https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ७ जानेवारी, २०२४

एकटक रोखून बघू नका!

एकटक रोखून बघणे किती त्रासदायक?

एखाद्या व्यक्तीकडेच नव्हे तर एखाद्या वस्तूकडे, गोष्टीकडे जास्त वेळ अर्थात एकटक रोखून बघत बसणे हे किती त्रासदायक होऊ शकते हा पुन्हा माझ्या चिकित्सक वृत्तीचा विषय. पण मला आता कळून चुकलेय की माझी ही असली चिकित्सक वृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिच्या खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती हा सुद्धा एकटक रोखून बघण्याचाच एक प्रकार. या वृत्तीचा माझ्या मलाच त्रास होतो हेही खरे आहे. याला अती विचारी वृत्ती असेही म्हणता येईल. अती तिथे माती या म्हणी नुसार अती विचार सुद्धा मनात तणाव निर्माण करून स्वतःलाच त्रास देतात.

एखाद्या गोष्टीकडे सहज बघायला निसर्गाची हरकत नसते, पण एकटक रोखून बघायला निसर्ग हरकत घेतो. सहज बघणे म्हणजे मवाळ, अहिंसक नजरेने बघणे व एकटक रोखून बघणे म्हणजे कडक, हिंसक नजरेने बघणे. उदा. एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर बोट ठेवणे, दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच जास्त डोकावून बघणे किंवा उगाच फालतू लुडबूड करणे, एखाद्या गोष्टीकडे अती चिकित्सक नजरेने म्हणजे अती खोलात जाऊन बघणे ही एकटक रोखून बघण्याची काही उदाहरणे आहेत.

निसर्ग नियमानुसार एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडे एकटक रोखून बघितले तर त्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडून सहज, तालबद्ध देवाणघेवाण होण्यासाठी योग्य प्रतिसाद, सहकार्य मिळणे तर सोडाच पण समोरून एकदम हिंसक प्रतिक्रिया मिळू शकते. उदा. एखादा पुरूष एखाद्या स्त्री कडे जास्त वेळ एकटक रोखून बघत बसला तर त्या स्त्री कडून त्या पुरूषाच्या थोबाडीत बसू शकते. यालाच एकदम हिंसक प्रतिक्रिया म्हणतात. एकटक रोखून बघणे हेच या प्रतिक्रियेला कारण असते.

जगाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जगाकडे सहज बघणे फायद्याचे असते. जगाविषयी अती अपेक्षा, अती लालच हा जगाकडे एकटक रोखून बघण्याचाच प्रकार. या अशा एकटक  रोखून बघण्यातूनच मनात अहंभाव, मोह, मद, मत्सर, क्रोध, भ्रष्टाचार, व्यभिचार व हिंसाचार या नकारात्मक गोष्टी तयार होतात. मी तर असे म्हणेल की, जगाकडे, इतरांकडे एकटक रोखून बघणे हे तर चुकीचे आहेच, पण स्वतःच स्वतःकडे एकटक रोखून बघणे हे सुद्धा चुकीचे आहे. जगाकडे सहज बघून जगाचा सहजानंद घेतला पाहिजे हे मला म्हातारपणी उशिरा सुचलेले शहाणपण!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा