https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

निसर्ग व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन!

निसर्ग, निसर्गाची व्यवस्था व त्या व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन?

(१) मानवी मन इतर प्राणी मात्रांपासून बरेच वेगळे आहे. ते त्याचा मूळ गुणधर्म व त्याची निसर्गाशी असलेली नाळ विसरून स्वतःला जरा हटके सवयी लावून घेते व पुढे त्या सवयींचे गुलाम बनते. या विशेष सवयी जेंव्हा एका बरोबर अनेक माणसांना लागतात तेंव्हा त्यांना त्या मानव समूहाकडून संस्कृती असे गोंडस नाव दिले जाते. मग त्या समूहातूनच काही खास माणसे पुढे येतात व अशा संस्कृती रक्षणाचा ठेका स्वतःकडे घेतात. त्यांना संस्कृती रक्षक म्हणतात. त्यांच्या विरूद्ध कोणी बोलायची हिंमत करू शकत नाही व जर कोणी केलीच तर त्याचा झुंडबळी होण्याची भीती असते.

(२) मोठमोठया शास्त्रज्ञांना सातत्याने प्रयत्न करूनही विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येणारा निसर्गाचा मेंदू कुठे आहे हे शोधता आले नाही. तसेच मोठमोठया साधूसंतांना सातत्याने भक्तीमार्गावर राहूनही देवाचा आत्मा(परमात्मा) निसर्गात कुठे आहे हे शोधता आले नाही. याचा अर्थ हाच घ्यावा लागेल की निसर्गाला एकतर स्वतंत्र मेंदूच नाही किंवा निसर्गात देवच नाही. हा झाला नास्तिक विचार. आस्तिक विचाराने निसर्गाला स्वतंत्र मेंदू आहे किंवा निसर्गात देव आहे असे समजावे तर मग असेही म्हणता येईल की हा निसर्गाचा मेंदू किंवा निसर्गातला परमात्मा (देव) मानवी मेंदूच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहे. निसर्ग मेंदू किंवा देव अशाप्रकारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे मानवी मेंदूच्या फोनमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा निसर्गाच्या मेंदूचे किंवा निसर्गातील देवाचे (परमात्म्याचे) क्षेत्रच मुळात मानवासह निसर्गातील सर्व पदार्थांना निषिद्ध क्षेत्र म्हणून संरक्षित केले गेले आहे. असे जर असेल तर मग विज्ञान किंवा धर्म यातील मूलभूत गाभाच मानवी मेंदू पासून फार अलग, विलग, अलिप्त आहे हे लक्षात घ्यायला हवे.

(३) अशा परिस्थितीत मानवी मेंदूला निसर्ग व निसर्गाची व्यवस्था जमेल तितकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. निसर्गाची व्यवस्था तयार आहे. पण मानवी मेंदूला एकतर त्या व्यवस्थेचे पूर्ण ज्ञान नाही किंवा जे काही ज्ञान प्राप्त झालेय (ज्याला विज्ञान म्हणतात) त्याच्या जोरावर त्या निसर्ग व्यवस्थेचे नीट व्यवस्थापन करणे मानवी मेंदूला जमत नाही किंवा असेही असेल की अती स्वार्थामुळे मानवी मेंदू या तयार निसर्ग व्यवस्थेची वाट लावण्यात आनंद मानतोय.

(४) या लेखाच्या सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे मानवी मेंदूला लावावी तशी सवय लागते. तो स्वतःच निर्माण केलेल्या कल्पनांना कवटाळून स्वप्नाळू बनतो, स्वतःच लावून घेतलेल्या काही सवयींना चिकटून त्या सवयींचा गुलाम बनतो आणि स्वतःच निर्माण केलेल्या वादांशी झुंजत स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतो. मानवी मेंदूचे आयुष्य तेच माणसाचे आयुष्य. मानवी मेंदू मेला की माणूस मरतो. यालाच इंग्रजीत ब्रेन डेथ म्हणतात.

(५) निसर्गाने मानवी मेंदूलाच मानवी जीवनाचे  शिल्पकार बनविले आहे. मानवाला निसर्गाने दिलेली ही एक मोठी संधी आहे. पण ही संधी देताना निसर्गाने सगळ्या माणसांना सारखी परिस्थिती दिली नाही व त्यामुळे सर्वांना समान संधी व समान कायदा असूनही सर्व माणसांना निसर्गाकडून समान नैसर्गिक न्याय मिळत नाही. याला त्या निसर्गाचा दुजाभाव म्हणावे की आणखी दुसरे काही? एवढे मात्र निश्चित की, निसर्गाने माणूस नावाच्या प्राण्याला इतर प्राण्यांपासून चांगल्या स्थितीत ठेवले आहे. त्याच्या व्यवस्थेत थोडीफार छिद्रे ही राहणारच. त्यांच्याशी माणसाला जुळवून घ्यावे लागणार. निसर्ग व्यवस्थेचे व्यवस्थापन हे मानवी मेंदूपुढे मोठे आव्हान आहे हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा