https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

नात्यांतील मानसिक संतुलन!

कोणती नाती जास्त जवळची, रक्ताची नाती की लग्नाची नाती?

आधी रक्ताचे नाते की लग्नाचे नाते? कारण पुरूष व स्त्री लग्न करून नवरा व बायको होतात व लैंगिक संबंधातून मुलांना जन्म देतात. अशा मुलांना औरस मुले म्हणतात. लग्न न करता स्त्री पुरूष मुलांना जन्म देतात तेंव्हा त्यांना अनौरस मुले म्हणतात. मुले औरस असोत किंवा अनौरस त्यांचे त्यांच्या आईवडिलांशी नाते असते ते रक्ताचे नाते असते. रक्ताचे नाते म्हणजे जैविक नाते. पती पत्नी यांचे नाते लग्नाचे असते. ते जैविक नाते नसून सामाजिक नाते असते. पण या लग्नाच्या सामाजिक नात्यातही लैंगिक संबंधामुळे पती पत्नीत जैविक संबंध प्रस्थापित होत असतात व त्यामुळे नवरा बायकोचे नाते नैसर्गिक-सामाजिक असे मिश्र नाते असते. पण आईवडील व मुले व त्यांच्या मुलांतील भाऊ, बहीण ही नाती रक्ताची (जैविक) असतात.

मला जवळची, सरळसोपी नाती पटकन कळतात. पण गुंतागुंतीची नाती कळायला थोडा वेळ जातो. वडील, आई, सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, आजोबा (वडिलाचे वडील व आईचे वडील), आजी (वडिलाची आई व आईची आई) ही नाती फार जवळची रक्ताची नाती व म्हणून कळायला सोपी. पण पंजोबा, पंजी, खापर पंजोबा, खापर पंजी ही नाती तशी रक्ताची असली तरी फार लांबची. मी तर आजोबा, आजी (वडिलाकडचे व आईकडचे) यांना बघितले नाही तर पंजोबा, पंजी यांना बघण्याचा प्रश्नच नाही.

जवळच्या रक्ताच्या नात्यांना चिकटलेली लांबच्या रक्ताची नाती असतात ती म्हणजे चुलता (काका किंवा नाना), चुलती (काकी/काकू किंवा नानी), चुलत भाऊ, चुलत बहीण, मावशीचा नवरा (काका), मावशी, मावस भाऊ, मावस बहीण, मावशीतही आईची सख्खी बहीण ही सख्खी मावशी तर आईची मावस बहीण ही मावस मावशी, वडिलांची बहीण म्हणजे आत्या व आत्याच्या मुलाला आतेभाऊ तर आत्याच्या मुलीला आतेबहीण म्हणतात, आईचा भाऊ तो मामा तर मामाच्या मुलाला मामेभाऊ व मामाच्या मुलीला मामेबहीण म्हणतात. पण लांबच्या रक्ताच्या नात्यांतही लग्न हाच दुवा असतो. एकंदरीत नाती रक्ताची व वैवाहिक अशी मिश्र असतात. या मिश्र नात्यांतून निर्माण होणारी इतर नाती म्हणजे जावई, सून, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी, नातू, नात वगैरे. या नात्यांना संलग्न अशी इतर बरीच नाती असतात. अशी ही नात्यांची लांबलचक माळ असते. नातीगोती म्हणजे नात्यांची ही अशी लांबलचक माळ.

असे म्हणतात की वडिलाकडील नात्यांपेक्षा मुलांना आईकडील नाती जास्त जवळची वाटतात. माझ्या नात्यांच्या बाबतीत म्हटले माझी जवळच्या रक्ताची नाती पाच व ती म्हणजे माझे आईवडील, माझ्या दोन धाकटया बहिणी व माझा एक धाकटा भाऊ. या पाच जणांत मला धरले तर एकूण कुटुंब सहा जणांचे. माझ्या वडिलांना तीन भाऊ व एक बहीण म्हणजे मला तीन चुलते व एक आत्या. चुलते (काका/नाना) आले म्हणजे चुलत्या (काकी/नानी) आल्याच. मग त्यांची मुले म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहिणी आल्या. माझ्या आत्याला दोन मुले म्हणजे मला दोन आतेभाऊ व तीन मुली म्हणजे तीन आतेबहिणी. ही सर्व वडिलाकडील नाती. माझ्या आईला एकच सख्खी थोरली बहीण. ती माझी सख्खी मावशी. या सख्ख्या मावशीला एकच एकुलती एक मुलगी (जशी मलाही एकुलती एक मुलगी आहे). सख्ख्या मावशीची ही एकुलती एक मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण. माझी सख्खी मावशी व माझी सख्खी मावस बहीण वरळीला आमच्याच घरी रहात असल्याने ती सख्खी मावशी मला माझ्या आईसारखी तर तिची मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण मला सख्ख्या बहिणीसारखी. माझ्या सख्ख्या बहिणींच्या पतीशी (सख्ख्या मेहुण्यांशी) जवळीक तशी माझ्या या मावस बहिणीच्या पतीशी (सख्ख्या मावस मेहुण्याशी) सुद्धा जवळीक. माझ्या आईची सोलापूर येथे एक मावस बहीण होती. ती माझी मावस मावशी. त्या मावस मावशीलाही एकच एकुलती एक मुलगी. ती माझी मावस मावस बहीण. मावस मावस बहिणीचे पती म्हणजे माझे मावस मावस मेहुणे. आता हे मावस मावस नाते जरी आईकडील असले तरी ते थोडे लांब पडले. तसे हे नाते रहायलाही लांब म्हणजे पंढरपूरला. त्यामुळे सख्ख्या मावस बहिणीचे नाते व मावस मावस बहिणीचे नाते यात थोडे अंतर पडले. पण तरीही पंढरपूरची माझी मावस मावस बहीण ही खूप प्रेमळ होती. ती पंढरपूरला प्राथमिक शिक्षिका होती. तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता की मी पंढरपूरला असताना तिच्या घरी सारखा जात असे व मुंबईला आल्यावरही तिचा व माझा सारखा पत्र व्यवहार चालू असे. मावस मावस बहिणीचे नाते सख्ख्या बहिणीच्या नात्यापेक्षाही जवळ झाले होते ते केवळ त्या बहिणीच्या प्रेमळ स्वभावामुळे. आता असे मायाप्रेम जवळच्या नात्यांतही अनुभवायला मिळत नाही याचे वाईट वाटते.

आईकडील नात्यांप्रमाणे माझ्या वडिलाकडील नात्यांशी म्हणजे चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, आत्या, आतेभाऊ, आते बहिणी यांच्याशी माझी फार जवळीक का निर्माण झाली नाही याला कारण हेच असावे की ही सर्व नाती वडिलाकडील नाती पडली. पण माझ्या एका धाकटया चुलत्या बरोबर (नाना) व चुलती बरोबर (नानी) मला लहानपणी खूप म्हणजे  खूपच जवळीक निर्माण झाली होती कारण ते दोघेही माझे खूप लाड करीत होते. तसेच माझ्या वडिलाचे पंढरपूरला काका व मावशी होते तेही मी पंढरपूरला असताना माझे खूप लाड करीत होते. त्यांचाही मला लळा लागला होता.

माझ्या बायकोकडील नाती म्हणजे माझ्या लग्नाची नाती. ही नाती म्हणजे माझे सासू, सासरे, मेहुणे, मेहुण्या, त्या मेहुण्यांचे पती म्हणजे माझे साडू, त्यांची मुले. या नात्यांशी सासू, सासरे सोडून माझे एवढे सूर जुळले नाहीत. या सर्वांपैकी माझी एक थोरली मेहुणी व धाकटा मेहुणा यांच्याशी माझी जास्त जवळीक आहे कारण या दोघांशी माझ्या बायकोची जास्त जवळीक आहे व हेच त्यांच्याशी असलेल्या माझ्या जवळीकीचे कारण असावे. बाकी माझ्या लग्नाकडची इतर नाती असून नसून सारखीच. माझ्या मुलीचा विवाह हल्ली म्हणजे तीन वर्षांपूर्वी झाला आहे त्यामुळे माझ्या मुलीमुळे माझ्या जावयाशी माझे नाते मुलासारखे जुळून आले असले तरी मुलीचे सासू, सासरे, मुलीची नणंद यांच्याशी अजून तरी तितकेसे संबंध जुळले नाहीत.

माझ्या वरील नातेसाखळीचा जर अभ्यास केला तर असे दिसून येईल की माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (बायको, मुलगी व जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून, त्यात मुलगी रक्ताच्या नात्याची) माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या रक्ताच्या नात्यांचीच (रक्त जवळचे व लांबचेही) साखळी फार मोठी आहे व तीच मला जास्त जवळची आहे. अर्थात माझ्यापुरती तरी माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (माझी बायको, मुलगी, जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून त्यात मुलगी ही रक्ताच्या नात्याची) मला माझ्या रक्ताचीच म्हणजे माझ्या आईवडिलांच्या माध्यमातील नातीच जास्त जवळची आहेत. पण याबाबतीत माझे वडील खरंच ग्रेट होते. त्यांनी रक्ताच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडील नात्यांना म्हणजे त्यांचे भाऊ, बहीण, काका, मावशा या सर्वांना जवळ केले होते व त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांच्या बायको कडील नात्यांना म्हणजे माझा चुलत मामा (माझ्या आईला सख्खा भाऊ नव्हता, आई व मावशी या दोन सख्ख्या बहिणी हीच दोन अपत्ये), माझी मावशी, माझी मावस बहीण, तसेच माझी मावस मावशी, माझी मावस मावस बहीण या सर्वांना जवळ केले होते. दोन्हीकडे असे संतुलन साधणे सगळ्यांनाच जमत नाही. मला ते जमले नाही. पण माझ्या वडिलांना ते जमले. तरीही प्रश्न हा आहेच की ज्या नात्यांमुळे आपले मानसिक संतुलन बिघडते अशी नाती जपावी का?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१.२०२४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा