https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सगळेच ज्ञान व्यवहारात उपयोगी येत नाही!

सगळेच ज्ञान व्यावहारिक होत नाही!

आपला मोठा मेंदू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खूप काही ज्ञान साचवत जातो. या ज्ञानात माणसेही असतात. पण सगळ्याच ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येत नाही. व्यवहार म्हटले की पैसा आला. पैसा नसेल तिथे कसला व्यवहार? पण काही व्यवहार हे पैशाशिवाय असू शकतात. अशा व्यवहारात पैशाची नसली तरी प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होत असते. पण शेवटी असे संबंध भौतिक संपत्तीशी निगडीत असल्याने ते व्यावहारिकच असतात. पण आपण मिळविलेले सगळेच ज्ञान व्यावहारिक होऊ शकत नाही. माझी मूलभूत पदवी कॉमर्सची. पण सुरूवातीला अकाऊंटस क्लार्क म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी कंपनी सेक्रेटरी कोर्सचे इंटर पर्यंतचे शिक्षण घेतले. काही महिनेच कंपनी सेक्रेटरी सहाय्यक म्हणून काम केले व नंतर ते बंद झाले. त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी एलएल. बी. करून वकिली सुरू केली. मूलभूत बी.कॉम. पदवी नंतरच्या तीन वर्षाच्या कायद्याच्या मोठ्या  अभ्यासक्रमात अनेक कायद्यांचा अभ्यास केला पण वकिली सगळ्या कायद्यांत करता आली नाही. आता तर फक्त मालमत्ता कायद्यातच वकिली करतोय व तीही पार्ट टाईम. म्हणजे कायद्याच्या एकूण ज्ञानापैकी फक्त पाच ते दहा टक्के ज्ञानाचाच पैसे कमावण्यासाठी मला सद्या उपयोग होतोय. म्हणजे कायद्याचे बाकीचे ९० टक्के ज्ञान व्यवहारशून्य झाले. जी गोष्ट माझ्या शैक्षणिक ज्ञानाची तीच गोष्ट माणसांची. माझ्या आयुष्यात खूप माणसे आली. पण खूप मोठ्या कष्टाने मिळविलेल्या माझ्या शैक्षणिक ज्ञानाला आर्थिक किंमत देऊन मला पैसा कमवू देणारी माणसे किती मिळाली तर पाच टक्के सुद्धा नाहीत. या पाच टक्के माणसांचाच व्यावहारिक उपयोग झाला. बाकीची ९५ टक्के माणसे ही व्यावहारिक बनू शकली नाहीत. या माणसांत आईवडील, बहीणभाऊ, बायको व मुलगी व इतर नातेवाईक यांना वगळले आहे. कारण अशा जवळच्या नात्यांत व्यवहारापेक्षा माया, प्रेमाला जास्त महत्व असते. माझ्याशी मैत्री केलेले मित्र हळूहळू दूर झाले. म्हणजे दहा ते वीस मित्रांपैकी आता फक्त दोन ते पाचच मित्र शिल्लक राहिले. तेही आता माझ्या सारखे वृद्ध होऊन आपआपल्या संसारात, त्यांच्या मुला मुलींच्या संसारात, नातवंडात मग्न आहेत. मला अधूनमधून फोन करून तब्बेतीची चौकशी करतात एवढीच काय ती त्यांची आता मैत्री उरलीय. या सर्वाचा सार काय तर माणूस जे काही ज्ञान मिळवतो ज्यात माणसेही आली त्याचा व्यावहारिक उपयोग फार म्हणजे फारच कमी होत असतो. मग मोठ्या मेंदूत साचलेल्या इतर ९० ते ९५ टक्के ज्ञानाचे करायचे काय? तर त्या ज्ञानाचा आवडता छंद जपण्यासाठी उपयोग करून त्यातून स्वतःसाठी मानसिक समाधान, आनंद मिळवायचा. माझे फेसबुक लिखाण हे माझ्या त्या छंदाचा, आनंदाचा भाग आहे जिथे मी माझे ९५ टक्के ज्ञान फुकट शेअर  करीत आहे. फुकटच म्हणायचे कारण या मुक्त लिखाणातून मला पैसा मिळत नाही. अर्थात माझ्या लिखाणाचा व्यावहारिक उपयोग शून्य आहे. पण तरीही माझे हे लिखाण मला आनंद देत असल्याने ते व्यर्थ जात आहे असे सुद्धा  म्हणता येणार नाही. कारण मानसिक आनंद, समाधानाची पैशात किंमत करता येत नाही. तीच गोष्ट माणसांची! माझ्या ओळखीची जी काही माणसे आहेत त्यापैकी आता फार थोडी माणसे व्यावहारिक उपयोगासाठी शिल्लक राहिली आहेत. बाकीची फक्त अधूनमधून हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शिल्लक आहेत. त्यातूनही काही माणसे गप्पा मारता मारता स्वतःचेच काहीतरी पुढे दामटतात. हे दामटणे अती झाले की मग त्या गप्पांचा उपद्रव होतो. मग अशा माणसांना मला हळूच बाजूला करावे लागते, नव्हे कायमचे ब्लॉकच करावे लागते. धड व्यवहार नाही, धड मानसिक आनंद नाही, उलट उपद्रवच! कशाला हवीत अशी उपद्रवी माणसे केवळ ओळख म्हणून जवळ? ज्ञानाचा वारंवार उपयोग झाला नाही तर मोठा मेंदू असे निरूपयोगी ज्ञान हळूहळू डिलीट करतो. तेच काम तो माणसांविषयीही करतो कारण माणसे ही सुद्धा ज्ञानाचाच एक भाग असतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.८.२०२० 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा