https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

बी.डी.डी. चाळी!

पुनर्विकासानंतर मुंबईतील सर्व बी.डी.डी. चाळी इतिहासजमा होणार!

मित्रांनो, ही आहे परळ, दादर जवळील नायगावची एक बी.डी.डी. चाळ. मी तिचा बाहेरून व आतून फोटो घेतला कारण बी.डी.डी. चाळीशी माझे बालपण व थोडेसे तरूणपण जोडले गेले आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजे वरळी, डिलाईल रोड, नायगाव वगैरे ठिकाणी बांधल्या गेलेल्या या चाळी सगळीकडे अगदी एकसारख्या आहेत. या चाळीतील एकेक खोली एकदम छोटी म्हणजे १०×१२ म्हणजे १२० चौ.फूटाची. तळ, पहिला, दुसरा, तिसरा अशा चार मजल्यांच्या या चाळीत प्रत्येक मजल्यावर २० खोल्यांनुसार एकूण ८० खोल्या. प्रत्येक मजल्यावर इकडून १० व तिकडून १० अशा खोल्यांच्या मधोमध ऐसपैस व्हरांडा ज्याला वटण असेही म्हणतात. या वटणात आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील खोलीच्या बाहेर मी माझे अंथरूण टाकून झोपायचो. आई सकाळी शाळेत जाण्यासाठी व नंतर काॕलेजला जाण्यासाठी मला ६ वाजता झोपलेले शरीर अलगद हलवून उठवायची. मजल्यावर मधल्या भागात २० खोल्यांच्या सामूहिक वापरासाठी मधला नळ व शौचविधी साठी स्त्रियांसाठी ३ व पुरूषांसाठी ३ असे दोन्ही बाजूला सार्वजनिक संडास. एकेका खोलीत एक कुटुंब म्हणजे आईवडील व साधारण ४ मुले असा गरीब गिरणी कामगाराचा संसार गिरणगावातील बी.डी.डी. चाळीत थाटलेला. तो अनुभवच फार वेगळा होता जो मला माझ्या वृद्धापकाळीही विसरता येत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा