज्य ही संकल्पना उभी आहे. प्रश्न असा आहे की असा समान कायदा समाजात समान विचारधारा निर्माण करण्यात यशस्वी होतो का? तर याचे उत्तर होय ही आहे व नाही ही आहे. कारण तसे असते तर मग समाजात वाद निर्माण झाले नसते. किती संख्या आहे कायद्यांची व न्याय निर्णयांची! खालपासून वर सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक न्यायालये का निर्माण करावी लागली? याचे कारण म्हणजे वकील व न्यायाधीश यांची बुद्धी समान पातळीवर कार्य करील याची शास्वती नसते. इथे मुद्दा बुद्धीच्या वैचारिक धरसोडीचा आहे. तुम्ही आस्तिक असाल तर तुम्ही तसे का आहात याबद्दल तुमची ठाम वैचारिक/तात्त्विक बैठक असायला हवी. तुम्ही नास्तिक असाल तर त्या बाबतीतही तुमची ठाम वैचारिक/तात्त्विक बैठक असली पाहिजे. आज एक विचार, उद्या दुसरा विचार याला वैचारिक धरसोड वृत्ती म्हणतात. अशा धरसोड वृत्तीच्या माणसावर लोक विश्वास ठेवत नाहीत. अशा धरसोड वृत्तीला बुद्धीचा वैचारिक गोंधळ कारणीभूत असतो. बुद्धीला जेंव्हा मूलभूत वासना (बेसिक इन्स्टिंक्टस) व उच्च भावना यांची संतुलित सांगड कशी घालायची हे नीट सुचत नाही तेंव्हा बुद्धीचा वैचारिक गोंधळ उडतो. मनातील बुद्धीचा गोंधळ हे बुद्धीची वैचारिक/तात्त्विक बैठक पक्की नसल्याचे लक्षण असते. अशा गोंधळामुळे ठाम कृती करणे अवघड होऊन बसते. पण तरीही कट्टर वैचारिक भूमिका ही एककल्ली असते. ती दुसऱ्याचे ऐकूनच घेत नाही. म्हणून वैचारिक  दृष्ट्या मवाळ असणे हे कधीही चांगलेच! पण मवाळ असणे म्हणजे बौध्दिकदृष्ट्या गोंधळी असणे नव्हे. माणसाला स्वतःची वैचारिक/ तात्त्विक बैठक नीट बसवता आलीच पाहिजे. ती पक्की झाल्यावर मग तिच्याशी प्रामाणिक व ठाम राहिले पाहिजे. वैचारिक धरसोड वृत्तीमुळे समाजालाच नाही तर स्वतःलाही त्रास होतो. अशा वैचारिक धरसोड वृत्तीमुळे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होऊन जाते!

-ॲड.बी.एस.मोरे©५.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा