https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २८ जानेवारी, २०२४

भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे!

भौतिक स्पर्धा व मानसिक आरोग्य!

या पदार्थीय सृष्टीतील विविध निर्जीव वस्तू पदार्थ व सजीव वनस्पती, प्राणी, माणसे या सर्वांबरोबर वैज्ञानिक निसर्ग नियमांनुसार प्रमाणबद्ध व मर्यादित देवाणघेवाणीचे संबंध प्रस्थापित करण्याऐवजी मानवी मन त्यांच्याशी स्पर्धा करते, ईर्षा करते व त्यातून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवते. इतरांशी तुलनात्मक स्पर्धा सोडा पण मानवी मन स्वतःशीही स्पर्धा करते. भौतिक यशासाठी ठराविक मर्यादेपर्यंत स्पर्धा ठीक आहे. पण मानवी मन या स्पर्धेचा अतिरेक करते व स्वतःबरोबर इतरांचेही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवते.

जीवनात स्वतःच्या मर्यादा ओळखून  त्या मर्यादेतील शक्य तेवढे भौतिक यश मर्यादित स्पर्धेतून मिळवल्या नंतर स्पर्धेतून बाजूला व्हायला हवे. अर्थात स्पर्धेतून निवृत्ती घ्यायला हवी. अशी निवृत्ती घेतल्यानंतर आपण जगाच्या भौतिक स्पर्धेत नाही आहोत याची खंत न बाळगता इतरांची स्पर्धा त्या स्पर्धेपासून अलिप्त राहून लांबून बघायची असते. मोह झाला तरी त्यात भाग घ्यायचा नसतो व त्याचा विचारही करायचा नसतो.

अशी अवस्था प्राप्त केल्यानंतर प्रवास सुरू होतो तो परमेश्वराच्या अध्यात्माचा. ज्याने हे सर्व विविध पदार्थ निर्माण केले व त्यांच्यापासून ही विज्ञानबद्ध भौतिक पदार्थीय सृष्टी रचली त्या निर्माता, नियंता, परमेश्वराबरोबर मानवी मनाला भौतिक स्पर्धा करता येईल का? परमेश्वराबरोबर भौतिक स्पर्धाच काय पण त्याच्याबरोबर भौतिक देवाणघेवाणही शक्य नाही. मग त्याच्यापुढे भौतिक स्पर्धेतील भौतिक यशाची मागणी का करावी?

मग मानवी मन काय करू शकते? तर परमेश्वरापुढे आध्यात्मिक मनाने लीन होऊ शकते. आध्यात्मिक मन म्हणजे भौतिक भावना व भौतिक विचार यांचा त्याग केलेले, या सर्व भावना व हे सर्व विचार परमेश्वर चरणी अर्पण केलेले मन. असे आध्यात्मिक मनच परमेश्वराशी एकरूप होऊ शकते. आणि अशी आध्यात्मिक एकरूपता मनुष्याला जिवंतपणीही साधता येते व त्यातून आध्यात्मिक आनंद व शांतीची अनुभूती मिळवता येते.

या आध्यात्मिक अनुभूतीसाठी मला हिंदू धर्मातील सगुण ईश्वरापासून निर्गुण परमेश्वरापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास आवडतो जो मी खालील आध्यात्मिक प्रार्थनेने दररोज करतो.

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री रामकृष्णाय नमः !
ओम नमः शिवाय !
ओम श्री गुरूदेव दत्ताय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम शरणम गच्छामी !
ओम सर्वम सुखीनम भवती !
ओम शांती !

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१.२०२४
https://youtu.be/E-NqjMfZeMk?si=fRC0-xfLkD6rOncV

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा