https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

तुलना नको!

तुलना नको!

प्रसिद्ध वकील श्री. राम जेठमलानी ९४ वयापर्यंत सुप्रीम कोर्टात वकिली करीत होते. आताही मुंबई हायकोर्ट व इतर कोर्टात नव्वदी पार केलेले वकील कोर्टाच्या केसेसमध्ये सक्रिय आहेत. पण वय लांबले व जीवन सक्रियता लांबली म्हणून निसर्ग कोणाला सोडत नाही. शेवटी निसर्ग त्याचा इंगा दाखवतोच. गानसम्राज्ञी लता मंगेशकर दीर्घकाळ जगल्या व दीर्घकाळ गात होत्या. पण एक काळ असा आला की त्यांना त्यांनी गायलेलेच एखादे गाणे थोडे गायला विनंती केली तरी त्या हात जोडून नम्रपणे नकार द्यायच्या. देवानंद खूप वर्षे जगला व चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहिला पण शेवटी त्याला माघार घेऊन गप्प बसावेच लागले. प्रसिद्ध किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा तो आवाज किती गोड व खणखणीत होता. नुसते ऐकतच रहावे. पण तो आवाजही हळूहळू निसर्गाने क्षीण केला. निसर्ग हा असा वयानुसार प्रत्येकाला गप्प बसवतो. जास्त वय जगणे म्हणजे वय लांबणे व ऐंशी, नव्वदी नंतरही सक्रिय राहता येणे हे निसर्गाचे अपवाद आहेत. त्या अपवादांची तुलना सर्वसाधारण नियमांशी करू नये. अपवाद हे शेवटी अपवादच असतात. उगवता सूर्य निरागस बाळासारखा, दुपारचा तळपता सूर्य तरूणांच्या सळसळत्या रक्ताचा व त्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहाचा तर मावळतीचा सूर्य आता पूर्वीसारखी हालचाल जमत नाही म्हणून केवळ नाईलाजास्तव गप्प बसाव्या लागणाऱ्या वृद्धांचा. काही वृद्धांच्या मावळतीच्या कळा थोड्याफार लांबतात म्हणून त्यांनी सत्तरीतच गळाटलेल्या वृद्धांसमोर त्यांचे ते आभासी तरूणपण व त्यातला तो आभासी आनंद नाचवू नये. त्यांची पण ती गप्प बसण्याची वेळ येणार असते. एका तरूण फेसबुक मित्राने माझी थोडी मरगळ बघून मला एक सूचना केली की मी गाण्यावर नाच करून आपले तारूण्य दाखवित व्हिडिओ बनवणाऱ्या ग्रुपला जाॕईन व्हावे. माझ्या वैचारिक पोस्टस न वाचताच असले सल्ले देणाऱ्या फेसबुकी मित्रांना काय म्हणावे. मी ज्येष्ठ वकील आहे. माझा वकील मित्रांचा व मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांचा मोठा ग्रूप आहे. पण तिथे वयानुसार मी जमेल तेवढाच सक्रिय असतो. या समाज गटांना संलग्न असणे हे ज्ञानाचे व सन्मानाचे काम आहे. गाणी गाणे किंवा नाच करणे या गोष्टी माझ्यासाठी नाहीत हे यांना कळत कसे नाही? तात्पर्य काय की कोणीही कोणाशी तुलना करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा