https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व विधीवत शब्दाचा अर्थ!

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून विधीवत शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला!

सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्या येथील नवीन मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. कोणत्याही गोष्टीचा विचार मी कायद्याच्या दृष्टिकोनातून करतो. कायद्याची चौकट म्हणजे मर्यादेची चौकट आणि प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात मर्यादा पुरूषोत्तम. त्यामुळे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हे एक जिज्ञासू वकील म्हणून ओघाओघाने आलेच. खरं तर या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून विधीवत या शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला.

कायदा हा तीन गोष्टींनी बनतो. कल्याणकारी, मंगल निर्माणाचे विशिष्ट ध्येय हा कायद्याचा पाया असतो. या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी एक विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते ती दिशा किंवा चौकट हा कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा असतो. विशिष्ट धोरणात्मक चौकटीने एक विशिष्ट तात्विक/ तांत्रिक प्रक्रिया निश्चित केली जाते ती प्रक्रिया म्हणजे कायद्याचा प्रत्यक्ष  विधी असतो. या तिन्ही गोष्टींचा मिळून कायदा बनतो. कायद्यानुसार सर्वकाही व्यवस्थित पार पडणे म्हणजे एखादे विशिष्ट कार्य विधीवत  पार पडणे.

एखादी इमारत उभी करताना अशी इमारत उभारणे हे ध्येय असते. अशा इमारतीचा आराखडा ही इमारतीची धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते. या आराखड्यानुसार इमारत बांधकाम तंत्रज्ञानाने इमारतीचे बांधकाम करणे ही अशा इमारतीची विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. इमारत निर्मितीचे ध्येय, इमारतीचा आराखडा व इमारतीचे बांधकाम या तिन्ही गोष्टी जुळून आल्या की अशी इमारत विधीवत बांधली गेली असे म्हणायचे.

अयोध्या येथील श्रीरामाच्या नवीन मंदिराचे बांधकाम असेच विधीवत पार पडले. या मंदिरात सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली याचा अर्थ हाच की ती हिंदू धर्म शास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. ईश्वर मूर्तीला मंदिरात स्थानापन्न करताना प्राणप्रतिष्ठेचा हिंदू धर्मशास्त्रीय विधी हा धार्मिक कायदाच आहे. या कायद्यात वर उल्लेखित तिन्ही गोष्टी येतात. त्या म्हणजे ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे ध्येय. या प्राणप्रतिष्ठेची म्हणजे ईश्वर मूर्तीच्या विधीवत स्थानापन्नतेची विशिष्ट दिशा/चौकट म्हणजे विशिष्ट शुभ मुहुर्त वगैरे. त्यानंतर त्या विशिष्ट चौकटीतील प्राणप्रतिष्ठेची विशिष्ट पद्धत/कायदेशीर प्रक्रिया म्हणजे मंत्रोपचार वगैरे. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे व्यवस्थित पार पडल्या की ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही विधीवत पार पडली असे म्हणायचे. अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशीच विधीवत पार पडली.

अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशाप्रकारे विधीवत पार पडल्यावर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी जमलेल्या मान्यवरांसमोर जे भाषण केले ते भाषण विधीवत या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगते. या भाषणाद्वारे पंतप्रधानांनी एक संकल्प सोडला. भारताचे नवनिर्माण (नया भारत) हाच तो संकल्प. पुढील  एक हजार वर्षांत पवित्र म्हणजे मंगल, कल्याणकारी भारत व कणखर म्हणजे स्वसंरक्षणासाठी खंबीर व शस्त्रसज्ज भारत, अशा भारताची पायाभरणी आता करून त्या ध्येयाने पुढे वाटचाल करायची हा संकल्प, हे ध्येय हा नवीन भारत निर्माण करण्याच्या कायद्याचा पाया झाला. या ध्येयपूर्तीसाठी आता विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट आखली जाईल, निश्चित केली जाईल. तो असेल नवभारत निर्माण कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा. या धोरणात्मक चौकटी अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यात बसणारी जी प्रक्रिया राबवली जाईल ती असेल या नवभारताची विशिष्ट  कायदेशीर प्रक्रिया. अशाप्रकारे नवभारताच्या कायद्याचे तीन घटक, तीन गोष्टी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्येतील भाषणात थोडक्यात स्पष्ट केल्या.

विधीवत या शब्दाचा अर्थ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून मला वरील प्रमाणे अधिक स्पष्ट झाला.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा