https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

भानासाठी ज्ञान!

भानासाठी ज्ञान!

शिक्षण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणाचे व त्यात असलेल्या स्वतःचे ज्ञान. ज्ञान हे मर्यादेचे भान देते. शिक्षणातून मिळवलेले ज्ञान हे पैसे कमावण्याचे व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकत नाही. त्या ज्ञानात मिळवलेले विशेष प्रावीण्य, कौशल्य हे पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकते. असे कौशल्य विशिष्ट ज्ञानावर केलेल्या प्रयत्नातून, सरावातून प्राप्त होते. असा सराव म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकार असतो. पण ज्ञानाच्या अनेक शाखा असल्याने त्या प्रत्येक शाखेत सराव करून सर्व शाखांत प्रावीण्य मिळवता येत नाही. अर्थात ज्ञानाच्या खाणीतील सर्व हिऱ्यांना एकटा माणूस पैलू पाडू शकत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे. मुळात शिक्षण व ज्ञानाला पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल समजणेच चूक आहे. सर्व ज्ञान शाखांचे, क्षेत्रांचे थोडे थोडे जुजबी ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान जे सर्वांना असणे आवश्यक असते. हे सामान्य ज्ञान शालेय शिक्षणातून मिळते. या सामान्य ज्ञानाशिवाय माणसाला सामान्य भान येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला निदान इयत्ता दहावी पर्यंत तरी शिक्षण हे असलेच पाहिजे. एवढेही शिक्षण नसलेली माणसे राजकारणात यशस्वी होऊ शकतात पण कधी तर समाज बहुसंख्येने अशिक्षित असेल तर. बहुसंख्य जनता जर सुशिक्षित असेल तर अशिक्षित (म्हणजे कमीतकमी सामान्य ज्ञानाचे शालेय शिक्षण नसलेल्या) माणसांची राजकारणात डाळ शिजणार नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की मर्यादा भानासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण ते पैसा व सत्ता मिळविण्याचे भांडवल होऊ शकत नाही. मी अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण, नंतर बी.काॕम. चे पदवी शिक्षण, पुढे पदव्युत्तर कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षण व शेवटी कायद्याचे पदव्युत्तर एलएल.बी. शिक्षण एवढे उच्च शिक्षण घेतले. पण या एवढ्या ज्ञान पसाऱ्यातून मी उदरनिर्वाहासाठी वकिली व्यवसाय स्वीकारला व तो करताना कायदा ज्ञानाच्या विशाल सागरातील काही थेंबांवरच प्रभुत्व मिळवले, त्यात कौशल्य प्राप्त केले. ते कौशल्य माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या एक टक्का (१%) एवढेही नाही. अर्थात माझे एक टक्का ज्ञान एवढेच माझे पैसा कमावण्याचे भांडवल झाले. त्या भांडवलावर मी फक्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सामान्य गरजांपुरता थोडाच पैसा कमवू शकलो. ही झाली अर्थकारण क्षेत्राची गोष्ट. राजकारण क्षेत्रात मला गतीच नाही कारण त्या क्षेत्रात मला कौशल्य प्राप्त करता आले नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा मला गंधही नाही. ज्ञानाने माझ्यावर खूप उपकार केलेत. मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी जास्त उंच उड्या मारू नयेत याचे भान मला सतत याच ज्ञानाने दिले व मला भानावर ठेवले. थोडक्यात, मर्यादा भानासाठी ज्ञान हाच ज्ञानाचा मुख्य हेतू एवढेच मला या लेखातून सांगायचे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा