https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

दिवस तुझे हे फुलायचे!

दिवस तुझे हे फुलायचे!

ये कली जब तलक फूल बनके खिले, इंतजार इंतजार इंतजार करो, हे हिंदी गीत आठवतेय का? आये दिन बहार के या हिंदी चित्रपटात धर्मेंद्र व आशा पारेख यांच्या सुंदर कलाकारीचा आनंद देणारे हे मस्त युगुल गीत! मराठीतही दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, हे अरूण दाते यांनी गायलेले एक सुंदर गीत आहे. साठी पार केलेली मंडळी जेंव्हा एकांतात मागे वळून बघत असतील तेंव्हा त्यांना त्यांचे ते मस्त बालपण नक्कीच आठवत असेल. मी आज असाच एकांतात बसलो असताना बालपणीच्या त्या गोड आठवणीत रमलो. साधारण १९६१ ते १९६३ या तीन वर्षांच्या काळात पूर्व प्राथमिक शाळेत झालेली ती अक्षर ओळख, मग १९६४ ते १९७० या सात वर्षांच्या काळात प्राथमिक शाळेत वाक्ये व वाक्यांचा अर्थ, पुढे १९७१ ते १९७४ या चार वर्षांच्या काळात माध्यमिक शाळेत जगाची ओळख, मग पुढे १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात बी.कॉम., पुढे १९८० ते १९८२ या तीन वर्षांच्या काळात इंटर कंपनी सेक्रेटरी कोर्स आणि शेवटी १९८३ ते १९८५ या तीन वर्षांच्या काळात एलएल.बी. म्हणजे ३+७+४+४+३+३=२४ वर्षे मी शिक्षण घेत होतो. मग पुढे नोकरी, व्यवसायात जगाचा प्रत्यक्ष अनुभव, मग त्या मूलभूत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची परीक्षा व प्रगल्भता आणि तसेच मनाची परिपक्वता! बापरे, केवढा मोठा हा जीवन फुलण्याचा प्रवास! पण ज्ञानाच्या  प्रवासात पूर्व प्राथमिक शाळेत मी जेंव्हा कळी होतो तो अनुभव खूपच सुखद होता. तसाच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुभवही कळी हळूच उमलण्याचा गोड अनुभव. पुढील उच्च शिक्षणाचा अनुभव हा कळी फुलण्याचा म्हणजे तारूण्याने बहरण्याचा अनुभव. मग पुढे विवाह, संसार म्हणजे कळीचे फूल झाल्यानंतर त्या फूलाचा हसण्या, खेळण्याचा मोठा अनुभव तर आता सद्या ६४ व्या वयात माझे फुललेले फूल सुकण्याचा, कोमेजण्याचा थोडासा दुःखद अनुभव. खरंच काय पण जीवनचक्र बनवलेय निसर्गाने, सगळंच आश्चर्य! आज मी माझ्या जीवनाचे फूल सुकत असताना जेंव्हा मागे वळून बघतो तेंव्हा पूर्व प्राथमिक शाळेतील माझीच ती कळी मला परत मागे ये म्हणून पुन्हा पुन्हा खुणावतेय. पण मी तिच्याकडे प्रत्यक्षात जाऊ शकत नाही. पण तरीही महान निसर्गाचा मी खूप आभारी आहे. कारण त्याने ती कळी माझ्या मेंदूत अजूनही जिवंत ठेवली आहे. मी आजही तिचा आनंद घेऊ शकतो. काय मजा आहे बघा! मी माझ्याच बालपणीच्या कळीचा आनंद आजही घेऊ शकतोय व तो घेतानाच मी फूलाचाही आनंद घेतोय. हा आनंद इतका मोठा आहे की माझे फूल हळूहळू सुकत चाललेय हे दुःख या आनंदापुढे फिके झालेय!

-ॲड.बी.एस.मोरे©५.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा