अनंत चतुर्दशी, आज गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देताना!
आज मंगळवार दिनांक १ सप्टेंबर, २०२० हा अनंत चतुर्दशीचा दिवस! कोरोनाची जागतिक साथ नसती तर लालबागच्या राजासह मुंबई, पुणे व इतर शहरांतील मोठे गणपती आज वाजत गाजत विसर्जनासाठी निघाले असते. रस्ते गणेश भक्तांनी ओसंडून वाहिले असते. मुंबईतील मोठ्या गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. केवढा मोठा जनसागर लोटतो तिथे! मी माझ्या शालेय व कॉलेज जीवनात बाप्पाची मोठी विसर्जन मिरवणूक लॕमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या गेटवर बसून बघायचो. कारण त्या पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस चाळीत आमच्या ओळखीचे पोलीस मित्र राहात होते. त्यामुळे तिथे त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यांबरोबर त्या गेटवर बसून हळूहळू पुढे सरकणारे मोठे गणपती बघायचो. समोरच असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक जाडजूड मुलगा एकेक गणपती तिथे येऊन थांबला की मग मस्त नृत्य करायचा. त्याच्या नृत्याकडे बघत गणेशोत्सव मंडळाची माणसेही नाचायची. आता तो मुलगा माझ्या सारखाच वृद्ध झालाय. दोन वर्षापूर्वी गणपती विसर्जन मिरवणूकीत तिकडे गेलो होतो तेंव्हा तो वृद्ध झालेला मुलगा आजारी असून अंथरूणावर खिळला असल्याचे कळले. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. पण मी त्यावेळी वयाची लाज न बाळगता लहान होऊन विसर्जन मिरवणूकीत नाचलो होतो. कोणी काही का म्हणेना पण गणपती बाप्पा जाताना मनाला वाईट वाटते हे मात्र नक्की! यामागे खूप मोठी आध्यात्मिक भावना आहे. दरवर्षी माणसे जन्म घेतात व मरतात. मरतात म्हणजे ती अनंतात विलीन होतात. ब्रम्हांड म्हणा नाहीतर अंतराळ म्हणा ते अनंत आहे. मेल्यावर त्या अनंतात विलीन व्हायचे. अनंत चतुर्दशी मधला अनंत शब्द हा त्या अनंताचेच प्रतीक असावा. गणेश मूर्तीचे विसर्जन म्हणजे या जगात जे जे नित्य नियमाने निर्माण होते त्याचा हळूहळू ऱ्हास होत नित्य नियमाने ते अनंतात विलीन होते असा अर्थ घेता येईल. त्याच निसर्ग नियमाने गणपती बाप्पा येतो, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याबरोबर राहतो व शेवटी आपला निरोप घेऊन अनंत चतुर्दशी दिवशी अनंतात विलीन होतो तो कायमचा नाही तर पुन्हा पुढील वर्षी परत येण्यासाठी! निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारी किती छान आध्यात्मिक कल्पना व श्रद्धा! यातला अर्थ ज्यांना कळत नाही त्यांनी या श्रद्धेला अंधश्रध्दा म्हटले तरी त्याची लाखो गणेश भक्तांना पर्वा नसते. ही आध्यात्मिक देव श्रद्धा पिढ्यानपिढ्या अशीच चालू राहणार यात शंकाच नाही. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील गावी छोटे गणपती सुद्धा अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जित होतात. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला माझी एवढीच प्रार्थना आहे की बाबा रे, तू जाताना तुझ्याबरोबर त्या विषारी कोरोनाला घेऊन जा व त्याला अनंतातच गाडून टाक म्हणजे मग आम्हाला मोकळा श्वास घेता येईल. मग पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला तुझे मस्त स्वागत करू. तुझ्या पुढे नाचू, गाऊ! हे २०२० वर्ष या कोरोना विषाणूने पार विषारी करून टाकले रे! तू विघ्नहर्ता आहेस! तूच या विषाणूचा नाश करशील अशी आमची श्रद्धा आहे. तुला निरोप देताना वाईट वाटतेय. पण पुढच्या वर्षी मात्र तुझा उत्सव जंगी होणार हे नक्की!
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा