https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निवृत्ती!

वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या बौद्धिक व शारीरिक कष्टावरील मर्यादा व निवृत्ती!

मानवी मेंदूमनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या सुशिक्षित-सुसंस्कृत करणारे ज्ञान  सतत देण्याचा कार्यक्रम राबवणारा शिक्षणाचा कारखाना अविरतपणे सतत चालू आहे. त्याला क्षणभरही विश्रांती नाही. या कारखान्यात लहानपणापासून सतत काम करून करून मानवी मेंदू थकतो. कारण या कारखान्याला शेवट नाही पण नश्वर मानवी आयुष्याला शेवट आहे.

शिक्षणाच्या कारखान्यात हळूहळू  ज्ञान प्रगल्भ होत जाणारे मेंदूमन त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग म्हणजे सराव करण्याचा प्रयत्न सुरू करते. म्हणजे एकीकडून सतत सुरू असलेला ज्ञानाचा ओघ तर दुसरीकडून सतत त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सराव व त्यासाठी मेंदू बुद्धीला व शरीर अवयवांना सतत कार्यरत ठेवण्याचा दुहेरी कार्यक्रम म्हणजे बौध्दिक व शारीरिक कष्टाचा दुहेरी कार्यक्रम आयुष्यभर सुरू राहतो.

मेंदूमनावर झालेले ज्ञानसंस्कार मनुष्याला गप्प बसू देत नाहीत. या ज्ञानसंस्काराचा वापर सातत्याने व्यवहारात करण्यासाठी मेंदूमन सारखे पुढे पुढे करते. अशाप्रकारे मानवी आयुष्यात शिक्षणाचा व व्यवहाराचा असे दोन्ही कारखाने सतत सुरू राहतात. पण या दोन्ही  कारखान्यात काम करताना बौद्धिक व शारीरिक कष्ट करण्यावर वाढत्या वयानुसार नैसर्गिक मर्यादा पडतात. या मर्यादा लक्षात घेऊन कालानुरूप शरीर, मनाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाच्या विश्रांतीचा काळ उतार वयात वाढवत जाण्यालाच निवृत्ती असे म्हणतात जी निवृत्ती नुसती नोकरीतच नव्हे तर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, राजकारण, समाजकारण यातूनही घ्यावी लागते व या नैसर्गिक निवृत्तीला वैद्यकीय, वकिली किंवा इतर कोणतेही व्यवसाय, उद्योगधंदे किंवा राजकारण, समाजकारण हे अपवाद होऊ शकत नाहीत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा