https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

रामायण व महाभारत!

रामायण व महाभारत!

हिंदू धर्मात लोकप्रिय असलेले महाभारत हे महाकाव्य महर्षी वेदव्यास यांनी रचले व बुद्धी देवता श्रीगणेश यांनी लिहिले अशी मान्यता आहे. या महाभारतात कौरव पांडवांचे जे महायुद्ध झाले त्या युद्धाच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली. ती संजय यांनी त्या काळात प्रगत असलेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने (दूरदर्शन) ऐकली व ती धृतराष्ट्राला सांगितली. ती धृतराष्ट्र यांनी ऐकली ती त्यांची झाली श्रुती (कानाने श्रवण करणे) व ती त्यांनी स्मरणात ठेवली. मग पुढे त्या श्रुती, स्मृतीच्या माध्यमातून महाभारत कथा व त्यातील गीतेचे तत्वज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे सरकत गेले. हिंदू धर्मग्रंथांचा आधारच मुळात श्रुती व स्मृती आहे व म्हणून हिंदू ही एक सांस्कृतिक जीवनशैली बनून पुढे चालत आली आहे. मूळ कायद्यावर जसे वकील कारणमीमांसा देत विश्लेषणात्मक ग्रंथ (कमेंटरी) लिहितात तसाच ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला टीकात्मक (म्हणजे विश्लेषणात्मक) हिंदू ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ किंवा विनोबा भावे यांचा गिताई हा ग्रंथ हे असेच गीतेवरील विश्लेषणात्मक ग्रंथ आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, लो. टिळक, विनोबा भावे यांना गीतेचे भाष्यकार असे म्हणता येईल. पण महाभारत व गीता या दोन्हींचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. त्यांचे मूळ श्रुती व स्मृती हेच आहे.

हिंदू धर्मात प्रिय असलेले रामायण हे आणखी एक महाकाव्य आहे. या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली व ते लिहिलेही त्यांनीच असे मानावे लागेल. कारण लेखक म्हणून श्रीगणेश वाल्मिकी ऋषींच्या मदतीला होते का याचा उल्लेख माझ्या तरी वाचनात आला नाही. रामायण वाल्मिकींनी रचले, लिहिले पण ते श्रीराम सीतेची मुली लव व कुश यांनी जनमानसात सांगून पसरवले. त्यामुळे लव कुश यांनाच रामायणाचे मूळ भाष्यकार म्हणता येईल. पण रामायण महाकाव्याचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. म्हणजे इथेही श्रुती व स्मृती या गोष्टी आल्या ज्यातून रामायण पिढ्यानपिढ्या पुढे सरकले. पण रामायण या महाकाव्याचे पुढील टीकाकार (विश्लेषणात्मक भाष्य करणारे लेखक) कोण हे सापडत नाही. पण महर्षी वाल्मिकी या मूळ रचनाकाराबरोबर भृगु ऋषी यांनीही रामायणावर टीकात्मक म्हणजे  विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला असे सहज वाचण्यात आले होते. पण मी भृगु ऋषी लिखित रामायणाचा एक शब्दही वाचलेला नाही.

रामायण अगोदर घडले व त्यानंतर महाभारत घडले असे म्हणतात. दोन्ही महाकाव्यात धनुष्य बाण, गदा, तलवारी ही आयुधे व घोडे, रथ ही वाहने बघायला मिळतात. आता रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ झाले असून ते हिंदू जीवनशैलीचा भाग झाले आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा